बिहारात जेडीयू व भाजप यांच्या युती सरकार स्थापनेविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिका काल पाटणा उच्च न्यायालयाने फेटाळल्या. बिहार विधानसभेत जेडीयू-भाजप युती सरकारने बहुमत सिद्ध केले असल्याने त्यात आता हस्तक्षेप करण्याची गरज नाही, असे ही याचिका निकालात काढताना न्यायालयाने स्पष्ट केले. यासंदर्भात दोन जनहित याचिका दाखल झाल्या होत्या. जेडीयू-भाजप सरकार स्थापनेमुळे एस. आर. बोम्मई प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निवाड्याचे उल्लंघन झाल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता. मात्र न्या. राजेंद्र मेनन व न्या. ए. के. उपाध्याय यांच्या खंडपीठाने तो दावा फेटाळला. राजदचे आमदार सरोज यादव व समाजवादी पक्षाचे जितेंद्र कुमार यांनी या याचिका दाखल केल्या होत्या.