‘निर्भया’ प्रकरणी चौघा आरोपींची फाशी कायम

0
111

दिल्लीत डिसेंबर २०१२ मध्ये एका बसमध्ये ‘निर्भया’वर अमानुष अत्याचार करणार्‍या चौघांची फाशीची शिक्षा काल सर्वोच्च न्यायालयाने कायम केली. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती, त्याविरुद्ध आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

एका वेगळ्याच दुनियेतील कहाणी वाटावी अशा प्रकारचे हे अमानुष प्रकरण असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने मृत तरुणीची मृत्युपूर्वीची जबानी ग्राह्य धरून हा पाशवी व राक्षसी गुन्हा सिद्ध होत असल्याचे नमूद केले व या दुर्मिळातील दुर्मिळ गुन्ह्यासाठी चौघाही आरोपींना फाशीची सजाच योग्य असल्याचे स्पष्ट केले. ‘‘जर कोणत्या गोष्टीला फाशी हीच शिक्षा योग्य असेल तर ते हीच’’ असल्याचेही न्यायालयाने सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने हा ४२९ पानी निवाडा दिला तेव्हा खचाखच भरलेल्या न्यायालयातील वकिलांनीदेखील टाळ्यांचा कडकडाट करून निवाड्याशी सहमती दर्शवली. या निवाड्याबाबत ‘निर्भया’ च्या आईवडिलांनी समाधान व्यक्त केले. तिच्या आईच्या डोळ्यांत अश्रू तरारले.
१६ डिसेंबर २०१२ रोजी फिजिओथेरपीची ही २३ वर्षीय विद्यार्थिनी आपल्या मित्रासमवेत चित्रपट पाहायला साकेत येथे गेली असता परतताना बसमध्ये तिच्यावर निर्घृण अत्याचार झाले होते. बसमधील सहा जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला व पाशवी अत्याचार केले व नंतर तिला विवस्त्रावस्थेत रस्त्यावर फेकून दिले होते. सरकारने जनमताच्या रेट्यामुळे तिला सिंगापूरला उपचारार्थ हलवले असता तेथेच तिचे तेरा दिवस मृत्यूशी झुंज घेतल्यानंतर निधन झाले होते. ‘निर्भया’ प्रकरणानंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. ठिकठिकाणी निषेध मोर्चे निघाले होते. चौघा आरोपींना सत्र न्यायालयाने २०१३ मध्ये फाशी सुनावली. त्यानंतर एका वर्षाने उच्च न्यायालयानेही ती फाशी कायम करणारा निवाडा दिला होता.
मात्र, अक्षय ठाकूर, विनय शर्मा, पवन गुप्ता व मुकेश नामक या चौघा आरोपींनी या निवाड्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. रामसिंग हा पाचवा आरोपी तिहार तुरुंगात मार्च २०१३ मध्ये गळफास घेतलेल्या स्थितीत मृतावस्थेत आढळला होता, तर एक अल्पवयीन आरोपी तीन वर्षे सुधारगृहात राहून डिसेंबर २०१५ मध्ये सुटला. त्याविरुद्धही देशभरामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

कायदे कडक बनले
निर्भया प्रकरणात देशभरात उसळलेल्या जनक्षोभाची दखल घेऊन सरकारने महिलाविषयक कायदे कडक केले. बलात्कार प्रकरणांत जलद सुनावण्या होतील हे पाहिले आणि महिलांची छेड काढणे हाही गुन्हा ठरवला.

हा प्रत्येक महिलेचा विजय
‘‘मी खूष आहे’’अशी प्रतिक्रिया निर्भयाची आई आशा देवी हिने दिली. तिचे वडील बी. एन. सिंग यांनी सांगितले की हा केवळ आपल्या कुटुंबाचा विजय नसून तो देशातील प्रत्येक महिलेचा विजय आहे.