नांगी ठेचावीच लागेल

0
104

इराकमधील आयएसआयएस बंडखोरांच्या चढाईकडे आजवर कानाडोळा करीत इराकपासून यावेळी स्वतःला अलिप्त ठेवू पाहणार्‍या अमेरिकेला अखेर त्या सशस्त्र सुन्नी बंडखोरांवर हवाई हल्ले चढवण्याचा निर्णय घ्यावाच लागला. उशिरा का होईना, बराक ओबामांना हा निर्णय घ्यावा लागला त्याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे आयएसआयएसने आता इराकमधील विविध शहरांप्रमाणेच स्वायत्त कुर्दिस्तानच्या प्रदेशाला लक्ष्य करायला सुरूवात केली आहे आणि त्यामुळे तेथील प्राचीन येझिदी जमातीच्या व ख्रिस्ती नागरिकांच्या वंशविच्छेदाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. अमेरिकेच्या हस्तक्षेपाचे दुसरे कारण म्हणजे स्वायत्त कुर्दिस्तानमध्ये अमेरिकी कंपन्यांच्या तेलविहिरी आहेत आणि आयएसआयएसच्या ताब्यात त्यांना त्या जाऊ द्यायच्या नाहीत. त्या प्रदेशातील सर्वांत मोठे धरण आयएसआयएसने ताब्यात घेतले आहे आणि त्यामुळे पाणी व वीजपुरवठ्याच्या नाड्या त्यांच्या हाती गेल्या आहेत. आयएसआयएसच्या सशस्त्र बंडखोरांनी आजवर सिरिया आणि इराकमध्येच एकेक प्रदेश ताब्यात घेण्याचा सपाटा लावला होता. पण अनपेक्षितपणे आता ते इराकमधील स्वायत्त कुर्दिस्तानवर चालून गेले आणि तेथील लोकांना एक तर पळून जा, धर्मांतर करा किंवा मृत्यूला पत्करा असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला. त्यामुळे लाखो येझिदी प्राणभयाने तेथील सिंजर पर्वतावर पळून गेले आहेत. जलप्रलय झाला तेव्हा नोहाने आपली नौका याच पर्वतावर लावली आणि तेथे तो स्थायिक झाला अशी या येझिदी लोकांची समजूत आहे. आयएसआयएसच्या क्रौर्याला बळी पडण्यापेक्षा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी लाखो लोक तेथे पळून गेले. जे मागे राहिले त्यांचे आयएसआयएसच्या क्रुरात्म्यांनी नृशंस शिरकाण केले. निर्वासितांसाठी अमेरिकेने अन्न पाण्याची पाकिटे विमानातून टाकली आणि दुसरीकडे स्वायत्त कुर्दिस्तानची राजधानी इरबिलकडे चालून जाणार्‍या आक्रमक आयएसआयएसचा निःपात करण्यासाठी हवाई हल्ले सुरू केले. पाचशे पौंड वजनाचे लेजर निर्देशित बॉम्ब टाकायला अमेरिकेने सुरूवात केली आहे. पण आयएसआयएसची चढाई हे हवाई हल्ले थोपवू शकतील का हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. आयएसआयएसच्या बंडखोरांना गनिमी हल्ल्यांचे खास प्रशिक्षण मिळालेले आहे. त्यामुळे हवाई हल्ल्यांपासून बचाव करीत जमिनीवरची लढाई करण्याचे तंत्र त्यांना अवगत आहे. परंतु काट्याचा नायटा होत चाललेला असताना या आयएसआयएसची नांगी ठेचण्याशिवाय आज पर्याय उरलेला नाही. आयएसआयएसचा मुकाबला करण्यात पूर्ण अपयशी ठरलेल्या इराकी सैन्याच्या मदतीसाठी अमेरिकेने आपले सैन्य पाठवण्याऐवजी इराकी सैन्याला प्रशिक्षित करण्यापुरताच आपला सहभाग मर्यादित ठेवला होता. त्यासाठी लष्करी सल्लागार अमेरिकेने पाठवले होेते. आपल्या पूर्वसुरींनी जी चूक केली ती ओबामांना करायची नव्हती. पण आयएसआयएसची खरी ताकद जोखण्यातही अमेरिका कमी पडली की काय असा प्रश्न त्यामुळे आज विचारला जातो आहे. अल कायदानंतर आयएसआयएसही जगभरातील कडव्या धर्मांध इस्लामी शक्तींना आकर्षित करू लागल्याचे दाखले गेल्या काही दिवसांत मिळाले आहेत. आपल्या भारतातून मुंबईतील काही तरूण आयएसआयएसला जाऊन मिळाले. तामीळनाडूतील काही युवकांनी आयएसआयएस असे नाव छापलेले टीशर्टस् घालून त्यांना पाठिंबा दर्शविल्याचेही उघड झाले. ही फोफावती विषवल्ली वेळीच ठेचली जाणे त्यामुळे गरजेचे आहे. आयएसआयएसची चढाई अशीच चालू राहिली तर तिचा प्रभाव केवळ इराकपुरता मर्यादित राहणार नाही. जगभरामध्ये तिचे समर्थक थैमान घालतील. त्यामुळे अमेरिकेचा हवाई हल्ल्यांचा निर्णय हा उशिरा जरी घेतला गेला असला तरी गरजेचाच होता. आता अमेरिकेविरुद्ध पुन्हा जिहाद पुकारला जाईल. आयएसआयएसवरील कारवाईचा सूड उगवण्याचे प्रयत्न होतील. परंतु इराकमधील आयएसआयचे वाढते प्रस्थ हा त्या देशातील अंतर्गत प्रश्न असे मानून स्वस्थ बसणे हा आत्मघात ठरेल. जगभरातील मानवतावादी राष्ट्रांनी आयएसआयएसविरुद्ध आक्रमक भूमिका स्वीकारण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. या सैतानी विंचवाचे विष जगभरात भिनत जाण्याआधी त्याची नांगी ठेचायलाच हवी. आजच्या घडीस महासत्ता अमेरिकाच ते करू शकते.