4 वर्षीय मुलाच्या खून प्रकरणात अटकेत असलेल्या सूचना सेठ हिने काल तपासकामात सहकार्य केले. कळंगुट पोलिसांनी सूचना हिला हॉटेलमधील खोलीत नेल्यानंतर तिने क्राईम सीन रिक्रिएट केला, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. मागील दोन दिवस सूचना सेठ तपासकामात सहकार्य करीत नव्हती. त्यामुळे तपासकाम प्राथमिक पातळीवर होते.
पती-पत्नी यांच्यातील वादातून सिकेरी येथे हॉटेलमध्ये सूचना सेठ हिने आपल्याच चार वर्षांच्या मुलाचा खून केल्याचे प्रकरण देशपातळीवर गाजत आहे. अजूनपर्यंत सूचना सेठ हिने मुलाच्या खुनाची स्पष्ट कबुली दिलेली नाही. 6 ते 8 जानेवारी या काळात सूचना सेठ हिचे सिकेरीतील एका हॉटेलमध्ये वास्तव्य होते. पोलिसांनी या खून प्रकरणाच्या तपासासाठी जिथे मुलाचा खून केला, त्या हॉटेलमध्ये सूचनाला नेण्याचा प्रयत्न शुक्रवारी सकाळपासून सुरू केला. सकाळच्या सत्रात सूचना सेठ हिने हॉटेलमध्ये जाण्यास स्पष्ट नकार दिला. संध्याकाळच्या सत्रात पोलिसांनी पुन्हा एकदा सूचना सेठ हिला हॉटेलमध्ये नेण्यासाठी प्रयत्न केला. सुरुवातीला हॉटेलमध्ये जाण्यास नकार दिला; मात्र संध्याकाळी 5 च्या सुमारास हॉटेलमध्ये जाण्यास होकार दिल्यानंतर हॉटेलमधील खोलीत तिला नेण्यात आले. सुमारे तासभर सूचना सेठ आणि तपास अधिकारी हॉटेलच्या खोलीत होते. त्याठिकाणी मुलाच्या खुनाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. आपल्या हाताची नस कापण्यासाठी वापरलेला कटर दाखविला. तसेच, मुलाचा मृतदेह बॅगमध्ये कसा भरला याची माहिती दिली; मात्र आपण मुलाचा खून केला नाही, असा दावा तिने केला.