ना. धों. महानोर यांचे निधन

0
14

ज्येष्ठ साहित्यिक आणि निसर्गकवी म्हणून परिचित असलेल्या नामदेव धोंडो महानोर यांचे काल सकाळी निधन झाले. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बिघडल्याने पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य विश्वातून शोक व्यक्त केला जात आहे. शुक्रवारी पळसखेड या त्यांच्या गावी त्यांच्यावर अंत्यसस्कार करण्यात येणार आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड खेड्यात 16 सप्टेंबर 1942 मध्ये गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या ना. धों. चे बालपण कष्टात गेले; पण कष्ट झेलताना त्यांचे संवेदनशील मन रानात रमले. तिथेच त्यांच्या सर्जनशीलतेला धुमारे फुटले. ना. धों. महानोर यांनी आपल्या साहित्यात काहीवेळा बोलीभाषांचा वापर केला. त्यांच्या ‘रानातल्या कवितां’ना खरा मातीचा गंध यायचा. त्यांच्या गीतांमधून-कवितांमधून निसर्गाचे खऱ्या अर्थाने दर्शन घडायचे. त्यांनी जशी निसर्गाची वर्णन करणारी गीते लिहिली, तशा ठससेबाज लावण्याही लिहिल्या. आपल्या तरल काव्याच्या जोरावर काव्यप्रेमी मराठी वाचकांच्या मनात ना. धों. महानोर यांनी हक्काचे स्थान प्राप्त केले होते. महानोर यांनी काव्यसंग्रहांबरोबरच अनेक चित्रपटांसाठीही गीते लिहिली. त्यांच्या या गीतांना त्यांच्या कवितांप्रमाणेच मराठी प्रेक्षकांची पसंती मिळाली.

ना. धों. महानोर यांचे अनेक कवितासंग्रह वाचकांच्या विशेष पसंतीस उतरले. त्यात अजिंठा या दीर्घ काव्यसंग्रहाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. त्याचबरोबर गंगा वाहू दे निर्मळ, जगाला प्रेम अर्पावे, दिवेलागणीची वेळ, पावसाळी कविता, रानातल्या कविता असे त्यांचे कवितासंग्रह लोकप्रिय ठरले. यासह गपसप, गावातल्या गोष्टी हे कथासंग्रहदेखील वाचकांच्या पसंतीस उतरले.
ना. धों. महानोर यांच्या कवितांनी मराठी काव्यप्रेमींच्या मनावर अक्षरश: गारूड केले. पण याचबरोबर त्यांनी मराठी चित्रपटांसाठीही गाणी लिहिली. 1995 साली त्यांनी अबोली या मराठी चित्रपटासाठी लिहिलेली गाणी विशेष लोकप्रिय ठरली. त्याचबरोबर एक होता विदूषक, जैत रे जैत, दोघी, मुक्ता, सर्जा, उरूस, मालक, अजिंठा आणि यशवंतराव चव्हाण अशा काही चित्रपटांमधील गाण्यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.

साहित्य क्षेत्राबरोबरच ना. धों. महानोर यांनी राजकीय क्षेत्रातही काम केले होते. 1978 साली ते महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य म्हणून नियुक्त झाले होते. मात्र, निवडणुकीच्या राजकारणात ते कधी पडले नाहीत.
आम्ही ठाकरं ठाकरं, चिंब पावसानं रान झालं आबादानी, नभ उतरू आलं, जांभूळ पिकल्या झाडाखाली, जाई जुईचा गंध, किती जीवाला राखायचं, बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती अशी एकाहून एक सरस गीते ना. धों. महानोर यांनी लिहिली.