नागदेवाय नमः

0
18
  • मीना समुद्र

नागकथांद्वारे माणसाच्या मनोवृत्तीचेच दर्शन घडविले गेले आहे. नाग उंदरांना मारून शेतकऱ्यांच्या शेतीचे रक्षण करतो म्हणून त्याला शेतकऱ्यांचा मित्र मानण्यात येते, त्याची पूजा केली जाते. परंतु नाग दिसला की त्याला ठेचायचे, ही वृत्ती आपण सोडून दिली पाहिजे. हा सृष्टी परिसंस्थेतला महत्त्वाचा दुवा आपण जपला पाहिजे. नागपंचमीचा सण हेच तर सांगतो.

आषाढात पाऊस धुंवाधार कोसळत राहतो. या वर्षी तर तो अथक, अविश्रांत कोसळतोच आहे. मात्र आता श्रावणाची चाहूल लागली की त्याचा नूर बदलेल. दिव्यांची अवस संपली की लाजऱ्या- बुजऱ्या- नाचऱ्या- हसऱ्या श्रावणाची लावण्यजत्रा सुरू होते. सूर्यावरचे घनदाट अभ्रपटल दूर होऊन कोवळ्या सोनेरी उन्हाचा लपंडाव श्रावणसरींबरोबर सुरू होतो, आणि त्याच्याबरोबर झिम्माफुगडी खेळणाऱ्या उबदार उन्हामुळे, प्रकाश उजळीत झाडे- पाने- फुले- फळे यांचा बहर ओसंडू लागतो. पक्ष्यांच्या कलरवाचे निनाद कानांना सुखद वाटतात. पावसाने मातीला आलेले मार्दव आणि दृष्टी पडेल आणि पोचेल तिथपर्यंत सारी मखमली हिरवाईची लवलव, कित्येक दिवसांनी नीलवर्ण होत गेलेले आकाश आणि कधीमधी ऊन-पावसाच्या खेळात दंगलेले इंद्रधनुष्य आणि त्याचे सप्तरंग लेवून स्वच्छंद उडणारी फुलपाखरे… श्रावणाने सर्वत्र केलेले या प्रसन्नतेच्या उधळणीमुळे माणसाचे मन प्रफुल्लित होते आणि सृष्टिसौंदर्याने नटलेल्या, सजल्याधजलेल्या श्रावणात सणा-उत्सवांची रेलचेल उडते आणि माणसांची लगबग सुरू होते…

या सणा-उत्सवांत पहिला मान असतो तो नागपंचमीला. भारत शेतीप्रधान देश असल्याने शहरी भागात आणि प्रामुख्याने ग्रामीण भागात नागपंचमीची प्रथा विशेषत्वाने पाळतात. आणि घराघरांतून तसेच रानावनांतून, शेताभातांतून नागपूजा केली जाते. नाग सरपटणारा प्राणी असूनही त्याच्या उपकारक आणि शेतीसहाय्यक कृतीमुळे तो माणसाचा रक्षणकर्ता ठरतो. शेतात उंदरांची संख्या त्यांच्या जननक्षमतेमुळे अफाट वाढत असते आणि जवळजवळ 800 कोटी उंदीर 5000 कोटी रुपयांचे अन्नधान्य नष्ट करतात, खाऊन फस्त करतात. आणि अशा उंदरांना नागसाप हे उदरस्थ करतात. त्यामुळे जिथे-जिथे शेती आहे अशा सर्व प्रदेशात नाग हे देवतुल्य मानले जातात.

भारतात ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नागशिळा आढळतात. नागकन्या-नागदेवतांनाही नमन केले जाते. त्यांची श्रद्धेने पूजा-प्रार्थना केली जाते. शहरी भागात याचाच एक भाग म्हणून पाटावर चंदनाने नागप्रतिमा काढून किंवा मातीच्या नागाची स्थापना करून, हळदकुंकू, फुले, दूर्वा, अगरू चंदन वाहून, दूध-लाह्यांचा नैवेद्य दाखवून त्याच्याजवळ प्रार्थना केली जाते. त्याला रक्षक आणि संतानदात्री देवता मानले जाते. जनमेजयाचे सर्पसत्र थांबवून आस्तिक ऋषींनी हा संहार थांबवला तो हा दिवस असे मानले जाते.

