कोणत्याही संघटनेमध्ये सर्वांचे सदाकाळ समाधान शक्य नसते. त्यामुळे मतभेद निर्माण होणे हेही स्वाभाविक असते, परंतु सातत्याने असे मतभेद होत राहिले आणि ते मिटवण्याचा प्रयत्न होण्याऐवजी एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न चालत राहिले तर त्यामधून दुफळी निर्माण होते आणि त्याचे दुष्परिणाम त्या संघटनेला भोगावे लागतात. दुफळी हा झाला पुढचा टप्पा, परंतु त्याचे संकेत देणारी खदखद मात्र आधीपासून सुरू झालेली असते आणि वेळीच तिच्यावर पाणी टाकणे जरूरी असते. भारतीय जनता पक्षामध्ये अशाच प्रकारची नाराजांची खदखद सध्या प्रत्ययास येते आहे. महाराष्ट्रामध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे यांची फेसबुक पोस्ट, त्यानंतर एकनाथ खडसे यांनी पक्षामध्ये ओबीसी नेतृत्वाला मागे खेचण्याचे प्रयत्न होत असल्याचा केलेला गंभीर आरोप, गेल्या निवडणुकीत तिकीट नाकारले गेलेल्या नेत्यांनी चालवलेल्या परस्परांच्या भेटीगाठी आणि येत्या बारा डिसेंबरला गोपीनाथगडावर एकत्र येत शक्तिप्रदर्शनाची चालवलेली तयारी या सार्यामधून भाजपमध्ये सगळेच काही आलबेल नाही याचे स्पष्ट संकेत मिळू लागलेले आहेत. या सगळ्या नाराजीनाट्याला अर्थातच मोठी पार्श्वभूमी आहे. ज्या एकनाथ खडसे यांनी विरोधाचा सूर प्रखर केला आहे ते काही पक्षाचे ऐरेगैरे नेते नव्हेत. अगदी भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपासूनचे ते एक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. सातत्याने जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगरमधून निवडणुका जिंकत आलेले आणि आधी युतीच्या आणि नंतर भाजपच्या सरकारमध्ये महत्त्वाची मंत्रिपदे भूषवलेले खडसे २०१४ साली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचे दावेदार होते, परंतु त्यांच्याजागी देवेंद्र फडणवीस या तरुण नेत्याला एकाएकी आणले गेले आणि खडसेंचा पत्ता काटला गेला. फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद त्यांना जरूर मिळाले, परंतु जमीन घोटाळ्याचा आरोप होताच तीन वर्षांपूर्वी त्यांचे महसूलमंत्रिपद काढून घेतले गेले. गेल्या निवडणुकीत तर त्यांचे तिकीटही कापले गेले. उमेदवारांच्या याद्यांमध्ये आपले नाव नसतानाही खडसेंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. ते राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याचीही चर्चा होती, परंतु शेवटी भाजपने त्यांच्या कन्येला रोहिणी यांना उमेदवारी देताच खडसेंचा बंडोबा थंड झाला होता. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीत रोहिणी यांचा पराभव झाला. शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या उमेदवाराने रोहिणींचा पराभव केला जो एकनाथरावांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे तिच्या पराभवामागे भाजपचे नेतेच असल्याचा त्यांचा थेट आरोप राहिला आहे. पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकताच खडसेंनी त्यांना जाहीर समर्थन देत पंकजांच्या पराभवासही भाजपचे काही नेते कारणीभूत असल्याच्या आरोपाची तोफ डागली आहे. एवढे बोलूनच ते थांबलेले नाहीत, तर पक्षामध्ये ओबीसींचे खच्चीकरण होत असल्याचा त्यांचा आरोप आहे. गेल्या वेळी काही भाजप नेत्यांचे तिकीट कापले गेले, त्यामध्ये विनोद तावडे यांच्यासारखे अभाविपमधून वर आलेले आणि फडणविसांच्या खांद्याला खांदा लावून वावरणारे नेतृत्वही होते. पंकजांच्या नाराजीची चाहुल लागताच तावडेंनी त्यांच्याशी संपर्क साधत त्या भाजप सोडणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले आणि स्वतः पंकजा यांनीही बंडखोरी आपल्या रक्तात नसल्याचे सांगत आपल्या फेसबुक पोस्टवरून उमटलेल्या प्रतिक्रिया शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु तरीही त्यांच्या मनातील खदखद त्या लपवू शकलेल्या नाहीत. या ना त्या कारणाने दुखावलेल्या या नेत्यांचा असंतोष अर्थातच त्यांना लपवता आलेला नाही. संजय राऊत दावा करीत आहेत त्याप्रमाणे भाजपला रामराम ठोकण्याचे आणि शिवसेनेसारखा समविचारी पक्ष जवळ करण्याचे टोकाचे पाऊल हे नेते उचलतील का याबाबत साशंकता आहे, परंतु तरीही भाजपमधील नाराजांचा एक गट एका विचाराने एकत्र येत आहे ही देखील नोंद घेण्याजोगी बाब आहे. नेतृत्वामध्ये सर्वसमावेशकता नसते तेव्हाच अशा प्रकारची नाराजी जन्म घेत असते. भाजपमध्ये सध्या पक्षनिष्ठेपेक्षा जिंकून येण्याच्या क्षमतेला अतोनात महत्त्व दिले जात आहे आणि गोव्यापासून महाराष्ट्रापर्यंत सर्वत्र हेच सुरू आहे. पक्षामध्ये सत्तालोलुप आयारामांची सध्या चलती आहे. साहजिकच पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते दुखावले गेलेले आहेत. अंगात भिनलेल्या पक्षशिस्तीपोटी जरी त्यांनी आपला असंतोष बाहेर येऊ दिलेला नसला तरी अशी अंतर्गत खदखद अंतिमतः पक्षासाठी मारकच असेल. अनेक राज्यांमध्येही आज हेच चित्र आहे. भाजपचे देशातील राजकीय अस्तित्व २०१७ नंतर उतरणीला लागल्याचे जे दिसते आहे, त्याला पक्षाच्या निष्ठावानांमधील ही अस्वस्थताही नक्कीच कारणीभूत आहे. गेल्या निवडणुकीत महाराष्ट्रात आयारामांचा झालेला पराभव बोलका आहे. भाजप नेतृत्वाने याचा विचार करायला हवा. प्रवासी पक्षी सत्ता असेल तेव्हा सोबत येतील, परंतु सत्ता हुकताच उडूनही जातील. उष्टी खरकटी काढायला काही ते सोबत राहणार नाहीत. ती काढायला शेवटी हाडाचा कार्यकर्ताच लागतो. तोच पक्ष बांधत असतो आणि संकटाच्या काळी टिकवतही!