निर्विवाद यश

0
25

साखळी आणि फोंडा नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षप्रणित गटांनी आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. विशेषतः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या साखळी नगरपालिका निवडणुकीत विरोधकांचा पार धुव्वा उडाल्याने सावंत यांचा वाढता जनाधार स्पष्टपणे अधोरेखित झाला आहे. जेव्हा साखळीत प्रचंड प्रमाणात मतदान झाले, तेव्हाच हे हिरीरीने झालेले मतदान भाजपसाठी व विशेषतः मुख्यमंत्र्यांचे हात बळकट करण्यासाठी झालेले आहे हे स्पष्ट झाले होते. काही काही प्रभागांमध्ये तर मतदानाची टक्केवारी नव्वदच्याही वर गेली होती. प्रभाग 12 मध्ये विक्रमी 96 टक्के मतदान झालेले होते. जे उमेदवार निवडून आले आहेत, त्यांच्या वैयक्तिक करिष्म्यापेक्षा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचा हा करिष्मा अधिक आहे. स्वतः भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी या पालिका निवडणुकीत जातीने घातलेले लक्ष, डॉ. सावंत यांच्या सुविद्य पत्नी सुलक्षणा यांनी स्वतः मैदानात उतरून सांभाळलेली आघाडी आणि भाजपच्या समर्पित कार्यकर्त्यांनी घेतलेले परिश्रम या सगळ्यातून हे भव्य दिव्य यश साकारले आहे. मुख्यमंत्र्यांना जनाधार नाही हे सिद्ध झाल्यास नेतृत्वबदलाच्या आपल्या महत्त्वाकांक्षांना वाव मिळेल या पक्षांतर्गत विरोधकांच्या आशेला साखळी नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने नवी पालवी फुटली होती, परंतु गेल्या विधानसभा निवडणुकीत खेळलेली चाल यावेळी चालू शकलेली दिसत नाही. या निवडणुकीतील एकंदर वातावरण पाहता सायलंट वोटिंग होऊ शकते असे वाटत होते, परंतु अशा कुंपणावरील मतदारांनीही रोजगाराच्या वा वैयक्तिक लाभाच्या अपेक्षेने असेल, परंतु उगवत्या सूर्याला दंडवत घालणेच पसंत केल्याचे निकाल सांगतो आहे. आजवर साखळी नगरपालिका काबीज करण्याचे प्रयत्न सत्ताधारी पक्षाला हुलकावणी देत होते, परंतु या विजयाने साखळीची नगरपालिका धर्मेश सगलानी गटाकडून हिसकावून घेण्यात मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना यश आले आहे आणि याचा फायदा त्यांना आगामी काळात होईल. बिनविरोध निवड झालेले प्रवीण ब्लॅगन वगळता विरोधकांपैकी एकटाही विजयी होऊ शकला नाही. भाजपप्रणित गटातील विजयी झालेल्या उमेदवारांची टक्केवारी पाहिली तर केवळ दोन उमेदवार 32 टक्के आणि 40 टक्के मतांनी आले आहेत, पण उर्वरित सर्वच विजयी उमेदवारांची मते पन्नास टक्क्यांहून अधिक आहेत. प्रभाग 6, 10 व 12 मध्ये तर विजयी आघाडी साठ टक्क्यांपेक्षाही अधिक आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांचे वास्तव्य असलेल्या सरकारी गृहनिर्माण वसाहतीतील म्हणजे प्रभाग क्र. 3 मधील थेट लढतीत भाजपप्रणित गटाच्या उमेदवार सिद्धी पोरोब ह्या 96 मतांच्या आघाडीने विजयी झाल्या आहेत.
साखळीच्या तुलनेत फोंड्यातील निकाल हा संमिश्र म्हणावा लागेल. हा विजय भारतीय जनता पक्षाचा की भाजपात आलेल्या रवी नाईक यांचा हे तपासावे लागेल. रवी यांचे दोन्ही पुत्र या निवडणुकीच्या रिंगणात उभे असल्याने त्यांच्यासाठी वैयक्तिकदृष्ट्या ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होती. ते दोघेही निवडून आल्याने रवींची सुटकेचा निश्वास सोडला असेल. वास्तविक फोंड्यात काँग्रेसने विरोधकाची भूमिका निभावणे अपेक्षित होते, परंतु तेथे केतन भाटीकरांच्या नेतृत्वाखाली मगोनेच आपल्या मित्रपक्ष भाजपाला झुंजवल्याचे दिसले, परंतु रवी नाईक यांची आजवरची पुण्याई कामी आली असेच म्हणावे लागेल.
या दोन्ही नगरपालिकांची ही निवडणूक विलक्षण अटीतटीने लढली गेली. सरकार हाती असले, तरीही भाजपला हे यश सहजासहजी मिळालेले नाही. त्यासाठी प्रचंड प्रयत्न करावे लागले आहेत. सत्ताधाऱ्यांनी आपल्या समर्थकांवर दबाव – दडपणांचा वापर केल्याचा आरोप विरोधी गटाने सातत्याने केला होता. आपल्या कार्यकर्त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवून देण्याचे वायदे केले गेल्याचेही आरोप झाले. परंतु विरोधकांचे म्हणणे काहीही का असेना, शेवटी विजय हा विजय असतो. दोन्ही पालिकांमधून विरोधी गट भुईसपाट झालेला असल्याने अर्थातच आता नवनिर्वाचित पालिका मंडळांवरील जबाबदारी अतिशय वाढते. सत्ताधारी पक्षाच्या सहाय्याने साखळी आणि फोंडा शहरांचा सर्वांगीण विकास करून त्यांना एक आदर्श शहर बनवण्याची जबाबदारी आता नवनिर्वाचित नगरसेवकांची असेल. एकतर्फी विजय हा नगरसेवकांनी एकदिलाने काम करण्याची नागरिकांची अपेक्षाही जागवत असतो. विधानसभा निवडणुकीलाही लाजवील असा विजयोत्सव काल साजरा झाला. आता वेळ कामाला लागण्याची आहे!