नायब सैनी मुख्यमंत्रिपदी शपथबद्ध

0
1

>> 13 आमदारांना मंत्रिपदाची शपथ; पंतप्रधानांची उपस्थिती

हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणून नायब सिंह सैनी यांनी काल शपथ घेतली. सलग दुसऱ्यांदा ते मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. पंचकुला येथील दसरा मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले.
नायब सिंह सैनी यांच्या शपथविधी सोहळ्याला भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री अमित शहा, नितीन गडकरी आणि राजनाथ सिंह यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही उपस्थित होते.

नायब सिंह सैनी यांच्यासह 13 मंत्र्यांनी यावेळी शपथ घेतली. त्यापैकी सर्वाधिक 5 चेहरे ओबीसी प्रवर्गातील आहेत. जाट, ब्राह्मण आणि एससी प्रवर्गातील प्रत्येकी 2 मंत्री करण्यात आले आहेत. याशिवाय पंजाबी, राजपूत आणि वैश्य समाजातील प्रत्येकी एक मंत्री करण्यात आला आहे.

नायब सैनी यांच्यानंतर अनिल विज यांनी दुसऱ्या क्रमांकावर शपथ घेतली. यानंतर कृष्णलाल पनवार, राव नरबीर, महिपाल धांडा, विपुल गोयल, अरविंद शर्मा, श्याम सिंह राणा, रणबीर गंगवांनी, कृष्णकुमार बेदी, श्रुती चौधरी, आरती राव, राजेश नागर आणि गौरव गौतम यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
8 ऑक्टोबरला जाहीर झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणूक निकालात भाजपने 90 पैकी 48 जागा जिंकत बहुमताचा आकडा पार केला. त्यानंतर नायब सिंग सैनी यांची बुधवारी विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. यानंतर त्यांनी राज्यपालांसमोर सरकार स्थापनेचा दावा केला. काल त्यांनी पंचकुलामध्ये दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.