नाट्यतपस्वी विजयकुमार नाईक यांचे निधन

0
19

गोमंतकीय मराठी रंगभूमीवरील नाट्यतपस्वी, प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक, नाट्यलेखक आणि अभिनेते विजयकुमार विश्वनाथ नाईक (60, रा. वारखंडे-फोंडा) यांचे काल सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे नाट्यविश्वावर शोककळा पसरली आहे. काल संध्याकाळी स्थानिक स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अनेक मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले.

गेल्या काही दिवसांपूर्वी विजयकुमार नाईक यांच्यावर गोमेकॉत उपचार केल्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले होते. गुरुवारी सकाळी अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना फोंड्यातील उपजिल्हा इस्पितळात नेताना वाटेत त्यांचे निधन झाले. 1993 साली हंस नाट्य प्रशिक्षण केंद्राची स्थापना करून नवीन कलाकार घडविण्याचे काम विजयकुमार नाईक यांनी सुरू केले होते. गोव्यासह महाराष्ट्रात सुद्धा विजयकुमार नाईक यांनी नाट्यक्षेत्रात महत्वाचे योगदान दिले होते. त्यांच्या निधनामुळे नाट्यक्षेत्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
विजयकुमार नाईक यांनी अनेक नाटकांचे लेखन केले. याशिवाय एकांकिका, बालनाट्य, एकलनाट्य अशा संहितांचेही लेखन केले. दिग्दर्शन आणि अभियन यातही त्यांचा हातखंडा होता.

नाट्य दिग्दर्शक लाला च्यारी यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. लेखन, दिग्दर्शन, निर्मिती आदी सर्व क्षेत्रात प्रभावी व चिरस्मरणीय ठसा उमटविणारा कलाकार विजयकुमार नाईक यांनी जीवननाट्यातून घेतलेली आकस्मिक ‘एक्झिट’ प्रत्येक कलाकाराचे मन सुन्न करणारी आहे, अशी प्रतिक्रिया लाला च्यारी यांनी दिली.
शिरोडा येथील नाट्य कलाकार लक्ष्मण नाईक यांनी देखील त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

नामवंत नाट्यकर्मी विजयकुमार नाईक यांच्या अकाली निधनाने अतीव दु:ख झाले. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आपण शोक व्यक्त करतो. त्यांच्या निधनाने नाट्यक्षेत्रात पोकळी निर्माण झाली असली तरी विजयकुमार यांच्या ट्रॅव्हलिंग बॉक्स थिएटरमधून त्यांचे विद्यार्थी आणि शिष्य त्यांचा वारसा पुढे नेतील याची मला खात्री आहे. – युरी आलेमाव,विरोधी पक्षनेते