निवडणुका की कोरोना?

0
298

गोव्यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण मिळाला अशी अधिकृत खबर काल सकाळी आली. नंतर आरोग्यमंत्र्यांनाच ती खोटी असल्याचे स्पष्टीकरण देण्याची वेळ आली. जनतेची ही कसली चेष्टा चालली आहे? समाजमाध्यमांवरून तर कोरोना रुग्णांबाबत नाना अफवांना नुसता ऊत आला आहे. राज्यात हा जो काही सावळागोंधळ चालला आहे तो सरकारच्या एकूण कारभाराचे धिंडवडे काढणारा आहे. अशा अफवा पसरवणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी आणि अशा अफवा वेळीच रोखण्यासाठी खरे तर सरकारने तत्पर असायला हवे. अशा अफवा पसरतात कशा आणि कुठून? हा जनतेच्या जिवाशी खेळ आहे आणि सरकारने तो गांभीर्याने घ्यायला हवा. गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळामध्ये चार संशयित आहेत. त्यातील नॉर्वे देशाचे नागरिक असलेले एक महाशय दिल्ली, आग्रा, आसाम, मेघालय असे देशभर फिरून गोव्यात आले आहेत. ते उद्या खरोखरच कोरोनाबाधित आढळले तर या प्रवासात त्यांनी आजवर किती जणांना हा संसर्ग बहाल केला असेल कल्पनाही करवत नाही. दुबईहून गोवामार्गे बेंगलुरूला गेलेली एक महिला कोरोनाबाधित असल्याचे सिद्ध झाले आहे. गोव्यात नव्हे, बेंगलुरूला झालेल्या तपासणीत ती कोरोनाबाधित असल्याचे आढळले. तिच्यासोबत विमानप्रवास केलेल्या आणि गोव्यात उतरलेल्या इतर प्रवाशांचा थांगपत्ता आता राज्य सरकार हुडकते आहे. त्या विमानातून जे पन्नासेक सहप्रवासी गोव्यात दाबोळी विमानतळावर उतरले, ते एव्हाना समाजात मिसळले देखील. आता आठवड्यानंतर त्यांचा शोध चालला आहे. कालपर्यंत म्हणे ४३ जणांना शोधले गेले. पाच जणांना कोरोनासदृश्य काही लक्षणे दिसत असल्याने गोवा वैद्यकीय महाविद्यालयात विलग करून ठेवण्यात येणार आहे. आठ जणांचा तर अजून थांगपत्ताच लागलेला नाही. तोवर ते आणखी कितीजणांच्या संपर्कात आले असतील, येत असतील सांगता येत नाही. गोव्याचे राजकीय नेतृत्व मात्र जिल्हा पंचायत निवडणुकीच्या प्रचारात दंग आहे. लोकांना गर्दी टाळा अशी प्रवचने झोडत स्वतः गर्दी गोळा करीत आहेत. स्वतःच्या गर्दीतल्या छब्या झळकवत आहेत. आरोग्यमंत्री आपण मुख्यमंत्र्यांना ही शिफारस केली, ती शिफारस केली असे रोज पत्रकार परिषदेत जाहीर करीत ‘मुख्यमंत्री महोदय मग त्यावर निर्णय घेतील’ असे सांगत असतात. आरोग्यमंत्र्यांनी एकेका मुद्द्यावर शिफारस करायची आणि नंतर मुख्यमंत्र्यांनी त्यावर ‘विचार करून’ निर्णय घ्यायचा या असल्या द्राविडी प्राणायामापेक्षा मुख्यमंत्री – आरोग्यमंत्री यांनी एकत्र बसून तडकाफडकी निर्णय घेता येत नाहीत काय? खरे तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपली सारी कामे बाजूला ठेवून केवळ ‘कोरोना’ या आजच्या घडीच्या सर्वांत महत्त्वाच्या विषयावर सध्या लक्ष केंद्रित करणे आवश्यक होते, परंतु राज्य सरकारची नेतृत्वहीनता आणि गचाळ, ढिसाळ कारभार पावलोपावली दृष्टीस पडतो आहे. मनोहर पर्रीकर आज मुख्यमंत्री असते तर राज्यातील ही परिस्थिती त्यांनी किती कार्यक्षमपणे हाताळली असती हा विचार जो तो बोलून दाखवतो आहे, हे विद्यमान राजकीय नेतृत्वाचे मोठे अपयश आहे. सरकारने कोरोनासंदर्भात काही निर्णय जरूर घेतले, परंतु एक तर ते उशिरा घेतले आणि त्याहून आक्षेपार्ह बाब म्हणजे त्यामध्ये ठोस भूमिकेचा पूर्ण अभाव होता. केवळ लोकांना खूष ठेवण्याच्या सोसापोटी शिगमोत्सवाच्या मिरवणुका तेथे हजारोंची गर्दी गोळा होणे घातक आहे हे ठाऊक असूनही त्या रद्द करणे सरकारने टाळले. शाळांच्या बाबतीतही असाच संदिग्ध आणि संभ्रम पसरवणारा निर्णय झाला. मंदिरे, चर्च आदींबाबतचे निर्णय त्यांच्या व्यवस्थापनांवर ढकलले गेले आहेत. स्वतः ठामपणे निर्णय घेण्याऐवजी जबाबदारी दुसर्‍यावर ढकलण्याची ही वृत्ती गोव्याला फार महाग पडू शकते. जगभरामध्ये काय चालले आहे हे स्वच्छ दिसत असताना अजूनही जी बेफिकिरी गोव्यात दाखवली जाते आहे, तिला काय म्हणायचे? विमानतळांवर, रेल्वेस्थानकांवर, बंदरावर, गोव्याच्या सीमांवर अजूनही कोरोनाविषयक तपासण्या होत नाहीत, त्यासाठी आवश्यक ती उपकरणे नाहीत हे आश्चर्यकारक आहे. विदेशी नागरिक खुलेआम गोव्याच्या रस्तोरस्ती हिंडताना दिसत आहेत. त्यांच्या तथाकथित घरगुती विलगीकरणावर कोणाची देखरेख आहे? पुण्यासारख्या शहरात घर न् घर तपासण्यात आले. लाखो घरे तपासून संशयितांचा शोध घेतला गेला. गोव्यात मात्र सगळे भगवान भरोसे चाललेले आहे. सरकार कोरोनाबाबत पुरेसे गंभीर नाही हे प्रत्येक बाबतीत दिसून येते आहे आणि जनतेमध्ये त्याबाबत तीव्र नाराजी आणि संताप दिसतो आहे. मुख्यमंत्र्यांनी या असंतोषाची जाणीव ठेवायला हवी. जिल्हा पंचायतीत उद्या तुमचे उमेदवार निवडून आले काय, न आले काय, कोणाला त्याचे काही लागून गेलेले नाही. मात्र, कोरोनासंदर्भात परिस्थिती तुम्ही कशी हाताळता यावर जनतेचे लक्ष आहे. तेथे अपयशी ठरलात तर दोषाचे खापर तुमच्याच माथी फुटणार आहे. सरकारकडून होणार्‍या कोणत्याही घोषणेत नेमकेपणा आणि ठामपणा यावा आणि हा गोंधळ थांबावा!