निमित्त … युवा वाचक संमेलनाचे

0
156

– सुनीति अ. मराठे

युवक हे देशाचे भावी आधारस्तंभ आहेत. सुजाण युवा वाचक एकत्र यावेत यासाठी यावर्षीचे वाचन संमेलन हे ‘‘युवा वाचक संमेलन’’ या नावाने आयोजित केले आहे. काहीतरी देण्यासाठी आणि काहीतरी घेण्यासाठी युवक नक्कीच उपस्थित राहतील असा समितीला विश्वास वाटतो

माणूस हा उत्साही प्राणी आहे. एकत्र येण्यासाठी, परस्परांमध्ये सुसंवाद घडवण्यासाठी तो वेगवेगळी निमित्तं, कारणं शोधून काढतो. एकत्र येण्यातच त्याला प्रेरणेचे स्रोत सापडतात. प्रचलित निमित्त आहेत.. विवाह, सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथी, कलांचे (गायन, वादन, नर्तन) सादरीकरण आणि शेवटी येते ते वाचन. २८ जानेवारी २०१८ रोजी फोंड्याच्या विश्व हिंदू परिषद सभागृहात सकाळी ९.३० ते १२.३० या वेळेत वाचक सल्लागार समितीने आयोजित केलेले युवा वाचक संमेलन हेही निमित्त आहे.. वाचक युवकांना एकत्र आणण्याचे, त्यांच्यातील ऊर्जा जागविण्याचे, त्यांच्या लेखनाला प्रोत्साहन देण्याचे व लेखनासाठी प्रवृत्त करण्याचे.

फोंड्यातील सुसज्ज सरकारी तालुका ग्रंथालय अनेकांच्या परिचयाचे आहे. १६ डिसेंबर २००२ रोजी ग्रंथालय सुरू झाले. २३ एप्रिल २००३ रोजी श्री. कालिदास मराठे यांच्या धडपडीतून वाचक सल्लागार समिती अस्तित्वात आली. श्री. श्रीधर खानोलकर समितीचे अध्यक्ष बनले. अनेक उत्साही, वाचनवेडे समितीचे सदस्य बनले. या सल्लागार समितीचे काही उद्देश होते.
१) वाचनालयाच्या सभासदांची संख्या वाढवणे.
२) ग्रंथालयाची वेळ वाढवणे.
३) सुटीच्या दिवशीही वाचनालय चालू हवे.
४) वाचनाशी संबंधित कार्यक्रम करणे.
समितीनं उद्देशपूर्तीसाठी धडपड सुरू केली. २००४ पासून फोंड्यात वसंत व्याख्यानमाला आयोजित केली. दरवर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सलग तीन दिवस तीन व्याख्याने आयोजित केली जातात. आजपर्यंत अनेक नामवंत वक्ते व्याख्यानमालेला लाभले. उदाहरणादाखल काहींच्या नावाचा उल्लेख- श्री. निनाद बेडेकर, भानू काळे, अनिल अवचट, कविता महाजन, अनुराधा प्रभुदेसाई, भारत सासणे, इंद्रजित भालेराव, उत्तम कांबळे, गिरीश कुबेर.
समिती सदस्यांनी आपल्या खिशांतून वाचनालयाचे डिपॉझिट भरून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाचनालयाचे सभासद बनवले. ग्रंथालयाची वेळ वाढली व सुटीच्या दिवशी ग्रंथालय खुले राहू लागले.

आता वेगवेगळ्या निमित्ताने वाचकांना एकत्र आणण्याचे उपक्रम सुरू आहेत. पुस्तक परिचय हा कार्यक्रम वर्षांत दोन वेळा घेतला जातो. चालू वर्षांत प्रसिद्ध झालेले पुस्तक व मागील दशकात प्रसिद्ध झालेले पुस्तक अशी विभागणी असते. मे महिन्यात क्रांति मैदानावर हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली जाते. साहित्यिक सहल व वाचन संमेलन हे इतर कार्यक्रम. यावर्षी समितीसदस्य व इतर वाचकांनी महाराष्ट्रातील पुस्तकांच्या गावाला भेट दिली.

युवक हे देशाचे भावी आधारस्तंभ आहेत. सुजाण युवा वाचक एकत्र यावेत यासाठी यावर्षीचे वाचन संमेलन हे ‘‘युवा वाचक संमेलन’’ या नावाने आयोजित केले आहे. संमेलनात एकूण तीन सत्रे आहेत.

पहिल्या सत्रात श्री. अनिल सामंत यांचे व्याख्यान असेल. दुसर्‍या सत्रात ‘‘मी एक वाचक’’ – युवा वाचकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम. तिसर्‍या सत्रात डॉ. अनुजा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित युवा वाचकांचे/कवींचे कविता सादरीकरण असेल.
वाचक सल्लागार समिती सर्व युवकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करते. इथे विचारांचे आदानप्रदान होईल. काहीतरी देण्यासाठी आणि काहीतरी घेण्यासाठी युवक नक्कीच उपस्थित राहतील असा समितीला विश्वास वाटतो. हा विश्वास सार्थ करणे हे युवकांच्याच हाती आहे.