नाशिकमध्ये बसला झालेल्या अपघातात 23 गंभीर जखमी

0
6

पश्चिम बंगालमधून सुमारे 55 प्रवासी भाविकांना घेऊन निघालेली बस नाशिकमधून देवदर्शन करून पेठमार्गे गुजरातच्या सोमनाथा तीर्थक्षेत्राकडे जात होती. रविवारी (दि. 21) संध्याकाळी पेठजवळ कोटंबी घाटात वळणावर ही बस चालकाचा ताबा सुटल्याने उलटली. यामुळे बसमध्ये असलेल्या प्रवाशांपैकी 41 प्रवासी जखमी झाले. त्यापैकी 23 प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले असून एकूण 31 रुग्णांवर नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. सोमनाथ मंदिर गुजरातच्या सौराष्ट्र प्रदेशातील वेरावळजवळ प्रभास पाटण येथे समुद्रकिनाऱ्यालगत आहे. पश्चिम बंगालचे भाविक शिर्डीमार्गे नाशिकमध्ये रविवारी सकाळी आले होते. येथील पंचवटी, तपोवन परिसरात देवदर्शन घेतल्यानंतर या भाविकांनी सोमनाथ मंदिराच्या दिशेने प्रवास सुरू केला होता. संध्याकाळी साडे पाच ते सहा वाजेच्या सुमारास ही बस पेठजवळच्या कोटंबी घाट चढत असताना अखेरच्या टप्प्यावर बसचालकाचा ताबा सुटला. यामुळे बस उलटून अपघात झाला.