यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा दुरुपयोग होऊ शकतो आणि चीनसारखा देश भारतातील सार्वत्रिक निवडणुकीला एआय साधनांद्वारे प्रभावित करू शकतो असा थेट इशारा मायक्रोसॉफ्टने देशाला काही दिवसांपूर्वी दिला होता. समाजमाध्यमांचा आजच्या मतदारांवर असलेला प्रगाढ पगडा लक्षात घेता, अशा प्रकारच्या एआयद्वारे निर्मित प्रचारातून निवडणुकीत भाग घेणाऱ्या मतदारांची मते प्रभावित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजकीय पक्षांनाही ह्याची पुरेपूर कल्पना आहे आणि म्हणूनच त्यांनी देखील समाजमाध्यमांचा पुरेपूर वापर करून आपापल्या प्रचाराचे त्यांना प्रमुख साधन बनवलेले आहे. समाजमाध्यमांचा एकूण विस्तार लक्षात घेता आजचे मतदार, त्यातही विशेषतः नवे मतदार हे माहितीसाठी केवळ समाजमाध्यमांवर विसंबून असल्याचे स्पष्ट दिसते. त्यामुळे त्यांचे मतपरिवर्तन करण्यासाठी त्यांच्यावर विशिष्ट प्रकारे काही गोष्टींचा मारा करीत राहिले, तर त्यातून त्यांची भूमिका बदलू शकते असे मानले जाते. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीची आवडनिवड, त्याची मते एआयच्या मदतीने आजमावून, त्यांचे विश्लेषण करून त्या मतांमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी आणि विशिष्ट राजकीय विचारधारेपर्यंत त्याला घेऊन जाण्यासाठी एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जाणे ही अगदी सहजशक्य गोष्ट वाटते. अनेकदा आपल्यापर्यंत समाजमाध्यमांवरून ज्या पोस्ट किंवा जे व्हिडिओ येत असतात, त्यामागचे कारण आपल्यालाही उमगत नसते. अल्गोरिदमच्या मदतीने ज्याप्रमाणे विशिष्ट जाहिरातींचा मारा लोकांवर केला जातो, त्याचप्रकारे विशिष्ट प्रकारचे मत बनवण्यासाठी अनुकूल अशा पोस्टस्चा मारा त्या व्यक्तीवर करून तिच्या मतांना प्रभावित करण्याचे हे तंत्र यापूर्वीच्या निवडणुकांतून वापरलेही गेले आहे. मात्र, ह्यावेळी कृत्रिम बुद्धिमत्ता ज्या प्रमाणात विकसित झालेली आहे ते लक्षात घेता, ह्याला अनेक गंभीर आयाम प्राप्त झाले आहेत. एकेकाळी मोबाईल फोन नवे होते तेव्हा एसएमएससारख्या साधनाचा मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय पक्षांनी वापर केला होता. मग समाजमाध्यमे अवतरली. बड्याबड्या राजकीय पक्षांनी केंब्रिज ॲनेलिटिकासारख्या संस्थांना निवडणुकीच्या रणात उतरवून त्याद्वारे मतदारांना प्रभावित केल्याचे प्रकार मध्यंतरी उघडकीस आले. 2014 ची सार्वत्रिक निवडणूक तर समाजमाध्यमांवरूनच अधिक लढली गेली होती. 2019 च्या निवडणुकीत त्यावरही वरताण झाली. आता 2024 ची ही जी सार्वत्रिक निवडणूक आहे, तिच्यावर कृत्रिम प्रज्ञा स्वार झालेली आहे हे स्पष्ट दिसते आहे. डेटाला आजच्या काळात किती महत्त्व प्राप्त झालेले आहे आणि त्याच्या विश्लेषणाला कशी सोन्याची किंमत आलेली आहे हे सगळे जाणतात. निवडणुका हा तर डेटाचा खेळ असतो. मतदानाची सगळ्या प्रकारे विश्लेषणे करून मतदारांचा कल ओळखण्याचा हा खेळ कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून जेव्हा खेळला जाईल, तेव्हा तो अचूकतेकडे अधिक झुकणारा असेल हे वेगळे सांगायलाच नको. त्यामुळेच ही संभाव्यता लक्षात घेऊन ह्या निवडणुकीला प्रभावित करण्यासाठी बाह्य शक्ती आपापले हित सांभाळण्यासाठी प्रयत्न करू शकतात हेही अगदी उघड आहे. त्यामुळेच मायक्रोसॉफ्टने जेव्हा चीनकडे बोट दाखवले, तेव्हा ते पटण्याजोगेच होते. चीनच कशाला, अमेरिकेसारख्या बलाढ्य महासत्तेचे देखील भारतातील निवडणूक निकालांकडे लक्ष आहेच. एआयच्या वापराची ही भीती केवळ भारतालाच आहे असे नाही. यंदाचे वर्ष तर अवघ्या जगासाठी जणू निवडणुकांचे वर्ष आहे. बहुतेक प्रमुख देशांमध्ये यंदा निवडणुका व्हायच्या आहेत. त्यामुळे त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर अधिकाधिक प्रमाणात होणे अगदी अपरिहार्य आहे असेच म्हणावे लागेल. डीपफेकसारख्या गोष्टींचा वापर प्रचारात कसा केला जाऊ लागला हे आपण मागेच पाहिले. द्रमुकसारख्या प्रादेशिक पक्षानेदेखील करुणानिधींच्या आवाजात प्रचार करण्यासाठी डीपफेक तंत्रज्ञान वापरले. मग बलाढ्य राष्ट्रीय पक्षांना अशक्य ते काय? पारंपरिक प्रसारमाध्यमांची ताकद एकीकडे कमी कमी होत चालली असताना दुसरीकडे समाजमाध्यमांचा जो विस्तार वाढत चालला आहे, तो लक्षात घेता निवडणुका अशाप्रकारे प्रभावित केल्या जाण्याची शक्यता अधिकच बळावते. आपल्या देशातील अल्पशिक्षित, अडाणी मतदारांच्या मतपेढ्या निर्माण करण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष आजवर प्रयत्न करीत आला. आता सुशिक्षित मतदारांच्या अशा मतपेढ्या निर्माण करण्यासाठी जर एआयचा वापर होणार असेल, तर त्याकडे गांभीर्याने पाहावे लागेल. मतदान करताना आपले स्वतःचे मत किती मुक्त आणि अशा गोष्टींपासून अप्रभावित असेल ह्याचा विचार ज्याने त्याने करावा लागेल.