नागरी पुरवठा खात्याची सर्व धान्य गोदाम सीसीटीव्ही टेहळणीखाली आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती नागरी पुरवठा मंत्री गोविंद गावडे यांनी दिली.
नागरी पुरवठा खात्याच्या कारभारात सुसूत्रता आणण्यात येत आहे. खात्याची सर्व तालुक्यात धान्य गोदाम कार्यरत आहेत. धान्य गोदामासंबंधी काही तक्रारी येत असल्याने धान्य गोडावूनच्या एकंदर कारभारावर देखरेख ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यासाठी निविदा जारी केली जाणार आहे, असे मंत्री गावडे यांनी सांगितले.
स्वस्त धान्य घेऊन तालुका धान्य गोदाममध्ये जाणारे मालवाहू ट्रक पूर्वी तालुका गोदाममधील धान्याचा परस्पर व्यवहार करीत होते. या प्रकारामुळे गैरव्यवहाराला चालना मिळत होती. नव्या व्यवस्थेप्रमाणे तालुका गोदाममधील धान्य गोदाममध्ये खाली करण्याची सूचना करण्यात आली आहे. परस्पर धान्य नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. तालुका गोदाममध्ये धान्याची नोंदणी व वजन करून धान्य वितरीत करण्याची सूचना करण्यात आली आहे, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले. ग्राहकांना चांगल्या दर्जाचे कडधान्य मिळून देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. कडधान्यासंबंधी तक्रार आल्यास कडधान्य त्वरित बदलून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले. राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानात पॉइंट ऑफ सेल मशीन (पॉस) बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधीची निविदा लवकरच जाहीर केली जाणार आहे, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले.