निर्भेळ यशासाठी टीम इंडिया सज्ज

0
102

>> दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आजपासून तिसरी कसोटी

भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा कसोटी सामना आजपासून खेळविला जाणार आहे. पहिले दोन्ही सामने जिंकून भारताने मालिका यापूर्वीच खिशात घातली असून निर्भेळ यशासाठी टीम इंडिया तिसर्‍या कसोटीत उतरणार आहे.
फलंदाजी हे दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या दोन कसोटीतील अपयशाचे प्रमुख कारण ठरले आहे. तेंबा बवुमा, ऐडन मार्करम, थ्युनिस डी ब्रुईन, फाफ ड्युप्लेसी यांना आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आलेला नाही. खेळपट्टीवर टिकून राहण्यात ही चौकडी कमी पडली आहे.

पुणेची खेळपट्टी वेगवान गोलंदाजीस पोषक असतानादेखील कगिसो रबाडा वगळता द. आफ्रिकेची गोलंदाजी बोथट झाली होती. एन्रिक नॉर्के व फिलेंडर यांचा बोथट मारा भारताच्या पथ्यावर पडला होता. याच खेळपट्टीवरभारताच्या वेगवान त्रिकुटाने प्रभाव पाडला होता. रांचीची खेळपट्टी फिरकीला अनुकूल असताना पाहुण्यांना मात्र प्रमुख फिरकीपटू केशव महाराज याच्याविना उतरावे लागणार आहे. सलामीवीर ऐडन मार्करमदेखील या कसोटीत खेळणार नाही.

पहिल्या कसोटीत महागडा ठरलेला ऑफस्पिनर डॅन पिद महाराजच्या जागी खेळणे अपेक्षित आहे. तर मार्करमची जागा जुबेर हमझा घेईल. वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडी तंदुरुस्त झाला तर ऍन्रिक नॉर्केच्या जागी त्याला खेळविण्याचे संकेत मिळत आहे.
भारतीय संघात एखादा बदल संभवतो. पुण्याच्या खेळपट्टीवर ईशांतला ३८ षटके गोलंदाजी करूनही केवळ २ बळी घेता आले होते. उमेश यादव कानामागून येऊन तिखट झाला होता. पाहुण्या संघातील फलंदाजांनी काही बेजबाबदार फटकेदेखील उमेशला ‘लेगसाईड’ला विकेट देऊन गेले होते. मोहम्मद शमीची संघातील जागा पक्की असून अतिरिक्त फिरकीपटूला खेळविण्याचा निर्णय झाल्यास या दोघांपैकी एकावर गदा येऊ शकते.

हनुमा विहारीला पुन्हा संघात घेऊन केवळ चार स्पेशलिस्ट गोलंदाजांसहदेखील भारत उतरू शकतो. चायनामन गोलंदाज कुलदीप यादव जायबंदी झाल्यामुळे त्याच्याजागी संघात शहाबाज नदीमला घेण्यात आले आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये नदीम झारखंडकडून खेळतो. त्यामुळे रांची हे त्याचे घरचे मैदान आहे. त्यामुळे अचंबित करणारे निर्णय घेण्यात हातखंडा असलेल्या कोहली नदीमला कसोटी पदार्पणाची संधी देखील देऊ शकतो.

भारत संभाव्य ः रोहित शर्मा, मयंक अगरवाल, चेतेश्‍वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, हनुमा विहारी, वृध्दिमान साहा, रविचंद्रन अश्‍विन, इशांत शर्मा व मोहम्मद शमी.
दक्षिण आफ्रिका संभाव्य ः डीन एल्गार, जुबेर हमझा, थ्युनिस डी ब्रुईन, तेंबा बवुमा, फाफ ड्युप्लेसी, क्विंटन डी कॉक, सेनुरन मुथूसामी, व्हर्नोन फिलेंडर, डॅन पिद, कगिसो रबाडा व लुंगी एन्गिडी.