निवडणूक अधिकार्‍यांकडून आज सर्वपक्षीय बैठकीच आयोजन

0
71

>> टपाली मतदानाचा घोळ

गोव्यातील टपाली मतदानाचा घोळ व निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांनी गोव्यातील विधानसभा निवडणुकीसाठी केलेला करोडोंचा खर्च या प्रश्‍नावरून काल कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांची नवी दिल्लीत भेट घेऊन आतापर्यंत झालेले टपाली मतदान रद्द करून निवडणूक यंत्राद्वारे मतदान परत घ्यावे अशी मागणी केली. या पार्श्‍वभूमीवर येथील सहाय्यक निवडणूक अधिकार्‍यांनी आज दि. ७ रोजी एक सर्वपक्षीय बैठक आयोजित केलेली असून या बैठकीत वरील दोन्ही मुद्यांवर चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कॉंग्रेसचे नेते गिरीश चोडणकर, संकल्प आमोणकर व अविनाश भोसले यांनी काल भारतीय निवडणूक आयोगाची नवी दिल्लीत भेट घेऊन आतापर्यंत झालेले टपाली मतदान रद्दबातल ठरवण्यात यावे व निवडणूक यंत्रांद्वारे हे मतदान परत घेण्यात यावे अशी मागणी केल्याचे सांगितले. आयोगाबरोबर आमची सुमारे तासभर चर्चा झाली. टपाली मतदान रद्द करून हे मतदान निवडणूक यंत्रांद्वारे घेण्याची जी मागणी आहे त्यासंबंधी योग्य विचार करून काय तो निर्णय घेऊ, असे आयोगाने स्पष्ट केल्याचे अविनाश भोसले यांनी दिल्लीतून बोलताना सांगितले.
दरम्यान, गोवा विधानसभा निवडणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी आलेल्या आयोगाच्या अधिकार्‍यांनी येथे (गोव्यात) जो भरमसाठ खर्च केला त्याची चौकशी करण्याची मागणीही यावेळी केल्याचे भोसले यांनी सांगितले. आयोगाने खर्च १० कोटी रु. दाखवला असल्याचेही भारतीय निवडणूक आयोगाच्या नजरेत आणून दिले असल्याचे भोसले यांनी यावेळी
संागितले.
राज्यातील लष्करी सैनिक असलेले जे मतदार होते त्या मतदारांच्या नावाची यादी केवळ भाजपकडे होती व ती अन्य पक्षांना देण्यात आली नव्हती ही गोष्टही आयोगाच्या नजरेत आणून दिल्याचे भोसले यांनी सांगितले. या गोष्टीचीही चौकशी होण्याची गरज असल्याचे आयोगासमोर सांगितल्याचे ते म्हणाले.