नाताळ ः सण प्रकाशाचा …

0
20
  • ग्वादालूप डायस

नाताळ हा शब्द कानावर पडताच आपसूकच मनाच्या समुद्रात चैतन्याची लाट उसळते. हृदयात उत्साह संचारतो. पूर्ण गाव नाताळाची तयारी करू लागतो. गोठा, नक्षत्र, तर्‍हेतर्‍हेची मिठाई बनवली जाते. नाताळची रात्र येईपर्यंत कुणालाही चैन पडत नाही.

माझ्या गावातल्या आठवणी आणि आठवणीतला गाव कधीही बसून मी निरखीत असते तेव्हा मला आठवतात ती माझ्या गावातली एके काळची शेते आणि शेत नांगरणारे बैल. मिरांदाच्या नारळीच्या बागेत नारळाच्या चूडीतावर नारळ पाडणार्‍यांचे हिशोब केले जायचे. माझ्या गावात झोपडीतले जीवन होते. त्या झोपडीमध्ये राहणारे कोंयसांव सतत आपले दुःख व्यक्त करून रडत असायचे. तसेच पानात बांधून आणलेली बारीक मासळी मला आठवते. पेद्रूची कोळिणीशी चुकती न केलेली उधारी आणि त्यानंतर तिच्या त्या शिव्या माझ्या कानात वाजतात. कालचे कालवण आटवून ठेवलेली मातीची भांडी माझ्या डोळ्यांसमोर नाचतात.

मला आठवतो माझ्या गावातल्या त्या कोकिळेचा साद आणि चर्चमध्ये होणारा व्हायोलीनचा नाद! किती गोड होता तो घुमटाचा थाप आणि विहिरीच्या कठड्यावर जावा-जावांमध्ये झालेल्या त्या भांडणाचा मनस्ताप!

असेच आठवता आठवता अचानक माझ्यासमोर येतात येशू ख्रिस्ताच्या जन्माचे सोनेरी क्षण! अर्थात नाताळ!
नाताळ हा शब्द लॅटीन भाषेतून आलेला आहे. नाताली दोमीनी. ख्रिसमस! नाताळ हा शब्द इटालियन भाषेतही आढळतो ज्याचा अर्थ आहे जन्मदिवस. शेकडो वर्षापूर्वी रोम शहरांत, आवरेलियन पातशाहाच्या राजवटीत, पंचवीस डिसेंबरला, तिथले पागवान लोक हा उजेडाचा सण म्हणून साजरा करायचे. त्या दिवशी ते सूर्यदेवाची पूजा करीत असत. त्यानंतर कोन्स्तांतीन पातशाहा सत्तेवर आला. तेव्हा ख्रिस्ती विचारवंतांनी हा सण म्हणजेच येशू ख्रिस्ताच्या जन्मदिवसाचा सण म्हणून साजरा करायचे ठरवले. येशू ख्रिस्त म्हणजे सत्याचा सूर्य. अशा प्रकारे उजेडाचा सण नाताळच्या सणांत बदलला.

नाताळ सण पूर्ण जगात वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. गोव्यामध्ये हा सण २५ डिसेंबर रोजी उत्साहात साजरा करतात. हो! माझा गाव जरी धावपळीच्या शहरात हरवला आहे तरीही नाताळ हा असा एक सण ज्याचे मूळ रूप अजूनही आमच्या गावात टिकून राहिले आहे.

थोडक्यात येशू ख्रिस्ताच्या जन्माची गोष्ट अशी आहे- संपूर्ण दुनिया पापाच्या अंधारात बुडून गेली होती. गुलामगिरीत खितपत पडलेली इस्रायलची प्रजा सुटकेची वाट बघत होती. पवित्र ग्रंथांत लिहून ठेवल्याप्रमाणे त्यांची सुटका करण्यासाठी कोणीतरी जन्माला येणार होता. अशा वेळी देवाने आपल्या गॅब्रीयल नावाच्या दूताला गॅलिलियेतल्या नाजारेत नगरांत सोयरीक जुळलेल्या एका कुमारीकडे पाठवले. तिचे नाव मारिया होते. दावीद घराण्यांतल्या जुजे नावाच्या पुरुषाशी तिच्या लग्नाची बोलणी झाली होती. दूताने सांगितल्याप्रमाणे पवित्र आत्म्याच्या शक्तीने ती गरोदर राहिली.

