निकाली काढण्याची घाई

0
63

भारतीय जनता पक्षाचे गोव्यातील एक जुनेजाणते नेते श्रीपाद नाईक यांना निकालात काढण्याची घाई पक्षातील काही घटकांना झालेली दिसते. आधी दिलीप परुळेकर आणि आता दयानंद सोपटे यांनी उत्तर गोव्याच्या लोकसभा उमेदवारीसाठीची आपली दावेदारी पुढे केली आहे. श्रीपादभाऊंचे आता वय झाले, त्यामुळे त्यांनी विश्रांती घ्यावी आणि नव्यांना संधी द्यावी असे सोपटे यांचे म्हणणे दिसते. लालकृष्ण अडवाणींना ज्या प्रकारे मार्गदर्शक मंडळात पाठवले गेले, तशा प्रकारे श्रीपाद नाईक यांनाही बाजूला काढण्याची ही जी घाई पक्षातील काही घटकांना झालेली आहे, ती अशी वर्तमानपत्रांतून व्यक्त करणे हे पक्षाच्या प्रतिमेस मारक आहे. भाजपमध्ये उमेदवारी अशी वर्तमानपत्रांतून आपली मागणी पुढे रेटून मिळत नसते. त्यासाठी पक्षाच्या केंद्रीय नेत्यांना आपल्याबद्दल आधी विश्वास द्यावा लागतो. लोकसभेची उमेदवारी म्हणजे काही मूठभर मतांच्या आघाडीवर मिळणारी आमदारकी नव्हे. त्यासाठी स्वतः आधी राजस्तरीय नेत्याचे स्थान मिळवावे लागते. तेवढा राज्यव्यापी जनसंपर्क असावा लागतो. परंतु येथे तर आमदारकीही गमावलेली मंडळी केवळ आपल्या राजकीय पुनर्वसनासाठी लोकसभा उमेदवारीवर दावा करताना दिसत आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत उत्तर भारतातील तीन महत्त्वाची राज्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेवर घसघशीत जागांनिशी जिंकल्याने आगामी लोकसभा निवडणुकीतही मोदी लाटेचा हा प्रभाव दिसेल अशी अपेक्षा सध्या व्यक्त होते आहे. त्यामुळे मोदींच्या नावावर दगड जरी उभे केले, तरी निवडून येतील असे चित्र निर्माण झालेले असल्यानेच अनेकांच्या महत्त्वाकांक्षा पल्लवित झालेल्या दिसतात. श्रीपाद नाईक हे भाजपचे जुनेजाणते नेते. पंच, सरपंच, प्रदेश सरचिटणीस, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, खासदार, केंद्रीय मंत्री अशी त्यांची प्रदीर्घ वाटचाल राहिली आहे. 1972 साली ते प्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आले हे लक्षात घेतले तर गेली पन्नास वर्षे संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि 1977 पासून भारतीय जनता पक्षासाठी त्यांनी आयुष्य वेचले आहे. विनम्रता आणि अजातशत्रुत्व हे श्रीपादभाऊंचे गुणच त्यांना आयुष्यात नवनव्या शिखरांवर घेऊन गेले. मात्र, त्याच बरोबर पुढे पुढे करण्याची वृत्ती नसल्याने आणि पक्षशिस्त अंगात भिनलेली असल्याने त्यांच्यावर वेळोवेळी अन्यायही होत राहिला. लोकसभेचे उपसभापतीपद देतो म्हणून दिल्लीला बोलावून घेऊन ऐनवेळी ते पद झारखंडची विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन करिया मुंडांना देण्यात आले, एवढा प्रदीर्घ राजकीय अनुभव असूनही कॅबिनेट मंत्रिपदासाठी त्यांचा कधी विचार झाला नाही. परंतु हे अपमान त्यांनी निमूटपणे गिळले. आतादेखील पक्ष सांगेल ते करीन ही त्यांची भूमिका राहिली आहे. मात्र, आपल्याला सहाव्यांदा लोकसभेची उमेदवारी मिळायला हवी असे त्यांना वाटते व त्याची काही कारणेही ते देतात. आपण आजवरच्या निवडणुका जिंकून दाखवल्या आहेत व येणारी निवडणूकही आपण हरण्याजोगी स्थिती नाही, आपल्याविरुद्ध कोणताही आरोप नाही, आपला जनसंपर्क आणि मतदारांचा पाठिंबा अजूनही कायम आहे. आपण खासदारकीचा व मंत्रिपदाचा पुरेपूर लाभ गोव्याला वेळोवेळी मिळवून दिला आहे, भाजपची 75 वर्षे वयाची कमाल मर्यादाही आपण अद्याप गाठलेली नाही, प्रकृतीही उत्तम आहे, तरीही आपली उमेदवारी काढून का घेतली जावी हा त्यांचा सवाल आहे. मधल्या काळात भीषण अपघातात पत्नीवियोगाचा दुर्दैवी प्रसंग त्यांच्यावर ओढवला, परंतु त्यातून सावरून श्रीपादभाऊंनी आपले सार्वजनिक कार्य सुरू ठेवले. केंद्रीय मंत्री या नात्याने पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांचा विश्वासही त्यांनी संपादिलेला आहे. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशीही त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. किंबहुना स्वतः डॉ. सावंत यांनी श्रीपाद हेच पक्षाचे आगामी उमेदवार असतील हे दोन तीन वेळा जाहीर केलेले आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी काढून घेण्यासाठी त्यांची प्रदीर्घ काळची खासदारकी सोडल्यास कोणतेही ठोस कारण दिसत नाही. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या तोडीस तोड असा उमेदवार कोणत्याही पक्षापाशी दिसत नाही. खुद्द भाजपमधूनही त्यांना पर्याय म्हणून सध्या जी नावे पुढे केली जात आहेत, त्यांना राज्यस्तरीय स्वीकारार्हताच नसल्याने हा जुगार अंगलट येऊ शकतो. भाजपची उमेदवार निवडीची एक पूर्वापार पद्धत आहे. पक्षातर्फे स्वतंत्रपणे सर्वेक्षण होत असते. सर्व बाजूंचा उहापोह करून, सर्व प्रकारची गणिते मांडून मगच उमेदवारावर शिक्कामोर्तब होत असते. भाजपचे केंद्रीय नेते सुबुद्ध आहेत. ह्या विषयाचा सर्वांगांनी विचार करून ते उमेदवारीबाबत योग्य तो निर्णय घेतील यात शंका नाही.