– विष्णू सूर्या वाघ
कीर्तन करण्यासाठी म्हणून डोंगरीत आलेले मोरेश्वरबुवा वाळिंबे माझ्या जीवनात जबरदस्त परिवर्तन घडवून गेले. एका पक्क्या विचाराचं बीज माझ्या मनात रुजवून गेले…
आपण इतरांपेक्षा कमी आहोत ही भावना सर्वप्रथम मनातून काढून टाका. भले आपल्या अवतीभवती विषमता असेल, कुणी जातीच्या बळावर स्वतःला श्रेष्ठ समजतील, कुणी सत्तेच्या बळावर आपणाला उच्च म्हणवतील, कुणी संपत्तीच्या बळावर आम्ही किती श्रीमंत आहोत याचं प्रदर्शन करीत फिरतील… पण त्यांच्या या अहंकाराचा फुगा फोडण्यासाठी एकच छोटी सुई लागते- विद्येची, ज्ञानाची!
विद्या व ज्ञान यांची तुलना मी सुईशी केली म्हणून आपल्याला आश्चर्य वाटलं असेल. शेवटी सुई म्हणजे काय- एक यःकश्चित वस्तू! पण आकाराने लहान व किमतीने स्वस्त असली तरी सुईची ताकद किती प्रचंड असते ते आपणा सर्वांना माहीत आहे. सुईला स्वतःचं काही अस्तित्व नाही. पण तिच्यात दोरा ओवला की ती शक्तिशाली बनते. या सुईच्या बळावर आपण कपडे शिवतो, हार ओवतो, फाटलेल्या कापडांना ठिगळं लावतो. सुईत लावलेला दोरा जितका टणक असेल तितकी सुईची शिवण भक्कम असते. म्हणून ‘विद्या’ ही सुईसारखी आहे आणि ‘अभ्यास’ हा त्या सुईत ओवता येणारा दोरा आहे. जितका अभ्यास मजबूत होईल तितकी तुमची विद्या तेजोमय होत जाईल. म्हणून अभ्यास करणं, मेहनत घेणं हा प्रत्येक विद्यार्थ्याचा निदिध्यास बनला पाहिजे.
प्राचीन काळी आपणाकडे गुरुकुल पद्धती होती. पुत्र शिकण्यालायक झाला की त्याला गुरूच्या आश्रमात पाठवलं जायचं. विद्यार्जनासाठी एकदा का तो घराबाहेर पडला की तिथलं शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यानं घरी परत यायचं नाही. एका परीनं आश्रम म्हणजे त्याकाळचं बोर्डिंग स्कूल होतं. त्या आश्रमात राहणं साधीसुधी गोष्ट नसे. तिथं विद्यार्थ्याला सर्व कामं करावी लागत. प्रसंगी गुरूची सेवाही करावी लागे. काहीवेळा गुरुजी कठोरपणे शिष्यांची परीक्षाही घेत. मुद्दाम शिष्याला शारीरिक-मानसिक-आंतरिक त्रास होईल अशा प्रकारची कामं करायला लावायचे. अर्थात यात त्यांचा हेतू विद्यार्थ्यांना सतावण्याचा नव्हता. पण हा मुलगा शिकायला इथं आला आहे, तर त्याची त्यासाठी कष्ट उपसायची तयारी आहे का नाही हे ते अधूनमधून तपासून बघत. आज असं काहीही करायची सोय राहिलेली नाही. निदान आमच्यावेळी तरी गुरुजींना मुलांना मारण्याचं स्वातंत्र्य होतं. गुरुजींचं दुसरं नाव ‘छडी’ असतं असं वाटण्याइतपत काही शाळांत गुरुजींची दहशत होती. तळहातावर उभ्या पट्टीचे फटके देणे, पेरूच्या किंवा चिंचेच्या फोकानं पायावर रट्टे मारणं, पाठीवर पुस्तकं ठेवून तास- दीड तास ओणवं राहायला लावणं, मांडीला किंवा कानाला कडकडून चिमटा घेणं अशा शिक्षा आम्हाला सर्रास दिल्या जात होत्या. पण त्यांचं फारसं कुणी मनावर घेत नसे. कारण घरात आपल्या पोरांना दोन फटके लगावण्याचा अधिकार बापाला असेल तर शाळेत तोच अधिकार शिक्षकाला असला पाहिजे ही त्याकाळची मनोवृत्ती होती. आजचा जमाना ‘कॉर्पोरल पनिशमेंट’चा आहे. मुलांवर थप्पड-बिप्पड मारणं सोडाच, पण साधं डोळे वटारून बघणं हासुद्धा गुन्हा होऊ शकतो. मुलांना शिक्षा केल्याबद्दल आजकाल शिक्षकांवर लगेच पोलिसांत कसे गुन्हे दाखल होतात हे आपण हल्ली वर्तमानपत्रात वाचलं असेलच. असो.
