मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मुरगाव बंदरातून भरकटलेल्या नाफ्तावाहू जहाजाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी उच्चस्तरीय बैठक घेऊन पुढील कार्यवाहीबाबत आढावा घेतला असून या जहाजाच्या कॅप्टनला तात्काळ दंडाधिकार्यांमार्फत अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. नाफ्तावाहू जहाजाची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाखाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बैठकीनंतर बोलताना दिली.
या उच्चस्तरीय बैठकीला महसूल, जिल्हाधिकारी, बंदर कप्तान खात्याचे अधिकारी व इतर सरकारी अधिकारी उपस्थित होते.
भरकटलेल्या जहाजाच्या ऑपरेटरला बोलावून घेण्यात आले असून त्यांच्याकडून जहाजाबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली आहे. सरकारी यंत्रणेने सावधगिरीसाठी विविध उपाय योजना हाती घेतल्या आहेत. महसूल खात्याच्या अधिकार्याचे पथक एकूण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, अशी माहिती सावंत यांनी दिली.
या जहाजाच्या मालकाने नाफ्ता भरून देण्यासाठी दुसरे एक जहाज आणण्याची तयारी दर्शविली आहे. दुसरे जहाज २७ ऑक्टोबरला आणून त्यात नाफ्ता भरला जाणार आहे. या जहाजातील नाफ्ताच्या गळतीबाबत तपासणी करण्यासाठी खासगी आस्थापनाची मदत घेतली जात आहे, अशी माहिती सावंत यांनी दिली.
या जहाजात सुमारे ३००० लीटर नाफ्ता आहे. दोनापावल येथील राजभवनापासून २.५ किलो मीटर अंतरावर जहाज भरकटत आले आहे. मुरगाव पोर्ट ट्रस्ट, जहाज कंपनी आणि कॅप्टनच्या विरोधात आवश्यक कारवाई करण्याची सूचना करण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या शिपिंग मंत्रालयाला या घटनेची माहिती दिली जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.