निवडणुकीत कॉंग्रेसलाच स्पष्ट बहुमत

0
10

>> विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांचा दावा

नुकत्याच झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत प्राप्त होईल, असा दावा काल विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत व प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत केला. पण राज्यात सत्तेवर येणार्‍या सरकारात सर्व भाजपविरोधी पक्षांचा समावेश असावा. तसेच ते भाजपविरोधी पक्षांचे सरकार ठरावे यासाठी सर्व भाजपविरोधी आमदारांना बरोबर घेऊन कॉंग्रेस राज्यात सरकार स्थापन करेल, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. यावेळी सरकार स्थापनेसाठी दावा करण्यास कॉंग्रेस पक्ष जराही विलंब लावणार नसल्याचेही यावेळी बोलताना कामत यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्रिपद हेच आपले
अंतिम ध्येय नव्हे

एका प्रश्‍नाचे उत्तर देताना मुख्यमंत्रिपद हेच आपले अंतिम ध्येय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जर आपल्या नशीबात मुख्यमंत्रिपद असेल तर ते आपणाला मिळेल आणि ते कुणीही हिरावून घेऊ शकणार नसल्याचे ते म्हणाले. मात्र, त्याचीच लालसा बाळगून आपण बसलो नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तुमचे आमदार पक्ष सोडून भाजपकडे जाणार नाहीत याची तुम्ही खात्री देऊ शकता काय, असे विचारले असता आता तसे धाडस कुणी करतील, असे आपणाला वाटत नसल्याचे ते म्हणाले. कुणी तसे धाडस जर केले तर त्यांना त्याची मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा कामत यांनी दिला.