निर्बंध हटवले; सर्व व्यवसाय १०० टक्के क्षमतेने सुरू

0
14

>> राज्य सरकारकडून आदेश जारी; सिनेमागृह, सभागृह, कॅसिनो पूर्ण क्षमतेने खुले

राज्यातील नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याने ५० टक्के क्षमतेने सुरू असलेले कॅसिनो, सिनेमागृह, मल्टिप्लेक्स, सभागृहे, मोठी व्यापारी संकुले यासह अन्य व्यवसाय १०० टक्के क्षमतेने कोविड १९ मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून सुरू करण्याविषयीचा आदेश काल राज्य सरकारकडून जारी करण्यात आला.

राज्यातील कोविड तज्ज्ञ समितीने कोरोनाबाधितांच्या संख्येचा आढावा घेऊन त्यात घट झाल्याने ५० टक्के क्षमतेने सुरू असलेले सर्व व्यवसाय १०० टक्के क्षमतेने सुरू करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर राज्यातील सर्व व्यवसाय १०० टक्के सुरू करण्याबाबत सरकारकडून लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते. त्यानुसार राज्य सरकारच्या महसूल विभागाने कोविड तज्ज्ञ समितीने केलेल्या शिफारशींच्या आधारे प्रस्ताव तयार करून सरकारची मान्यता घेतली. त्यानंतर राज्यातील ५० टक्के क्षमतेने सुरू असलेले सर्व व्यवसाय कोविड मार्गदर्शक सूचनांचे पालन करून १०० टक्के क्षमतेने सुरू करण्याचा आदेश महसूल सचिव रमेश वर्मा यांनी काल जारी केला.

राज्यातील कॅसिनो कोविड मार्गदर्शक सूचनांचे पालन करून १०० टक्के सुरू केले जाऊ शकतात. मास्क, सॅनिटायझर्स, थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करणे गरजेचे आहे. तसेच जलतरण तलाव, स्पा, मसाज पार्लर, रेस्टॉरंट, पब, बार, सभागृहे, व्यायामशाळा, योग केंद्रे, लग्न सभागृह, मनोरंजन पार्क, जलक्रीडा, रिव्हर क्रूझ आदी कोविड १९ मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

सीमेवरील तपासणी बंद
राज्यात नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने विमानतळ, रेल्वे स्थानक, बंदर आणि सीमेवरील कोविड तपासणी बंद करण्यात येत आहे. कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस किंवा ७२ तासांपूर्वीचा कोविड निगेटिव्ह अहवाल असलेल्या व्यक्तींना राज्यात प्रवेश दिला जाणार आहे.