नागपंचमी हा मुख्यतः स्त्रियांचा सण. नववधू श्रावणात माहेरी आणण्याची प्रथा असल्याने माहेरची मुक्तता अनुभवण्यासाठी तिचे मन आतुर होऊन माहेरच्या निरोपाची वाट पाहते. मेंदीने रंगलेले हात, खुळखुळणाऱ्या बांगड्या, फुलांचे गजरे, सख्या-सयांबरोबरच्या झिम्मा-फुगड्या आणि नाना तऱ्हेची गाणी गात धरलेले फेर, झाडांना बांधलेला झुला… साऱ्यांची तिला आठवण येते आणि ‘फांद्यावरी बांधिले गं मुलींनी हिंदोळे, पंचमीचा सण आला डोळे माझे ओले’ अशी तिची हळवी स्थिती होते. माहेरी न्यायला येणाऱ्या भावाला ‘लोकाच्या लेकी वा माहचरी, माझी बाळाई सासरी। अरं तू सोपाना बाळा। जा रं बाळी आणायाला’ असे एखादी माउली गीतातून सांगते, तर एखादी बहीण ‘बारा सणाला नेऊ नको, पंचमीला रं ठेवू नको’ असे आपल्या भैय्याला सांगते. सगळ्या माहेरवाशिणी ‘चल गं सखे वारुळाला नागोबाला पूजायाला’ म्हणत हातात पूजासाहित्याचे तबक घेऊन गाणी गात हसत-खेळत वारुळाला जातात. पूजा-प्रार्थना करतात. ‘अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभम, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक, कालीय’ अशा महत्त्वाच्या नवनागांची प्रार्थना केली असता नागसापाचे विषभय नसते ही एक श्रद्धा आहे.

मुंग्यांनी तयार केलेल्या वारुळात नागसाप जाऊन राहतात, त्यामुळे ‘आयत्या बिळात नागोबा’ अशी म्हण पडली आहे. झाडापेडांनी नटलेल्या थोड्याशा आडभागात गेलो की अशी वारुळे पाहायला मिळतात. आमच्या शाळेपासून जवळपास असलेल्या एका ओढ्यापलीकडे एक लहानशा टेकडीसारखे वारूळ होते. घराच्या पांदीतून वाट काढत, थोड्याफार पावसाची मजा घेत मुले मजेने चालत. ओढ्यातून थोडी उंच मुले उतरून पलीकडे जात. छोट्या मुलांना आम्ही शिक्षिका ओढ्यात उतरून ‘गोविंदा गोपाळा’ करत एका बाजूकडून दुसरीकडे नेत असू. वारुळाची पूजा करून दूध ठेवत असू. ते प्यायला नाग केव्हा येणार अशी मुलं विचारणा करत. वारुळाच्या ठिकठिकाणच्या तोंडातून बाहेर येईल म्हणून वाट पाहत. खरं तर परंपरेने चालत आलेला नैवेद्य म्हणून दूध ठेवायचे. पण मग मुलांना सांगितले की, साप हे अरण्यातले प्राणी, त्यामुळे ते दूध पीत नाहीत. ते उंदीर, बेडूक खातात. नागसापांची भीती ते सरपटणारे आणि सळसळणारे प्राणी म्हणून. शिवाय सर्पदंशाने विषबाधा होऊन माणसे मेलेली असली तरी सगळेच साप काही विषारी नसतात. त्यामुळे साप दिसला की मारणे कसे योग्य नाही हे पटवून सर्पमित्रांची चित्रे त्यांना दाखवीत असू. नागदेवतेला मानण्याचे कारण रेषनागाने पृथ्वी आपल्या फण्यावर धारण केली आहे. नागसापांची प्रकृती थंड असल्याने अमृतमंथनाच्या वेळी विषप्राशन केलेल्या भगवान शंकरानी दाह शमविण्यासाठी नागसाप धारण केले. श्रीगजाननानेही नागाचा करदोटा राक्षसयुद्धानंतरचा (अनलासुर) दाह शमविण्यासाठी कमरेला बांधला. कृष्णाचा भाऊ बलराम हा शेषाचा अवतार आहे. भगवान विष्णू शेषशायी आहेत. अर्जुनाने नागकन्या उलुपीशी विवाह केला होता. आपल्या अन्नदात्या शेतकऱ्याचा तो सहकारी, मित्र आहे. ही सारी माहिती आम्ही मुलांना देत असू. पण नागाच्या रंजक गोष्टी त्यांना भुलवीत. शेतकऱ्याने शेत नांगरताना नांगराचा फाळ लागून नागकुटुंब उद्ध्वस्त झाले. नागीण बाहेर असल्याने ती वाचली. शेतकऱ्याच्या घरातील सर्व मंडळींना दंश करण्यासाठी ती गेली. पण मुलगी नागपूजा करताना पाहून संतुष्ट होऊन वर देऊन परत जाते. नागाने डूख धरणे ही गोष्ट निरर्थक आहे आणि पुंगी वाजल्यावर नाग डोलतो हे अशक्य आहे. त्याला कान नसतात, हालचालींवर तो डोलतो. भीतीपोटी अनेक समज-गैरसमज पसरलेले दिसतात.