जुजेला ही बातमी समजताच त्याने तिला गुप्त स्थळी सोडून देण्याचे ठरवले. त्या काळी अविवाहितेला गर्भधारण केल्यास दगडानं मारायची शिक्षा होत होती. म्हणून तर तो तिला गुपचूप सोडून द्यायचा विचार करत होता. पण त्याच रात्री दूताने स्वप्नात येऊन त्याला देवाची योजना कळवली.

ज्येष्ठ साम्राज्याच्या पूर्ण संसाराची लोकगणती करण्याचा हुकूम निघाला. दाविदच्या घराण्याचा आणि गोत्राचा अंश असलेला जुजे, गॅलिलीयेतल्या नाजारेत नगरातून, जुदेयेतल्या बेथलहॅम ह्या दाविदच्या नगरात गेला. गरोदर असलेल्या आणि आपल्याशी लग्न करण्यास वचनबद्ध झालेल्या मारियाचे नाव नोंदवण्यासाठी तिला आपल्या सोबत नेली. तिथे असतानाच तिचा प्रसूतीकाळ जवळ आला. आसरा घेण्यासाठी खानावळ अथवा कुठेही जागा न मिळाल्याने मारियाला गोठ्यात आपल्या बाळाला जन्म द्यावा लागला. त्यामुळे नाताळच्या सणाला गोठा बनवण्याची प्रथा अस्तित्वात आली!

नाताळ हा शब्द कानावर पडताच आपसूकच मनाच्या समुद्रात चैतन्याची लाट उसळते. हृदयात उत्साह संचारतो. पूर्ण गाव नाताळाची तयारी करू लागतो. गोठा, नक्षत्र, तर्‍हेतर्‍हेची मिठाई बनवली जाते. नाताळची रात्र येईपर्यंत कुणालाही चैन पडत नाही.
सर्वप्रथम घरादाराच्या भिंतींना रंग लावला जातो. अंगणात झाडलोट करून स्वच्छ करणे, आजूबाजूला उगवलेले गवत उपटून ते जाळणे… यांसारखे उपक्रम चालू असतात. ह्या कामांत पुरुष-स्त्रिया, लहान-थोर सगळेच आपला हातभार लावतात. एकदा हे काम मनासारखं झालं की गोठा तयार करण्याची गडबड असते. हा गोठा जास्त करून घराच्या बाहेर करतात. दहा-पंधरा दिवसापूर्वी गोठा तयार करण्याची तयारी सुरू होते. कोणी शेतातील माती तर कोणी ओहोळावर जाऊन गोल दगड गोळा करतो तर कोणी समुद्रातटावरची रेती घेऊन येतो. कुणास नाचणे भिजत घालण्याची काळजी तर कुणास टेकडीवर जाऊन गवत आणण्याची चिंता. आगपेट्यांतील काड्यांचा पूल पण बनवतात. बालक येशूच्या भेटीला आलेल्या त्या तीन विद्वानांचे स्मरण करून लहान राजवाडे सजवतात. त्यांच्यासाठी वेगवेगळ्या दिशेने तीन रस्ते बनवले जातात. सावकाशपणे हे सगळे काम पूर्ण होते. गॅस्पर, बाल्ताझार आणि मेल्किअर ही ह्या तीन विद्वानांची नावे आहेत!
येशू ख्रिस्ताचा जन्म झाला त्यावेळी एक वेगळाच तारा आकाशात उगवला. पवित्र पुस्तकात ह्याविषयी पूर्वीच लिहून ठेवले होते. त्याचा अभ्यास ह्या विद्वानांनी केला होता. त्यानुसार बालक येशूस नमस्कार करण्यासाठी ते तिघेही त्या नक्षत्राच्या दिशेने बाहेर पडतात. ह्याचसाठी त्या तीन विद्वानांच्या प्रतिमा गोठ्यात ठेवण्याची प्रथा आहे.

