>> मुख्यमंत्री ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याने कारवाई
>> सूडबुद्धीने अटक केल्याचा भाजपचा आरोप
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरमधील गोळवली येथून अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना गोळवलीहून महाड येथे आणण्यात आले. रात्री उशिरा राणेंना महाड न्यायालयात हजर करण्यात आले. त्या ठिकाणी राणे यांना महाड न्यायालयाने जामीन मंजूर केला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी नाशिक येथे नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्याप्रकरणी राणे यांना गोळवली येथून ही अटक केली आहे.
दरम्यान, नारायण राणे यांनी पोलीस कारवाईवर आक्षेप घेत अटक वॉरंटची मागणी केली. त्यामुळे रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकांनी पालकमंत्री अनिल परब यांच्याशी संपर्क साधत ही माहिती दिली. त्यावेळी सत्र न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने जामीन नाकारल्याने आणखी वॉरंटची वाट पाहण्याची गरज नाही. तुम्ही पोलीस फोर्स वापरून अटकेची कारवाई करा, असे परब यांनी अधीक्षकांना सांगितले. त्यानंतर त्वरित राणे यांना अटक करण्यात आली. राणे यांना आता नाशिक पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे.
भाजपचा आरोप
नारायण राणे यांच्या अटकेबद्दल भाजपने सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. अटक करण्यासाठी रत्नागिरीत दाखल झालेल्या पोलिसांकडे कोणतेही अटक वॉरंट नव्हते. राणे यांना अटक करण्यासाठी पोलिसांवर मोठा दबाव टाकण्यात आला होता. पोलीस अधीक्षकांनीच ही माहिती दिली असून कोणत्याही वॉरंटशिवाय केंद्रीय मंत्र्यांवर अशी कारवाई केली जाते याचाच अर्थ हे जंगलराज असल्याचा आरोप भाजपचे प्रमोद जठार यांनी केला आहे.
दरम्यान, राणे यांची शर्करा तसेच रक्तदाब वाढल्यामुळे त्यांची वैद्यकीय तपासणी करून न्यायालयात दाखल केले. यावेळी राणे समर्थकांनी तीव्र विरोध केला. मात्र, पोलिसांनी सर्वांना हटवत कारवाई केली.
राणे यांचा इशारा
यावेळी अटकेच्या कारवाईवर आश्चर्य व्यक्त करतानाच राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट इशारा दिला आहे. मी दुपारी तीन सव्वातीन वाजण्याच्या सुमारास संगमेश्वरमधील गोळवली येथे गोळवलकर गुरुजी आश्रम येथे होतो. तिथे मी जेवण घेत असतानाच डीएसपी तिथे आले. तुम्हाला अटक करण्यासाठी आम्ही आलो आहोत, असे त्यांनी मला सांगितले. मी जेवत असतानाच मला जबरदस्तीने अटक करून तेथून संगमेश्वर पोलीस स्थानकात आणण्यात आले. तिथे चारही बाजूने पोलीस उभे होते. त्यामुळे ज्या अधिकार्याने माझ्यावर अटकेची कारवाई केली त्याच्या हेतूविषयी मला शंका वाटली. दोन तास मला तिथे बसवून ठेवण्यात आले. सगळ्या गोष्टी संशयास्पद होत्या. तो अधिकारी दोन तासांनी पुन्हा आल्यावर संगमेश्वरमधून मला महाडच्या दिशेने नेण्यात येत आहे. तिथे कोर्टात मला हजर केले जाणार आहे, असा घटनाक्रम राणे यांनी सांगितला.
मात्र यावेळी राणे यांनी, मी जे विधान केले आहे त्यावरून गुन्हा होऊच शकत नाही. मला जबरदस्तीने अटक करण्यात आली आहे, असे नमूद करत ठाकरे मुख्यमंत्रीपदावर कायम राहणार नसल्याचा इशारा दिला.
लोकशाहीची हत्या ः पात्रा
भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत ही तर महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाली अशल्याचा आरोप केला आहे. तसेच नारायण राणे यांना सूडबुद्धीने अटक केल्याचाही आरोप पात्रा यांनी यावेळी केला. केंद्रीय मंत्री राणे यांची अटक हे एक गंभीर प्रकरण असून चिंतेचा विषय आहे. हीच का तुमची सहिष्णुता? हेच का तुमचे कायदे? भाजप कार्यालयावर दगडफेक करणे हेच कायदे आहेत का असा प्रश्नही पात्रा यांनी यावेळी विचारला.