आपला मूळ मुद्दा होता तो ज्ञान मिळवण्यासाठी मेहनत करण्याचा- परिश्रम घेण्याचा. याच पद्धतीला आपण ‘अभ्यास’ म्हणतो. अभ्यास म्हणजे पाठपुरावा. अभ्यास म्हणजे तालीम. अभ्यास म्हणजे सराव. कुठलीही विद्या बरोबर अभ्यास केल्याशिवाय साध्य होत नाही. परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आपण अभ्यास करतो म्हणजे काय करतो? शाळेत शिक्षकांनी शिकवलेलंच पुन्हा शिकतो की नाही? हाच अभ्यास. पहिला डोळस अभ्यास आणि दुसरा आंधळी घोकंपट्टी.
यातल्या दुसर्या प्रकाराबद्दल आधी विचार करू. ‘आंधळी घोकंपट्टी’ म्हणजे काय तर कोणताही विचार न करता केलेली पोपटपंची. काही मुलं वाचलेले धडे पटापट पाठ करतात. यातला कुठलाही भाग म्हणून दाखव असं सांगितलं तर घडाघडा म्हणून दाखवतात. पण अमुक एका ओळीचा अर्थ काय असं विचारलं की त्यांची विकेट उडते. कारण घोकंपट्टी करताना त्यानी निव्वळ शब्दांची रचना ध्यानात घेतलेली असते. त्यामागचा अर्थ समजून घेण्याचा अजिबात प्रयत्न केलेला नसतो.
याउलट आहे तो डोळस अभ्यास. या अभ्यासाला घोकंपट्टीपेक्षा अधिक वेळ लागतो खरा; पण डोळस अभ्यासाची सवय लावून घेतली की आपल्या विद्येचा पाया मजबूत होत जातो. निवडलेला विषय त्यातील खाचाखोचांसह कळायला लागतो. शिक्षकांनी वर्गात शिकवलं होतं त्यापेक्षा अधिक आपल्याला कळायला लागतं आणि ज्ञानाच्या बाबतीत परावलंबी न होता आपण ‘स्वयंभू’ होत जातो.
अभ्यास कसा करावा याविषयी बरंच काही लिहिता येईल. अभ्यास हे विद्येकडं जाण्याचं महाद्वार आहे. अभ्यासाखेरीज कुठलीही विद्या, कुठलंही ज्ञान प्राप्त होत नाही. समजा तुम्हाला संगीत शिकायचंय, गायक व्हायचंय किंवा नामांकित वादक बनायचंय… मग तुम्ही काय करता? आधी कुठल्या तरी गुरूकडे जाऊन संगीताचे प्राथमिक धडे घेता. संगीतामधील सात सुरांची तोंडओळख करून घेता. एकापाठोपाठ एक हे सूर लावण्याचा प्रयत्न करता. त्यांच्यामधील फरक जाणून घेता. रिषभपेक्षा गंधार कसा निराळा आहे आणि निषाद व धैवत यात काय फरक आहे ते या पातळीवर शिकावं लागतं. पुढं तुम्ही दुसर्या गुरूकडं जाता. राग-रागिण्यांचं, आलापीचं शिक्षण घेता. तिथं एकदा जम बसला की मग एका चांगल्या परिपक्व गुरूचा शोध घेता आणि त्याला समर्पित होऊन संगीताच्या क्षेत्रात तुमचंही प्रावीण्य प्रस्थापित करता. पण गुरू काही चोवीस तास तुमचा अभ्यास घेऊ शकत नाही. तो तुम्हाला रागाची माहिती देतो. त्याचा आकार, सौष्ठव दाखवतो. त्यातल्या काही चमकदार जागा दाखवतो. बाकी सगळं तुम्ही करायचं असतं तुमचं स्वतंत्रपणे. एकेकाळी काही घराण्यांत गुरूंची सही सही नक्कल करण्याची प्रथा होती. परिणामस्वरूप गुरू नाकातून गायला लागले की शिष्यही नाकातून गात. वृद्धपणी दात पडल्यामुळे काही गुरूंचे शब्द बोबडे ऐकू येत. पण त्यांची कॉपी करणारे शिष्य आपले सर्व दात शाबून असतानाही गुरूचं ऐकून बोबडे गायचे. हे अंधानुकरण.
