निर्भया प्रकरणातील दोषींना २२ रोजी फाशी होणार नाही

0
119

निर्भया बलात्कार व हत्या प्रकरणातील दोषी आरोपींना येत्या २२ जानेवारी रोजी फाशी दिली जाणार नाही. कारण या प्रकरणातील चार आरोपींपैकी एक असलेल्या मुकेश सिंग याने कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या डेथ वॉरंटला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
या संदर्भात आरोपीच्या वकिलाने युक्तीवाद केला की, राष्ट्रपतींनी दया याचना अर्ज फेटाळल्यानंतरही त्याला नियमानुसार १४ दिवसांचा अवधी मिळतो. यामुळे डेथ वॉरंट रद्द करावे.

दिल्ली उच्च न्यायालयातील सुनावणीवेळी दिल्ली सरकारने स्पष्ट केले की, दोषींना २२ जानेवारी रोजी फाशी देता येणार नाही. कारण त्यांनी राष्ट्रपतींकडे दया याचना अर्ज केला आहे. दया याचना अर्जावरील निर्णयाची वाट पहावी लागणार आहे.
दिल्ली सरकारतर्फे असेही स्पष्ट करण्यात आले की, दया याचना अर्ज प्रलंबित असल्यास तुरुंग प्रशासनाच्या नियमानुसार फाशी दिली जाऊ शकत नाही. या संदर्भात सरकार २१ जानेवारी रोजी कनिष्ठ न्यायालयात निवेदन करणार आहे. दया याचना अर्ज फेटाळला जात असल्यासही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार १४ दिवसांचा अवधी नव्या डेथ वॉरंटसाठी द्यावा लागणार आहे.