निवडणुकीसाठी बँकांची भूमिका महत्त्वाची : कुणाल

0
8

मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात निवडणुका घेण्यासाठी बँका निवडणूक काळात महत्त्वाची भूमिका बजावित असल्याचे सांगितले. मुख्य निवडणूक अधिकार्‍यांच्या कार्यालयात गोव्यातील बँकांच्या प्रतिनिधींबरोबर घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते.

निवडणूक प्रक्रिया स्वच्छ वातावरणात पूर्ण करण्याच्या उद्देशाने भारताच्या निवडणूक आयोगाने फ्लाइंग स्क्वॉड्स आणि स्टॅटिक सर्व्हिलन्स पथकासाठी एक मानक कार्यप्रणाली जारी केली असून ज्याचा उपयोग निवडणूक प्रचार, खर्च, लांच, बेकायदेशीर शस्त्रे बाळगणे, दारूची विक्री आणि इतर गैरव्यवहारावर लक्ष ठेवण्यासाठी होतो, असे त्यांनी सांगितले.

गोव्यात २०२२ मध्ये होणार्‍या सार्वत्रिक निवडणुका मुक्त व निष्पक्षपणाने घेण्यासाठी सर्व बँकांनी निवडणुकीच्या काळांत बँकांतून होणार्‍या वेगळ्या व संशयित रोख व्यवहारावर लक्ष ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. कुणाल यांनी निवडणुकीच्या काळात भेटवस्तू, वस्तूंचे वाटप होण्याची शक्यता असल्याचे निदर्शनास आणून दिले. सर्व बँकांना आउटसोर्स केलेल्या खासगीद्वारे एटीएम भरण्यासाठी व इतर शाखांमध्ये रोख रक्कम वितरित करण्यासाठी कॅश व्हॅनद्वारे व्यवहार व वाहतूक करताना योग्य कागदपत्रांची खात्री करण्याचे आवाहन केले.