नाल्यांत कचरा फेकणार्‍यांवर कारवाईसाठी कायदा आणणार

0
13

>> जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांचे सुतोवाच; वेर्ण्यात आयएफबीच्या प्लांटला भेट

कचरा टाकण्यासाठी नाल्यांचा गैरवापर करणार्‍या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी कायदा आणणार असल्याचे जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी काल सांगितले.

गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, वेर्णा औद्योगिक असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप दा कोस्ता, गोवा औद्योगिक असोसिएशनचे अध्यक्ष दामोदर कोचकर यांच्या उपस्थितीत रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रक्रियेची पाहणी करण्यासाठी वेर्णा येथील आयएफबी प्लांटला भेट दिल्यानंतर मंत्री शिरोडकर पत्रकारांशी बोलत होते.

आपल्या स्वयंपाक घरातील कचरा नाल्यांत टाकण्याची चुकीची सवय नागरिकांना आहे. हे योग्य नाही. त्यामुळे नाल्यांत कचरा टाकणार्‍यांना आपण दंड ठोठावला पाहिजे. सरकार गाळ काढून टाकतो आणि लोक नाल्यांत कचरा टाकत राहतात. लोकांनी ३६४ दिवस कचरा टाकला आणि आम्ही १ दिवस गाळ काढला, तर त्याचा फायदा होणार नाही. त्यामुळे जे लोक कचरा टाकण्यासाठी नाल्यांचा गैरवापर करतात, त्यांना दंड ठोठावण्यासाठी कायदा आणण्याचे ठरवले असल्याचे शिरोडकर म्हणाले. यावेळी शिरोडकर यांनी वेर्णा औद्योगिक असोसिएशनच्या कार्यालयाला भेट देऊन उद्योगांसाठी लागणार्‍या कच्च्या पाण्याचा प्रश्नही सोडवणार असल्याचे सांगितले. राज्यातील सर्व धरणांमध्ये मुबलक पाणी आहे आणि आम्हाला फक्त पुरवठा सुधारण्याची गरज आहे. त्यासाठी योजना आखल्या असून, त्या त्वरित अमलात आणल्या जातील, असे शिरोडकर म्हणाले.

आयएफबी प्लांटला भेट दिल्यानंतर कंपनीने वापरलेल्या रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रक्रियेमुळे सुभाष शिरोडकर प्रभावित झाले. १०० लिटर पाण्याच्या सरासरी वापराऐवजी केवळ ३० ते ४० लिटर पाणी वापरणार्‍या वॉशिंग मशीनसह विविध उपक्रम हाती घेतल्याबद्दल त्यांनी कंपनीचे कौतुक केले.

आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी उद्योगांच्या तक्रारी लवकरात लवकर सोडवण्यात जातील अशी ग्वाही दिली.