नष्टचर्य संपवा

0
15

गोवा कला अकादमीच्या दुरवस्थेच्या विरोधात राज्यातील कलाकारांनी रस्त्यावर उतरून आंदोलन पुकारले आहे. ह्या आंदोलनाचा रोख कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्यावर दिसत असला आणि त्यामागे वैयक्तिक कारणे असल्याचे मंत्रिमहोदय जरी म्हणत असले, तरी आम जनतेला हे कलाकार आणि मंत्रिमहोदय यांच्यातील व्यक्तिगत मतभेदांशी काहीही देणेघेणे नाही. केवळ कला अकादमीची शान पूर्ववत प्रस्थापित व्हायला हवी एवढीच तिची अपेक्षा आहे. कला अकादमीची वास्तू ही केवळ वास्तू नाही, तर तो गोमंतकीय कला संस्कृतीचा मानबिंदू आहे ही गोमंतकीय जनतेची यथार्थ भावना आहे आणि कला व संस्कृती मंत्री हेही स्वतः एक उत्तम कलाकार असल्याने त्यांनाही ती जाण निश्चितच असेल. कला अकादमीच्या तथाकथित नूतनीकरणानंतर जेव्हा त्या वास्तूचे उद्घाटन झाले, तेव्हा ही संस्था हे गोमंतकीय कलाकारांसाठी एक ऊर्जाकेंद्र व्हायला हवे अशी अपेक्षा आम्ही व्यक्त केली होती. परंतु पहिल्याच पावसात त्या ऊर्जेवर सपशेल पाणी पडले. कला अकादमीतील मुख्य सभागृहातच म्हणजे मास्टर दीनानाथ कलामंदिरातच गळती लागल्याच्या बातम्या आल्या आणि जनतेच्या काळजाचा ठोका चुकला. ह्या वास्तूच्या नूतनीकरणाचे काम करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याने मात्र कधी छतावर पालापाचोळा साचल्याचे, तर कधी वातानुकूलन यंत्रणेच्या डक्टमधून पाणी गळल्याचे कारण देत सारवासारव करण्याचा हास्यास्पद प्रयत्न सतत चालवला. छतावर पावसाळ्यात वनस्पती वाढली असल्याने ओल निर्माण होऊन पाणी गळत असल्याचे कारण आता पुढे करण्यात आले आहे. कला अकादमीच्या ह्या वास्तूने पूर्वी पन्नास पावसाळे पाहिले, परंतु तेव्हा कधी मुख्य सभागृहात पाणी गळताना दिसले नव्हते. धो धो पावसातही पंधरा ऑगस्टला हजारो श्रोते केवळ भजनानंदात चिंब होताना तेथे आम्ही पाहिले. कला अकादमीत बसून पाऊस पाहणे हा देखील एक आनंदसोहळा असायचा. तिचे भारतीय बैठक असलेले पूर्वीचे ब्लॅकबॉक्स, कँटिनसमोरच्या हिरवळीवर रंगणारे कार्यक्रम, खुल्या रंगमंचावर रंगणारी शालेय स्नेहसंमेलने आणि मुख्य सभागृहात होणारे भव्यदिव्य सोहळे, कला दालनात होणारी चित्रप्रदर्शने यांनी गजबजलेली कला अकादमी आठवून आज प्रत्येक कलारसिक सध्याची दुरवस्था पाहून सरकारचा उद्धार करताना दिसतो आहे. कला अकादमीची वास्तू जुनी झाली होती म्हणून तिची दुरुस्ती करणे आवश्यक होते हे खरे, परंतु ह्या वास्तूशी छेडछाड करताना जी काळजी घ्यायला हवी होती, ती घेतली गेली नाही, त्यामुळेच सध्याची ही स्थिती ओढवली आहे. विनानिविदा एजन्सी नेमण्यापासून ह्या अनागोंदीची सुरुवात झाली. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय सामूहिकपणे घेतला गेला असे जरी सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात हे दुरुस्तीकाम खास प्रकारचे असल्याने खास एजन्सीमार्फतच हे काम झाले पाहिजे अशी मूळ शिफारस कला अकादमीत झालेल्या बैठकीत करण्यात आली होती असे त्याच मंत्रिमंडळ बैठकीची कॅबिनेट नोट सांगते. कला अकादमीचे नूतनीकरण हाती घेतले जाणार अशी बातमी आली तेव्हाच ‘या संकुलाच्या उभारणीमागे जी कलात्मक दृष्टी होती, तिच्याकडे तीळमात्रही कानाडोळा होणार नाही याची खबरदारी कला व संस्कृतिमंत्र्यांनी घ्यावी.’ अशी अपेक्षा आम्ही व्यक्त केली होती. परंतु चार्ल्स कुरैय्या यांच्या कलात्मक दृष्टीला खुंटीवर टांगून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पठडीतील ‘सरकारी’ दुरुस्तीकाम उरकून घेण्यात आले आहे. हे काम चालले असतानाच तिकडे खुल्या रंगमंचाचे छत कोसळले. नूतनीकरणाचा तो भाग नव्हता असे स्पष्टीकरण सरकारने त्यावर केले, परंतु इमारतीच्या नूतनीकरणात तो भागही समाविष्ट असायलाच हवा होता, कारण तोही मूळ वास्तूइतकाच जुना होता. कोणीही उठावे आणि कला अकादमीशी छेडछाड करावी हा प्रकार पहिल्या ‘इफ्फी’पासूनच सुरू झाला. ‘इफ्फी’ साठी कला अकादमीतील ब्लॅक बॉक्समधील भारतीय बैठक उद्ध्वस्त केली गेली आणि तेथे प्लास्टिकच्या खुर्च्या आल्या, तेव्हाच कलेशी देणेघेणे नसलेल्या मंडळींच्या हाती निर्णयाधिकार आले तर काय घडू शकते ह्याचा प्रत्यय आला होता. कला अकादमी नूतनीकरणातही हेच घडलेले दिसते. अजूनही वेळ गेलेली नाही. कला अकादमीच्या नूतनीकरणातील सर्व दोषांचा आढावा घेऊन त्यांचे निराकरण करण्याचे काम सरकारने युद्धपातळीवर हाती घ्यावे. कला अकादमी म्हणजे केवळ भाड्याने द्यायची सभागृहे नव्हेत. गोमंतकाचा हा मानबिंदू कलात्मक दृष्टीने, कल्पकतेने चालवला गेला पाहिजे. परंपरेने चालत आलेल्याहून वेगळ्या कल्पक उपक्रमांची, कार्यक्रमांची तेथे रेलचेल हवी. ही वास्तू निर्दोष व्हावी, पुन्हा गजबजावी, बहरावी हीच अपेक्षा.