आमच्या शालेय वयात नागपंचमीसाठी प्रसिद्ध असलेल्या बत्तीस शिराळा या गावात नागांची गावातून मिरवत नेलेली पालखी, घरोघरी जाऊन मातीच्या घागरीत खडे टाकून ती हालवून नागांना डोलवणे, नागांची देवीच्या देवळापर्यंत मिरवणूक आणि विषारी दात काढलेले किंवा बिनविषारी साप गळ्यात घालून काढलेले फोटो हे सारे आठवते. नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी नागांना रानात सोडले जाई. पण शिराळा भागात थोडंसं खणलं तरी नाग निघतात अशी दंतकथाही ऐकली होती. नागाविषयी सुरस अशी कथा म्हणजे एका अनाथ सुनेला माहेरी न्यायला नाग मनुष्यधारी मामा बनून येतो आणि बिळात नेतो. (वारूळ हे माणूसभर उंचीचे त्यामुळे शक्य वाटते.) नागीण बाळंतीण होताना तिच्या हातात धरायला दिलेला दिवा पिलांच्या वळवळीमुळे भिऊन पडून पिलांची शेपटे भाजतात. नागोबा तिला घरी पोचती करतो. दुसऱ्या नागपंचमीला तिला आपल्या या भावंडांची आठवण येते आणि पाटावर नागकुटुंबाची चित्रे काढून ती मनोभावे पूजा करताना लांडोबा-पुंडोबांना दिसतात. त्यांची सूडवृत्ती नाहीशी होते. नैवेद्य घेऊन, वाटीत सोन्याचा हार ठेवून ते निघून जातात. ही दयाळू नागांची गोष्ट आम्हाला खूप आवडे.
नागकथांद्वारे माणसाच्या मनोवृत्तीचेच दर्शन घडविले गेले आहे. त्याच्या आशीर्वादाने संतानप्राप्ती झाल्यास मोठ्या श्रद्धेने, आवडीने मुलामुलींची नागेश, नागनाथ, नागेंद्र, नागूताई, नागिणी अशी नावे ठेवली जातात. नागाचे विष अनेक दुर्धर रोगांवर उपकारी असते. नाग कात टाकून नवकांती धारण करतो. अतिशय चपळ, सुंदर नक्षी असलेले, काळपट-करड्या-लाल-हिरव्या रंगाचे नागसापही असतात. दिसला की ठेचण्याची, मारण्याची वृत्ती सोडून निर्भयपणे आपला रक्षक आणि सृष्टीतील परिसंस्थेतला महत्त्वाचा दुवा आपण जपला पाहिजे. नागपंचमीचा सण हेच तर सांगत असेल ना?