महाराष्ट्र सरकारमध्ये २७ असे मंत्री आहेत ज्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचारासहीत वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. मात्र, त्यांच्याविरोधात अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. १०० कोटींच्या खंडणी प्रकरणी राजीनामा देणार्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापर्यंत महाराष्ट्र पोलीस अद्याप का पोहोचू शकलेले नाहीत असा सवालही यावेळी पात्रा यांनी केला आहे.
यात्रा थांबणार नाही ः भाजप
राणे यांना अटक झाली तरी जन आशीर्वाद यात्रा थांबणार नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले असून आता ही यात्रा विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली पुढे नेण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. तशी घोषणा करण्यात आली आहे.
गेल्या २० वर्षांत अटक होणारे
नारायण पहिले कॅबिनेट मंत्री
या अटकेमुळे नारायण राणे हे गेल्या २० वर्षांत राज्य पोलिसांनी अटक केलेले पहिले केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि तिसरे केंद्रीय मंत्री ठरले आहेत.
राज्य पोलिसांकडून अटक झालेले पहिले २ तत्कालीन केंद्रीय मंत्री म्हणजे दिवंगत मुरासोली मारन आणि टी. आर. बालू. ज्यांना चेन्नई पोलिसांनी जून २००१ मध्ये मध्यरात्री अगदी नाट्यमय घडामोडीनंतर अटक केली होती. यावेळी चेन्नई पोलिसांनी मारिन आणि बालू यांच्यासह तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांनादेखील अटक केली होती. दुसर्या दिवशी तत्कालीन केंद्रीय संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस चेन्नईला गेले आणि त्यानंतर या दोन्ही केंद्रीय मंत्र्यांची जामिनावर सुटका झाली होती. तर आता या दोन केंद्रीय मंत्र्यानंतर राज्य पोलिसांकडून अटक झालेले नारायण राणे हे तिसरे केंद्रीय मंत्री ठरले आहेत.
राणेंच्या वकिलाकडून
उच्च न्यायालयात धाव
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये, पुण्यात तसेच नाशिकमध्ये एफआयआर दाखल झाल्यानंतर राणे यांनी तातडीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या तिन्ही एफआयआरच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका राणे यांच्यातर्फे ऍड. अनिकेत निकम यांच्याकडून तातडीने उच्च न्यायालयात दाखल करण्यात येत आहे.
याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती राणे यांच्या वतीने ऍड. अनिकेत निकम यांनी कोर्टाला केली. मात्र, कोर्टाने तात्काळ सुनावणी देण्यास नकार दिला.
महाड न्यायालयाकडून राणेंना जामीन मंजूर
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रात्री महाड न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. रात्री उशिरा राणे यांना महाड दंडाधिकार्यांसमोर हजर करत पोलिसांनी ७ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. परंतु, न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून राणेंना जामीन मंजूर केला आहे.
नारायण राणे यांना गोळवलीमध्ये अटक केल्यानंतर महाडमध्ये आणण्यात आले होते. त्यानंतर महाड न्यायदंडाधिकारी बाबासाहेब पाटील यांच्यासमोर सुनावणी पार पडली. यावेळी, राणे यांचे कुटुंबीयसुद्धा न्यायालयात हजर होते.
यावेळी पोलिसांनी राणे यांची सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली. परंतु, नारायण राणे यांचे वकील आदिक शिरोडकर यांनी युक्तिवाद केला. नारायण राणे यांचे वय आणि प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना जामीन द्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी त्यांनी, राणेंना सुरू असलेल्या औषधांचीही माहिती दिली. राणेंना मधुमेह, उच्चरक्तदाबाचा त्रास आहे, यावर त्यांची औषध सुरू असल्याची माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे नारायण राणे यांना अटक करण्यापूर्वी कोणतीही नोटीस देण्यात आली नसल्याचेही राणेंच्या वकिलांनी यावेळी सांगितले. त्यानंतर न्यायालयाने राणे यांना जामीन मंजूर केला.
रत्नागिरीत मनाई आदेश जारी
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात तणाव निर्माण होऊ नये, यासाठी मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. जिल्ह्यात कोणत्याही प्रसंगी क्षुल्लक कारणावरुन झालेल्या घटनांचे पडसाद उमटून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात २४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेपासून ते ३१ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.