राज्यात गेल्या चोवीस तासांत नवीन १०३ कोरोनाबाधित आढळून आले असून, आणखी ३ कोरोना बळींची नोंद झाली आहे. राज्यात बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ५.७१ टक्के एवढे आहे. गेल्या चोवीस तासांत कोविड स्वॅबच्या चाचण्यांमध्ये घट झाली असून, केवळ १८०१ स्वॅबची तपासणी करण्यात आली, त्यातील १०३ स्वॅबचे नमुने बाधित आढळून आले.
राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या दीड हजारांच्याखाली आली असून, ती १ हजार २२७ एवढी झाली आहे. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ३७८५ एवढी झाली आहे.
राज्यात मागील चोवीस तासांत आणखी ४८१ जण कोरोनामुक्त झाले असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९५ टक्के एवढे आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांत ६ जणांना इस्पितळांत दाखल करून घेण्यात आले आहे. इस्पितळात दाखल होणार्या कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. इस्पितळातून बर्या झालेल्या १० जणांना घरी पाठविण्यात आले आहे.
राज्यात बूस्टर डोसला अजूनपर्यंत म्हणावा तसा चांगला प्रतिसाद मिळालेला नाही. बूस्टर डोसासाठी १ लाख २४ हजार ३६२ लाभार्थी आहेत, त्यातील केवळ २७.४७ टक्के लाभार्थींनी बूस्टर डोस घेतला आहे.
कर्नाटककडून आरटीपीसीआर प्रमाणपत्राची अट मागे
कोविडची तिसरी लाट धडकल्यानंतर आणि संसर्गाचे प्रमाण वाढल्यानंतर कर्नाटक सरकारने राज्यात येणार्या प्रवाशांना आरटीपीसीआर प्रमाणपत्र सक्तीचे केले होते. लसीचे दोन्ही डोस घेतले असले तरी कोरोना चाचणी प्रमाणपत्राशिवाय कर्नाटकात प्रवेश दिला जात नव्हता. मात्र काल कर्नाटक सरकारने आरटीपीसीआर प्रमाणपत्राची अट मागे घेतली आहे. नव्या आदेशानुसार लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना आता कर्नाटकात प्रवेश मिळणार आहे.