- डॉ. मनाली महेश पवार
सध्या सांधेदुखी, दमा, अपचन, त्वचाविकार, झोप न येणे, उदासीन वाटणे इत्यादी तक्रारी घेऊन रुग्ण दवाखान्यात येत आहेत. काय कारण असेल अशाप्रकारचे आजार किंवा लक्षणे या काळात जास्त उद्भवण्याचे? अहो! उत्तर सोप्पं आहे. हा ‘वातप्रकोपा’चा काळ चालू आहे…
सध्या सांधेदुखी, दमा, अपचन, त्वचाविकार, झोप न येणे, उदासीन वाटणे इत्यादी तक्रारी घेऊन रुग्ण दवाखान्यात येत आहेत. काय कारण असेल अशाप्रकारचे आजार किंवा लक्षणे या काळात जास्त उद्भवण्याचे? अहो! सोप्पं आहे. हा ‘वातप्रकोपा’चा काळ चालू आहे. म्हणजे आपल्या शरीरातील विकृत वात या काळात वाढतो व अशाप्रकारचे वातविकार योग्य आहार-विहार न घेतल्यास, ऋतुचर्येचे आचरण न केल्यास, योग्य औषधोपक्रम न केल्यास उत्पन्न होणारच ना!
आयुर्वेदशास्त्रामध्ये वाताची सर्वोत्तम चिकित्सा म्हणजे स्नेहन. मग ते पोटात घेणे असू द्या, अंगाला लावणे असू द्या, नाहीतर अधोमार्गातून बस्तीद्वारे दिलेले असू द्या; वरील सर्व आजारांमध्ये रोगाचे मूळ कारण असते ते ‘वातदोष!’ त्यामुळे कुठल्याही रोगावर उपचार करताना वातदोषाचे संतुलन प्रामुख्याने करावे. म्हणूनच ‘स्नेहन’नाला (तेल लावणे) अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजची पिढी तेल म्हटलेच की नाक मुरडतात. तळलेले पदार्थ आवडीने खातात, पण शरीराला तेल लावणे, केसांना तेल लावणे, नाकात-कानात तेल घालणे, महिन्यातून एकदा तरी ‘एरंडेल तेला’सारख्या तेलाने आपला ‘गट डिटॉक्स’ करणे अशा आरोग्यदायी सवयींना आपल्या आयुष्यातून हद्दपारच केल्या आहेत. म्हणून काळाची गरज जाणून ‘अभ्यंगा’चे महत्त्व पटवून द्यायचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.
पूर्वीची हाडे घट्ट असायची. सत्तरी ओलांडली तरी केसगळती नाही की केस जास्त पिकलेले नाहीत, पचनक्रिया उत्तम, भूक छान लागायची, मस्त झोप यायची, त्याचप्रमाणे मल-मूत्र विसर्जनाची काही तक्रारच नसायची. अशी प्रकृती पूर्वीच्या लोकांची का बरे असायची? उत्तर एकच- ‘अभ्यंग’! रोज संपूर्ण अंगाला तेल लावायची यांना सवय होती. केसांना रोज तेलाने मालिश करायचे. नाक, कान, तसेच डोळ्यांतदेखील ही लोकं तेल घालायची. 15 दिवसांनी एकदा एरंडेल तेल प्यायची, काहीतर महिन्यातून एकदा तेलाचा एनिमा घ्यायची. या आचरणामुळेच पूर्वीची पिढी सुदृढ व आरोग्यसंपन्न असायची. नियमित तेल लावण्याने सांधेदुखीसारखे वातविकार होत नसत. केसांना तेल लावण्याने केस गळणे, पिकणे यांसारख्या तक्रारी नसायच्या, त्याचप्रमाणे उत्तम झोप लागायची. नाक, कान व डोळ्यात तेल घालण्याने इंद्रियांचे कसलेच विकार होत नसत. एरंडेल तेल सेवन केल्याने किंवा एनिमा घेतल्याने पचनसंस्था नेहमी शुद्ध राहायची. म्हणजे पचनाचे कोणतेच विकार होत नव्हते. यालाच तर आरोग्य म्हणतात.
अभ्यंगाचे महत्त्व
- ‘स्नेहोऽनिलं हन्ति मृदु करोति देहं मलानां विनिहन्तिसंगम्।’ म्हणजे स्नेहामुळे वायू नष्ट होतो, सर्व शरीरामध्ये मृदुता येते आणि मल विबंधता नष्ट होते.
- स्नेहकर्माने वायूचे अनुलोमन होते.
- अग्निप्रदिप्त होतो.
- अंग, प्रत्यंग स्निग्ध व मृदू होते.
शास्त्रकारांच्या मते ज्या मातीच्या घड्यात तूप किंवा तेल ठेवले जाते तो घडा स्नेहाने गुळगुळीत व मजबूत बनतो, त्याचप्रमाणे शरीराची त्वचा चांगली मालीश केल्याने तुकतुकीत बनते. अंग-प्रत्यंग सुदृढ बनते, शरीर कष्टसहिष्णू बनते, वातव्याधीचे शमन होते.
स्नेह चार प्रकारचे असतात. तूप, तेल, कसा (फॅट) आणि मज्जा (बोन मॅरो).
- तुपाचा वापर सेवनासाठी करावा.
- तेलाचा वापर बाह्य मालीश करण्यासाठी करावा.
- आयुर्वेदशास्त्रात सर्व तेलांमध्ये उच्च स्थान तिळाच्या तेलाला दिलेले आहे. त्यामुळे शक्य असल्यास तिळाचे तेल स्नेहनासाठी वापरावे. कोकण प्रांतात नारळाचे प्रमाण जास्त असल्याने खोबरेल तेल स्नेहनासाठी वापरू शकतो. विविध औषधी द्रव्यांनी सिद्ध करून आपण तेलाचा विविध आजारांत वापर करू शकतो.
