कामकाज चालू देण्याचे आवाहन
केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी माफी मागितली असल्याने आता विरोधकांनी संसदेचे कामकाज चालू द्यावे अशी विनंती काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत केली. सार्वजनिक जीवनात बोलताना सभ्यता पाळा असा सल्लाही त्यांनी आपल्या सहकार्यांना दिला.दरम्यान, साध्वी निरंजन यांच्यावर कठोर कारवाईची मागणी विरोधकांनी कायम ठेवली असून ही मागणी पूर्ण होईपर्यंत सभागृहाचे काम सुरळीत होऊ देणार नाही, असा इशाराही विरोधकांनी दिला आहे.
साध्वी निरंजन यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज गेल्या दोन दिवसांपासून ठप्प झाले आहे. या पार्श्वभूमीवर काल पंतप्रधान मोदी यांच्यावर सभागृहाचे कामकाज सुरळीत करण्याचे आवाहन करण्याची पाळी ओढवली. मात्र त्यांच्या आवाहनचा योग्य परिणाम झाला नाही. त्यांचे आवाहन संपताच विरोधकांनी पुन्हा गोंधळ घालण्यास सुरुवात केली.