भारताच्या २३ वर्षीय सुमीत नागल याने यूएस ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या दुसर्या फेरीत प्रवेश करताना अमेरिकेच्या ब्रॅडली क्लाहन याचा ६-१, ६-३, ३-६ असा पराभव केला. कोर्ट क्रमांक १२ वर नागल याने दोन तास १२ मिनिटांत आपल्या प्रतिस्पर्ध्याला गारद केले. एकेरी विभागात ग्रँडस्लॅम स्पर्धेची दुसरी फेरी गाठणारा तो सात वर्षांनंतर पहिलाच भारतीय ठरला.
यापूर्वी २०१३ साली सोमदेव देववर्मन याने लुकास लेको (तत्कालीन ८४व्या स्थानावरील खेळाडू) या झेक प्रजासत्ताकच्या खेळाडूला हरवून यूएस ओपनची दुसरी फेरी गाठली होती. त्यावेळी दुसर्या फेरीत सोमदेवला लुकास सेप्पी याच्याकडून पराजित व्हावे लागले होते. दुसर्या फेरीत नागलचा सामना जागतिक क्रमवारीत तिसर्या स्थानावर असलेल्या डॉमनिक थिम याच्याशी होणार आहे. जॉमी मुनार याने पहिल्या फेरीत ६-७, ३-६ असा पिछाडीवर असताना गुडघ्याच्या दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे थिमला दुसर्या फेरीत सहज पोहोचता आले.