- अभ्यंगासाठी वापरले जाणारे तेल औषधीसिद्ध असल्यास ते व्यवस्थित प्रक्रिया केलेले असावे. जेणेकरून ते तेल त्वचा, सांधे, डोके वगैरे ठिकाणी आत शोषले गेले पाहिजे.
- अभ्यंगासाठी तेल कोमट असावे. ते कधीही गॅसवर गरम करू नये. साधारण 40 डिग्री तापमानाचे तेल योग्य समजले जाते. तेल गरम करण्यासाठी गरम पातेल्यावर तेलाची वाटी ठेवून तेल गरम करावे किंवा गरम पाण्यात तेलाची वाटी ठेवावी.
- तेलाच्या मात्रेचा विचार करायचा झाला तर वातप्रकृतीच्या व्यक्तीची त्वचा रुक्ष असते. खरबरीतपणा असतो. त्याचे सांधेही वाजतात. वातव्याधीही होण्याची शक्यता असते. त्यामुळे वातप्रकृतीच्या व्यक्तींना तेलाची मात्रा जास्त लागते. अशा व्यक्तीने भरपूर प्रमाणात व दररोज तेल लावावे. कफप्रकृतीची माणसे स्निग्ध असतात, त्वचेमध्ये तेलकटपणा असतो, म्हणून अशा व्यक्तीला कमी तेल लागते.
- वृद्धावस्थेत वातवृद्धी होत असल्याने कोरडेपणा येतो. सांधेदुखीसारखे आजार बळावतात. त्यामुळे स्नेहाची मात्रा जास्त लागते. म्हणून वृद्धांनी तर नियमित अंगाला तेल लावावे.
- सर्वसामान्य नियमानुसार तेल अनुलोम दिशेने लावावे. पाठीला वरून-खाली, पोटाला गोलाकार, गुडघ्यांना पुढून गोलाकार, मागून वरून-खाली, डोक्यावर गोलाकार, स्नायूंच्या आकाराप्रमाणे तेल लावावे.
- तेल वेदनाशामक म्हणून वापरायचे आहे का? शिथिलता कमी करून मजबुती आणायला का? तर यावर तेले विविध प्रकारची व विविध प्रकारे लावली जातात. त्यासाठी वैद्याचा सल्ला घ्यावा.
- अभ्यंगाकरिता तेल लावताना तेल अर्धा तास अगोदर आंघोळीपूर्वी लावावे. सांधेदुखीमध्ये दिवसातून 2-3 वेळा तेल जिरवावे.
- केसांच्या आरोग्यासाठी तेल वापरताना तेल कोमट करावे व केस धुवायच्या आदल्या रात्री केसांच्या मुळांमध्ये जिरवावे. केसांत कोंडा असल्यास तेलामध्ये लिंबाचा रस घालावा. केस गळत असल्यास जास्वंदीची फुले खोबरेल तेलामध्ये सिद्ध करून तेल लावावे. केस पिकत असल्यास भृंगराज सिद्ध तेल लावावे. झोप नीट येण्यासाठी ब्राह्मी सिद्ध तेलाचा पिचू ताळूवर ठेवावा. अशा तेलाचा विशिष्ट पद्धतीने वापर केल्यास केसांचे आरोग्य टिकून राहते.
- गर्भावस्थेतदेखील गर्भवतींच्या संपूर्ण अंगाला हलक्या हाताने तेल लावावे. गर्भवतीच्या पोट, पाठ, मांड्याना तसेच स्तनांना हलक्या हाताने तेल लावावे. चौथ्या महिन्यापासून संपूर्ण अंगाला तेल लावावे. नियमित तेल लावल्याने पायात गोळे येणे, पाय दुखणे वगैरे त्रास कमी होतो. तसेच नववा महिना लागल्यावर किंवा प्रसूतीची वेळ जवळ आल्यावर तेलाचा बस्ती घ्यावा, म्हणजे सुलभ प्रसूती व्हायला मदत होते.
- सूतिकावस्थेत तर स्त्रीला दिवसातून दोन वेळा भरपूर तेल लावून अंग चोळले पाहिजे, म्हणजे प्रसूती पश्चात वाढलेल्या वाताचे योग्यरीत्या शमन होते व कंबरदुखीसारखे त्रास सतावत नाहीत.
- लहान मुलांच्या आरोग्यदायी आयुष्यासाठी अभ्यंग अत्यंत महत्त्वाचे आहे. अगदी बाळ जन्मल्यावर पहिल्या दिवसापासून स्नेहन करता येते. बाळाला रगडून, जोर देऊन तेल लावू नये. त्याने बाळाला त्रास होतो. बाळ रडत राहते व पुढे दोन-तीन महिन्यांतच बाळाचे अभ्यंग बरे होते. म्हणून बाळाला रोज अगदी हलक्या हाताने, खेळत-खेळवत, बोलत तेलाने मसाज करावा. जमिनीवर खाली मऊ धुपटे घालून बाळाला खेळवत मसाज करावा, म्हणजे बाळ मसाजचा आनंद घेतो. स्तन्यपानानंतर साधारण पाऊणएक तासानंतर मसाज करावा. तेल लावल्यावर साधारण 15-20 मिनिटांनी बाळाला आंघोळ घालावी. बाळाचे अभ्यंग पुढे मोठे होईपर्यंत चालू ठेवावे.
अशाप्रकारे अबाल-वृद्धांनी तेलाचे, स्नेहनाचे महत्त्व जाणून रोज अभ्यंग करावे, म्हणजे लवकर म्हातारेही होणार नाही व आजारही उद्भवणार नाही.