अभ्यास, अभ्यास म्हणजे काय? तर डोळसपणे केलेला सराव. एखादं नाटक बसवायचं असेल तर आपण नाटकाच्या तालमी करतो. का? तर भूमिकेचा सराव व्हावा म्हणून! अन्यथा नाटकातले डायलॉग तोंडपाठ करून आपण डायरेक्ट स्टेजवर आलो असतो. पण तसं होऊ शकत नाही. तुम्ही जेवढ्या तालमी घ्याल तेवढी तुमची भूमिका अधिक चांगली वठेल. म्हणजे त्या व्यक्तिरेखेचा अभ्यास तुम्ही आधी केला पाहिजे. ती भूमिका हिरोची आहे की व्हिलनची, हिरोईनची आहे का व्हॅम्पची, कॅरेक्टर रोल आहे की कॉमेडियनचा यावर भूमिकेचं निभावणं आवश्यक असतं. पुन्हा आपली बनस्थानं काय व मर्यादा कोणत्या तेही लक्षात घेतलं पाहिजे. एखादा माणूस काडीपैलवान असेल तर भीमाच्या भूमिकेत तो कसा शोभून दिसेल? दिसणार नाही. पण त्यानं ‘मला भीमच करायचाय’ असा हट्टच धरला तर? त्याची स्वतःची भूमिका तर खड्ड्यात जाईलच, पण नाटकाचाही पार विचका होईल.
अभ्यासाबाबत तिसरं उदाहरण देता येईल ते खेळातलं. समजा एखाद्या क्रिकेटपटूला वाटलं की आपणाला सचिन तेंडुलकरसारखं यश आणि प्रसिद्धी मिळाली पाहिजे. पण नुसतं वाटल्यानं त्याला ती मिळणार आहे का? सचिन तेंडुलकर क्रिकेटविश्वात महान का बनला? विक्रमांचे डोंगर त्याने कसे प्रस्थापित केले? त्याच्याकडे अंगभूत प्रतिभा तर होतीच, पण रमाकांत आचरेकर यांच्यासारखा गुरू त्याला लाभला व आचरेकर सरांनी सचिनला क्रिकेट खेळण्याची दृष्टी दिली. त्याप्रमाणे त्याने कसून सराव केला. आपली स्वतंत्र शैली निर्माण केली. आपले ध्येय निश्चित केले आणि क्रिकेटविश्वात आपले चिरायू साम्राज्य स्थापन केले. त्याच्याइतकाच प्रतिभावान शारदाश्रमात शिकणारा त्याचा वर्गमित्र विनोद कांबळी होता. त्याची शैली सचिनपेक्षाही मजबूत होती. पण क्रिकेटविश्वात तो फार पुढं गेला नाही. का? कारण मध्येच त्याची नजर ध्येयावरून हटली. त्याचेही गुरू आचरेकरच होते. पण जो डोळसपणा सचिनने दाखवला ते काम विनोदला जमलं नाही.
हायस्कूलला गेल्यानंतर असा ‘डोळस’ अभ्यास करण्याची प्रेरणा मला दिली ती माझ्या आझमाने हायस्कूलचे हेडमास्टर एडवर्ड सिल्वा यांनी. डिसिल्वा सर हे स्वतः उत्तम शिक्षक होते. ते इंग्रजी शिकवायचे. शेक्सपियर, जॉर्ज बर्नार्ड शॉ, सॉमरसेट मॉम, मार्क ट्वेन, पी. बी. शेली ही सगळी नावं मी त्यांच्या तोंडून ऐकली. इंग्लिश कविता शिकवण्यात तर त्यांचा हातखंडा होता. ते मला नेहमी सांगायचे- ‘डोंट रिड व्हॉट इज प्रिंटेड ऑन युवर बुक, ट्राय टू रिड व्हॉट इज नॉट प्रिंटेड – रिड बिटवीन द लाईन्स!’
किती समर्पक उपदेश होता हा! ‘रिड बिटवीन द लाईन्स!’ नुसत्या ओळी वाचू नकोस… दोन ओळींच्या मध्ये जे अंतर आहे, जो रिकामा स्पेस आहे त्यात काय लिहिलंय ते वाच!
सिल्वा सरांचा हा उपदेश मी मनोमन स्वीकारला. नुसती घोकंपट्टी करणं मला कधीच आवडलं नव्हतं. विद्यार्थ्यांमध्ये त्याकाळी नवनीतच्या ‘गाईड’ची चलती होती. प्रत्येक विषयावर नवनीतचे गाईड निघत व विद्यार्थी खुलेआम त्यांचा वापर करीत. का कुणास ठावूक, मला मात्र ‘गाईड’चा वापर करणं ठीक वाटत नव्हतं. गाईडवरून घेतलेलं शिक्षण हे बाटलीतून भरवलेल्या दुधासारखं आहे असं मला वाटत होतं. यामुळं मी गाईडचा वापर कधीच केला नाही.
