नाक व तोंड दाबल्यामुळेच ‘त्या’ मुलीचा झाला मृत्यू

0
21

>> शवचिकित्सा अहवालातून उघड

निमिषा गोणे यांनी आपल्या मुलीचा तोंड आणि नाक दाबून हत्या केल्याचे शवचिकित्सा अहवालातून निष्पन्न झाले असल्याची माहिती वास्को पोलिसांकडून देणअयात आली. सदर चिमुकल्या मुलीवर काल रविवारी संध्याकाळी बोगदा हिंदू स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, निमिषाच्या पती नीलेश गोणे यांचे काल रविवारी पहाटे दाबोळी विमानतळावर आगमन झाले.

शनिवारी निमिषा गोणे यांनी आपल्या १४ महिन्यांच्या मुलीची हत्या केली होती. नंतर तिने स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र ती त्यात सफल झाली नाही. झुआरी पुलावरून नदीत उडी मारूनही निमिषा जिवंत राहिली. नंतर तिच्या उपचारासाठी गोवा वैद्यकीय इस्पितळात दाखल करण्यात आले होते. मुलीचा मृतदेह मडगाव उपजिल्हा इस्पितळात पाठवण्यात आला होता.
दरम्यान, काल रविवारी पहाटे निमिषा हिच्या पतीचे गोव्यात दाबोळी विमानतळावर पहाटे जर्मनीहून आगमन झाले. नीलेश जर्मनीत नोकरी करत असून निमिषा मुलीसह जर्मनीत आपल्या पतीसह राहत होती. दहा दिवसांपूर्वी ती मुलीला घेऊन गोव्यात आपल्या चिखली येथील वडिलांच्या घरी आली होती. काल पहाटे निमिषाने आपल्या मुलीचा खून करण्याचे टोकाचे पाऊल उचलले होते.

दरम्यान आपल्या चिमुकल्या मुलीचा मृतदेह पाहण्याची वेळ नीलेश गोणे यांच्यावर आली. पहाटे आगमन झाल्यानंतर ते चिखली येथे आले. नंतर त्यांनी मडगाव येथे जिल्हा इस्पितळात जाऊन मुलीला पाहिले. नंतर मुलीची शवचिकित्सा करण्यात आली. या मुलीची तोंड व नाक दाबून हत्या करण्यात आल्याचे शवचिकित्सेतून निष्पन्न झाले. काल संध्याकाळी बोगदा येथे स्मशानभूमी चिमुकलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या नातेवाइकांना दुःख अनावर झाले.

दरम्यान आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या निमिषाची प्रकृती धोक्याबाहेर असून ती डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. पोलिसांनी अजून तिच्याशी चौकशी केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. निमिषाचे पती नीलेश गोणे यांचीही पोलीस चौकशी करत आहेत.