गोठ्यातील मेंढरे-गायी ह्यांना पाणी पिण्यासाठी तयार केलेली विहीर, एक छोटासा धबधबा तसेच लहानशी मातीची, पुठ्‌ठ्याची किंवा गवताची घरे गोठ्याच्या सौंदर्यात भर घालतात. त्या लहानशा गोठ्यात बालक येशूसाठी तयार केलेली गादी सगळ्यांचे लक्ष वेधून घेते. गोठ्याच्या वरती एक लहानसा कृत्रिम तारा टांगला जातो. मग सगळेजण उत्सुकतेने नाताळच्या रात्रीची वाट बघतात!
स्वयंपाकघरात निरनिराळे गोड पदार्थ करण्याची धावपळ सुरू होते! करमल, करंज्या, नारळापासून तयार केलेले घोंस, केक असे अनेक पदार्थ बनवले जातात! ह्याचा सुगंध चारही दिशांतून पसरतो. नाताळ अगदी उंबरठ्यापर्यंत पोचला आहे ह्याची जाणीव होते.

येशूच्या जन्माची खूण म्हणजे तारा. हल्ली बाजारात विविध प्रकारचे कृत्रिम तारे विकायला असतात. तरीही बांबूपासून तारा तयार करण्यात एक आगळी-वेगळी मजा असते.
मला आठवते, लहानपणी खूप थोड्या लोकांच्या घरी वीज होती. तेव्हा हा तारा आकड्याला लावून वरती टांगायचे. त्यात एक केरोसीनचा दिवा लावून ठेवायचे. चांगला जळला तर नशीब! कधी-कधी तारा दोर्‍याच्या मदतीने वर-खाली काढताना आग लागत होती. त्यासाठी खूप काळजी घ्यावी लागायची. ह्या सगळ्या गोष्टी आता खूप सोप्या झाल्या आहेत. आता पडवीत कितीतरी तारे टांगले जातात. काही घरांसमोर नाताळ वृक्ष सजवला जातो. हा वृक्षही प्रकाशमान होतो!

नाताळचा सण म्हणजे प्रेमाचा सण! मानवजातीवर देवाने एवढे प्रेम केले की आपल्या एकुलत्या पुत्रास मानवरुपात ह्या दुनियेत पाठवले. गोड पदार्थांच्या रूपाने हे प्रेम एकमेकास वाटले जाते. ह्या प्रेमाचे आणखी एक प्रतीक म्हणून काही लोक एकत्र येतात. हातात प्रज्वलित केलेले कंदील अथवा नारळाच्या करवंटीत वात पेटवतात. एकटा लाल झगा घालून नाताळबाबा बनतो. तोंडावर पांढर्‍या मिश्या व लांब दाढी असलेला मुखवटा चढवतो. येशू ख्रिस्त जन्माला येणार असल्याचा आनंद नाताळ-गीताद्वारे लोकांपर्यंत पोचवला जातो. ह्या सणाच्या निमित्ताने भौतिक पातळीवर तयारी सुरू होतेच पण त्याचबरोबर आत्मिक तयारीही सुरू होते. ख्रिस्ती श्रद्धाळू लोक चर्चमध्ये आपल्या कर्माची कबुली देतात व क्षमा मागतात. अंधकारमय जीवनाची वाट सोडून प्रकाशमय जीवनाचा आशावाद ठेवतात.
नाताळाची रात्र अगदी मंद पावलांनी उतरून येते. तयार केलेल्या गोठ्यात मारी-जुजे, मेंढरे-गाई, विद्वान, गुराखी ह्यांच्या प्रतिमा ठेवल्या जातात. गवताने आच्छादलेल्या गादीवर बालक येशूच्या प्रतिमेला झोपवतात.

‘कुमसार’ (कबुलीजबाब) देऊन प्रायश्‍चित्त घेतल्याने स्वच्छ झालेले नवे मन, नवे हृदय आणि नवे कपडे! सगळेजण अतिशय भक्तीने प्रार्थनेंत सहभागी होतात. घंटेच्या सुमधुर नादावर, फटाक्यांच्या आवाजावर, गीताच्या तालावर नाताळ सण साजरा करतात!
हो! दिवसेंदिवस काळ बदलत आहे. बदल ही काळाची गरज आहे. एवढे असूनही हृदयांत नाताळ तार्‍यासारखा एक तारा पेटत राहतो. माझ्या गावातल्या अनेक गोष्टी हरवल्या आहेत. तरीपण नाताळ सण साजरा करण्याची ही पारंपरिक अशी गावाकडची रीत मात्र तशीच राहिली आहे!