अभ्यास करण्याची माझी पद्धत जराशी वेगळी होती. एखाद्या विषयाचा पुस्तकातील धडा आधी मी वाचून काढायचो. मग दहा-पंधरा मिनिटं शांत बसून आपण आता काय वाचलं यावर विचार करायचो. मग पेन व वही घेऊन तोच धडा किंवा त्याचा भाग माझ्या शब्दांत लिहून काढायचो. मूळ पुस्तकातील उतारा व मी लिहिलेला उतारा यातील फरक, त्रुटी, साम्य इत्यादींची तुलना करायचो. काही महत्त्वाचं नजरेतून सुटलंय असं वाटलं तर तेवढा भाग पुन्हा लिहून काढायचो. असं करत करत माझा अभ्यास व्हायचा.
दहावीला पोचल्यानंतर मी आणखी एक गोष्ट केली. मागच्या पाच वर्षांतले बोर्डाच्या दहावीच्या (मार्च तसेच ऑक्टोबर) दोन्ही परीक्षांच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका मागवून घेतल्या. त्या प्रश्नपत्रिकांतील प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे मी अधिक लक्ष दिलं. त्यामुळं पेपरचा पॅटर्न खरोखर कसा असतो याची प्रचिती आली व आपसूकच परीक्षेचा अभ्यास होत गेला.
माझ्या वर्गात मी नेहमीच पहिला येत होतो. ‘ब्रिलियंट’ म्हणून माझा नावलौकिक होता. शाळेच्या विद्यार्थी मंडळावरही मी ‘सरचिटणीस’ म्हणून निवडलो गेलो होतो. माझ्या आयुष्यातील ही पहिली नेमणूक अर्थात मतदान न होता शिक्षकांच्या शिफारसीने झालेली!
एस.एस.सी.ची परीक्षा हा त्याकाळी जीवनातला एक मोठा टप्पा मानला जायचा. आज सी.ई.टी.सारख्या परीक्षांमुळे दहावी-बारावीच्या परीक्षांना फारसा अर्थ राहिलेला नाही. त्यावेळी डिस्टींक्शनमध्ये येणं हा बहुमान होता. पण आम्ही पडलो गावातले, खेडवळ विद्यार्थी! गावकुसाबाहेरचं शिक्षणक्षेत्र आम्ही कधी पाहिलंच नव्हतं. त्यामुळं आमची स्वप्नंही तशी फार नव्हती. दहावीत फर्स्ट क्लास मिळाला तरी पुरे असं मला वाटत होतं. त्यामुळे मी शांतपणे माझा अभ्यास चालू ठेवला होता. पण एसएससीची परीक्षा जवळ येत चालली आणि एक वेगळंच संकट माझ्या समोर येऊन उभं राहिलं.
माझ्यासोबत माझे चार वर्गमित्र होते. ते शिकायला यथातथाच होते. कसेबसे काठावर पास व्हायचे. त्या चौघांनाही दहावीच्या परीक्षेत आपण ‘उसळणार’ याची भीती वाटत होती. शिवाय पुरेसा अभ्यासही झाला नव्हता विषयांचा.
एक दिवस चौघेही माझ्याकडे आले. म्हणाले, ‘‘तू पास होणार हे ठरलेलं आहे. आमचं काय?’’ मी म्हणालो, ‘‘तुमचं काय म्हणजे? अभ्यास करा, तुम्हीही पास व्हाल!’’
‘‘पण आमचा अभ्यास घेणार कोण?’’ त्या चौघांमधला ग्लेन नावाचा मित्र म्हणाला.
‘‘सरांना सांगा,’’ मी म्हणालो.
‘‘आता सर ऐकतील?’’ कृष्णनाथ नावाचा मित्र बोलला. ‘‘प्रिलिम्स जवळ ठेपल्या आहेत. पाणी गळ्यापर्यंत आलंय…’’
‘‘एवढं सुशेगाद राहायला कुणी सांगितलं होतं?’’ मीही चिडलो.
मग त्या चौघांनीही आपली कैफियत मला सांगितली. त्या चौघांचाही अजिबात अभ्यास झाला नव्हता व आता राहिलेल्या वेळात तो पूर्ण होईल याचीही खात्री वाटत नव्हती. त्यांची भिस्त होती ती केवळ माझ्यावर. मी महिना- दोन महिने त्यांच्यासोबत राहिलो आणि माझा अभ्यास करता करता त्यांचा अभ्यास घेतला तर किमान पास होण्याइतपत तयारी आम्ही करू असं ते म्हणत होते. पण त्यांच्यासोबत महिना- दीड महिना घालवणं म्हणजे माझ्या स्वतःच्या अभ्यासात जाणूनबुजून खोडा घालणं होतं. दुसरीकडे मित्रांची अडचणही लक्षात येत होती. माझ्यापेक्षा दुसरा कुणीही या मर्यादित वेळेत त्यांना शिकवू शकला नसता!
माझा अभ्यास सोडून यांचा घेऊ की बसू दे यांना झक मारत. आपण आपल्यापुरते पाहून घेऊ असा यक्षप्रक्ष फडा काढून माझ्यापुढे उभा राहिला…(क्रमशः)