निर्बंध हटवताना

0
38

राज्यातील कोरोना महामारीचा प्रकोप निवळत चालला असल्याचे सुचिन्ह गेल्या काही दिवसांतील सरकारी आकडेवारीवरून दिसते. हे असेच चित्र राहिले तर देशातील पहिले कोरोनामुक्त राज्य होण्याचा मान आपल्या गोव्याला मिळू शकतो. परवाची आकडेवारी पाहिली तर राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या जेमतेम २७१ च्या घरात पोहोचली आहे. गेल्या पाच सहा दिवसांतील आकडेवारी पाहिली तर टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट २.८ वरून १.७९ पर्यंत खाली आलेला दिसतो. अर्थात, त्यामध्ये किंचित चढउतार दिसत असला तरीही तो सरासरी दोन टक्क्यांच्याही खाली दिसतो ही आश्वासक बाब आहे. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे इस्पितळात दाखल करावे लागण्याचे आणि मृत्यूंचे प्रमाणही खाली आलेले आहे. ही त्याहून महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यामुळेच सर्व परिस्थिती पूर्वपदावर येण्याची आशा जागलेली आहे.
राज्य सरकारने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीने या आशादायक परिस्थितीचा फायदा उठवत राज्यातील सर्व व्यवहार शंभर टक्के क्षमतेने खुले करण्याची शिफारस सरकारला केली आहे आणि सरकारही तिची लगोलग अंमलबजावणी करायला निघाले आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेचा विचार सर्व व्यवहार पूर्ववत सुरू होणे ही गोष्ट गरजेची आहे यात काही शंका नाही. परंतु यामधील कॅसिनो शंभर टक्के क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय असेल किंवा सीमांवर लसीकरण न झालेल्या लोकांनाही राज्यात प्रवेश देण्याचा निर्णय असेल, ह्या एवढ्या अत्यावश्यक गोष्टी आहेत का आणि हे करण्यात घिसाडघाई तर होत नाही ना, याचाही विचार खरे तर व्हायला हवा होता. चला, कोरोना संपला अशा आनंदाच्या भरात हा निर्णय झालेला आहे, परंतु त्यातून एखादी चौथी लाट उसळणार नाही हेही पाहिले जाण्याची आवश्यकता आहे, कारण यापूर्वीही कोरोना रुग्णसंख्या अशाच प्रकारे खाली गेली आणि मग अचानक एकाच आठवड्यात तिने पुन्हा उसळी घेतलेलीही आपण पाहिलेली आहे. बंदिस्त वातावरणात वावरताना मास्कचा वापर केला जावा असेही तज्ज्ञ समितीने म्हटले आहे. म्हणजे बाहेर फिरताना मास्क नाही वापरला तरी चालेल असेच समितीला सुचवायचे आहे का?
राज्यामध्ये कोरोनाचा तडाखा सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार तब्बल दोन लाख ४५ हजार जणांना बसला. म्हणजे राज्याच्या तब्बल पंधरा टक्के लोकसंख्येला कोरोनाच्या पहिल्या नाही तर दुसर्‍या नाही तर तिसर्‍या लाटेने तडाखा दिलेला आहे. ज्यांनी चाचणीच केली नाही किंवा ज्यांच्यात लक्षणे दिसली नाहीत त्यांची संख्या यात धरलेली नाही. म्हणजे कुटुंबात एखाद्याला कोरोनासदृश्य लक्षणे दिसली किंवा ती व्यक्ती पॉझिटिव्ह निघाली तर संपूर्ण कुटुंबाने चाचणी न करता थेट उपचार सुरू करण्यात तिसर्‍या लाटेत शहाणपण मानले. हे लक्षात घेतले तर प्रत्यक्षात कोरोनाबाधितांची संख्या सरकारी आकडेवारीच्याही कितीतरी अधिक असू शकेल. आकडेवारीच प्रमाण मानली तर अठरा लाख ८२ हजार कोरोना चाचण्या आजवर राज्यात झाल्या. म्हणजे जवळजवळ राज्याच्या प्रत्येक नागरिकाला कधी ना कधी चाचणी करावी लागली असाही त्याचा अर्थ होऊ शकतो. ३१ हजारांवर जणांना इस्पितळाची हवा खावी लागली आणि त्यातील बारा टक्क्यांहून अधिक म्हणजे तीन हजार आठशेंच्या वर मृत्यू कोरोनाच्या या तिन्ही लाटांमध्ये आपल्या छोट्याशा गोव्यात झाले. सध्या हे मृत्युकांड थांबले आहे आणि रुग्णांना इस्पितळात दाखल करावे लागण्याचे प्रमाणही नगण्य झालेले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने नुकताच कार्निव्हल आटोपून घेतला. आता शिगमोत्सव येईल. या दोन्ही उत्सवांमधून आणि निवडणूक निकालांच्या धुमश्चक्रीमधून एकदा का आपण सुखरूप पार पडलो की कोरोना महामारी संपुष्टात येत चालल्याची खात्री देता येईल. शाळा, महाविद्यालयेही पूर्णतः ऑफलाइन स्वरूपात सुरू होत आहेत. शालेय मुलांमध्ये लसीकरण न झालेल्या मुलांचाही समावेश आहे हे विसरून चालणार नाही. त्यामुळे हे सगळे खुले करीत असताना परिस्थितीवर पूर्ण नजर ठेवणे गरजेचे राहील. आणखी एखादा व्हेरियंट कुठून तरी अवतरून, सगळे काही सुरळीत होण्याच्या आपल्या आशेवर पुन्हा पाणी ओतणार नाही अशी अपेक्षा आहे. आयआयटी कानपूरने नुकतेच कोरोनाच्या चौथ्या लाटेचे भाकीत केले आहे. येत्या जूनमध्ये साधारण २२ जूनच्या सुमारास चौथी लाट देशात अवतरेल आणि ती तब्बल ऑक्टोबरपर्यंत टिकेल; ऑगस्टपर्यंत ही चौथी लाट आपले शिखर गाठेल असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या भावी धोक्यांना डोळ्यांआड करीत कोरोना कमी झाला म्हणून तज्ज्ञ समितीने चेकाळल्यागत वागू नये. सावधपणे पावले टाकणे हेच दूरचा विचार करता श्रेयस्कर ठरेल.