नाकावाटे दिल्या जाणार्‍या कोरोनाविरोधी लशीला मंजुरी

0
10

>> डीसीजीआयची आपत्कालीन वापरास परवानगी

देशात कोरोनाचा हाहाकार कमी झाला आहे; मात्र कोरोना विरोधातील लसीकरण मोहीम अद्यापही सुरू आहे. देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण करून जनतेला करोनापासून सुरक्षित केले जात आहे. त्यातच आता ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) ने ‘भारत बायोटेक’च्या नाकावाटे देण्यात येणार्‍या लशीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. भारत बायोटेकने विकसित केलेल्या बीबीव्ही-१५४ इंट्रानेझल लस विकसित केली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी काल ही माहिती दिली. नाकावाटे दिली जाणारी ही भारताची पहिली लस आहे. ही लस १८ वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी देण्यात येणार आहे. आपत्कालीन स्थितीत या लशीच्या वापरला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाविरोधातील भारताच्या लढाईला मोठे बळ मिळाले आहे.

मागील महिन्यात बीबीव्ही-१५४ इंट्रानेझल लशीची लशीची तिसर्‍या टप्प्यातील चाचणी पूर्ण करण्यात आली होती. चाचणी दरम्यान, ही लस पहिला आणि दुसरा डोस म्हणून लस देण्यात आली होती. ही चाचणी पूर्ण झाल्यानंतर बुस्टर डोस म्हणून देखील या लशीची चाचणी झाली. बुस्टर डोस म्हणून चाचणी करताना ज्यांनी कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांनाच ही लस दिली.

नेझल वॅक्सिन काय आहे?
नेझल वॅक्सिन नाकावाटे देण्यात येणारी लस आहे. ही लस स्प्रेद्वारे अथवा एरोसोल डिलीव्हरीच्या माध्यमातून दिली जाते. नाकावाटे देण्यात येणार्‍या लसीमुळे विषाणू जिथून शरीरामध्ये प्रवेश करतो तिथेच ही नेझल व्हॅक्सिन परिणामकारक ठरणार आहे. म्हणजेच विषाणू नाकावाटे शरीरामध्ये प्रवेश करण्याआधीच थांबवण्याचे प्रयत्न या लसीच्या माध्यमातून केले जाणार आहेत. अनेक वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासामधून विषाणू नेझल कॅव्हिटी म्हणजेच नाकाच्या माध्यमातून शरीरामध्ये प्रवेश करतात आणि नंतर शरीरातील इतर अवयवांना इजा पोहचवतात.