>> राज्यातील सध्याची कोरोना रुग्णसंख्या २९३; मुख्य सचिवांची मांगूरला भेट
राज्यात कोरोना पॉझिटिव्ह नवीन २९ रुग्ण काल आढळून आले असून त्यात मांगूर हिलशी संबंधित २२ रुग्णांचा समावेश आहे. राज्यातील कोरोना पॉझिटिव्हची सध्याची रुग्ण संख्या २९३ झाली आहे, अशी माहिती आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या ३५९ एवढी झाली असून त्यातील ६७ रुग्ण बरे झाले आहेत. आरोग्य खात्याच्या आणखी ६ कर्मचार्यांच्या कोविड चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. महाराष्ट्र, कर्नाटकातून रस्तामार्गे आलेले ५ आणि रेल्वेतून नवीन दिल्ली आणि औरंगाबाद येथून आलेल्या २ जणांचा कोविड चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, असेही मोहनन यांनी सांगितले.
मांगूर हिलमधील आरोग्य खात्याच्या बाह्य रुग्ण विभागाच्या (ओपीडी) कामाच्या वेळेत बुधवारपासून एक तासाने वाढ केली जाणार आहे. मांगूर हिलमधील ओपीडी केवळ २ तास चालविली जात होती. आत्ता ही ओपीडी ३ तास चालविली जाणार आहे, असेही मोहनन यांनी सांगितले.
मागूर हिलमधील सुमारे २५० नागरिकांचे स्क्रिनिंग काल करण्यात आले. आतापर्यंत मांगूर हिलमधील १३०० ते १३५० जणांची तपासणी करण्यात आली आहे. मुख्य सचिव परिमल रॉय, पोलीस महानिरीक्षक जसपाल सिंग, जिल्हाधिकारी यांच्यासमवेत मांगोर हिल भागाला भेट देऊन प्रतिबंधित क्षेत्रात सुरू असलेल्या आरोग्य सेवेचा आढावा घेण्यात आला. तसेच, शिरोडा येथील कोविड केअर सेंटरला भेट देऊन तेथील कामाची पाहणी करण्यात आली, असेही मोहनन यांनी सांगितले.
मांगूर हिल येथील प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या तक्रारी, समस्या जाणून घेण्यात आल्या आहेत. मांगूर हिल येथील बफर झोनमध्ये दुकान सुरू करण्यास मान्यता देण्याची मागणी करण्यात आली होती. त्या क्षेत्रातील दुकाने सुरू करण्यास स्पष्ट नकार देण्यात आला. स्थानिक प्रशासनाकडून सदर भागातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करण्यात आल्या आहेत, असेही मोहनन यांनी सांगितले.
बांबोळी येथील जीएमसीच्या खास कोरोना वॉर्डात ४ कोरोना संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. कोरोना खास वॉर्डात कोरोना संशयित ६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असेही मोहनन यांनी सांगितले.
जीएमसीच्या कोविड प्रयोगशाळेत १८२८ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तर, प्रयोगशाळेकडून १७०० नमुन्यांचे अहवाल जाहीर करण्यात आले आहेत. कोविड प्रयोगशाळेत तपासण्यात आलेले १६७१ नमुने निगेटिव्ह आहेत. २९ नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. तसेच १०८९ नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे, असेही मोहनन यांनी सांगितले.
शिरोड्यात ६८ पॉजिटिव्ह
रुग्णांना हलविले
शिरोडा येथील कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह ६८ रुग्णांना स्थलांतरित करण्यात आले आहेत. या कोविड केअर सेंटरमधील डॉक्टर व इतर कर्मचार्यांशी चर्चा करण्यात आली असून कर्मचारी वर्गाला भेडसावणार्या समस्या सोडविण्यात येत आहे. या सेंटरमध्ये एक रुग्णवाहिकेची सोय करण्यात आली आहे. तसेच कर्मचार्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. या सेंटरमध्ये सध्या ७० खाटांची सोय असून त्याठिकाणी आणखी १८० ते २०० खाटांची सुविधा उपलब्ध करण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध आहे, असेही मोहनन यांनी सांगितले.
उसगावात दोन दिवस बंद
उसगाव पंचायत क्षेत्रातील दोन आरोग्य खात्याच्या कर्मचार्यांच्या कोविड चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नागरिकात खळबळ माजली आहे. स्थानिक पंचायतीच्या सरपंच व पंच सदस्यांनी याची त्वरित दखल घेऊन बुधवारपासून दोन दिवस संपूर्ण व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मोर्ले येथील चौघांंचा कोविड चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेले चौघे आरोग्य खात्याच्या कर्मचार्यांशी संबंधित आहेत.
‘तो’ डॉक्टर कोरोना पॉजिटिव्ह
मांगूर हिलमधील पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची वैद्यकीय तपासणी करणार्या खासगी डॉक्टराला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे कोविड चाचणी आढळून आले आहे, अशी माहिती आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी दिली. या खासगी डॉक्टराची पहिली कोविड चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्याला होम क्वांरटाईन करण्यात आले होते. या खासगी डॉक्टराची पुन्हा एकदा कोविड चाचणी करण्यात आली असून डॉक्टरांच्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, असेही आरोग्य सचिव मोहनन यांनी सांगितले.
नवीन एसओपी घातक ः कॉंग्रेस
राज्य सरकारची परराज्यातून येणार्या नागरिकांसाठीची नवीन प्रमाण कार्यवाही पद्धत (एसओपी) राज्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते, अशी टिका कॉंग्रेसचे सरचिटणीस आग्नेल फर्नांडिस यांनी कॉंग्रेस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल केली.
राज्यात सुमारे २० टक्के ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आहेत. तर सुमारे २० टक्के लहान मुलांचा समावेश आहे. नवीन एसओपीमुळे ज्येष्ठ नागरिक व मुलांना धोका संभवतो. राज्य सरकारकडून परराज्यातून येणार्या नागरिकांची तपासणी योग्य पद्धतीने होत नाही. मांगूर हिल – वास्कोमध्ये कोविड तपासणी योग्य प्रकारे होत नाही. राज्य सरकारकडून हर्ड इम्युनिटीचा प्रयोग घातक ठरू शकतो. राज्यातील नागरिकांच्या हितासाठी परराज्यातून येणार्या लोकांना तात्पुरती बंदी घालण्याची गरज आहे.