>> पत्रकार परिषदेत कॉंग्रेसचा सवाल
परराज्यातून मासळी घेऊन गोव्यात येणारे ट्रक लांच घेऊन तपासणीशिवाय सोडत असताना रंगेहाथ पकडण्यात आलेले वाहतूक अधिकारी नारायण फडते यांना निलंबित करण्यास सरकारने विलंब का लावला असा प्रश्न कॉंग्रेस प्रवक्ते उरफान मुल्ला यांनी काल पत्रकार परिषदेत केला.
मासळी घेऊन परराज्यातून गोव्यात येणार्या वाहनांची काटेकोरपणे तपासणी करण्यात येणार असल्याचे मंत्री विश्वजीत राणे यानी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे एक पदाधिकारी जनार्दन भंडारी यांच्या नेतृत्वाखाली काणकोण जागृत समितीच्या सदस्यांनी शुक्रवारी मध्यरात्री १ ते २च्या दरम्यान पोळे चेक नाक्यावर जाऊन नारायण फडते यांचे लाच घेतानाचे चित्रण केले होते, असे मुल्ला यांनी सांगितले. नारायण फडते यांना खात्याने तात्काळ निलंबित करायला हवे होते, असे ते म्हणाले.