निर्भयाचे आरोपी आता १ फेब्रुवारीस फासावर

0
140

निर्भया बलात्कार व हत्या प्रकरणातील सर्व चारही आरोपींना आता २२ जानेवारी ऐवजी १ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वा. फाशी देण्यात येणार आहे. दिल्लीतील न्यायालयाने काल त्यांची डेथ वॉरंटस काल नव्याने जारी केली. दरम्यान, राष्ट्रपती कोविंद यांनी आरोपी मुकेश याचा दया अर्ज फेटाळला.

या प्रकरणातील मुकेश कुमार सिंग या आरोपीने आपली फाशीची शिक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी एक याचिका येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश सतीश कुमार यांच्या न्यायालयात दाखल केली होती. त्याआधी काल तिहार तुरुंग अधिकार्‍यांनी या प्रकरणातील चारही आरोपींची नव्याने डेथ वॉरंटस् जारी करण्याची मागणी न्यायालयात केली होती. या अनुषंगाने सरकारी वकील इरफान अहमद यांनी न्यायालयाला माहिती दिली की आरोपी मुकेश कुमार सिंग याची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळली.

मुकेश कुमार यांनी तीन दिवसांपूर्वी दया याचिका राष्ट्रपतींकडे सादर केली होती. मुकेश कुमार सिंग, विनय शर्मा, अक्षय कुमार सिंग व पवन गुप्ता यांना २२ जानेवारी रोजी फाशी देण्याचा निवाडा ७ जानेवारीला जाहीर झाला होता. त्याच दिवशी त्यांची डेथ वॉरंटस्‌ही जारी झाली होती.

तथापि दिल्ली सरकारने उच्च न्यायालयाला सुनावणीवेळी माहिती दिली की आरोपींच्या शिक्षेची अंमलबजावणी ठरल्यानुसार होणार नाही. कारण मुकेश कुमार याने दया याचिका सादर केली आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयाने मुकेश कुमार याची दया याचिका गुरुवारी गृह मंत्रालयाकडे पाठवली. त्याच्या आदल्या दिवशी दिल्ली सरकारने ती नाकारल्याची शिफारस केली होती.