>> लष्कर, नौदल, हवाई दल प्रमुखांशी समन्वय ः पंतप्रधान मोदी
लष्कर, नौदल आणि हवाई दल यांच्यातील योग्य समन्वयासाठी पूरक ठरणार्या संरक्षण दल प्रमुख या नव्या महत्वाच्या पदाची निर्मिती करण्यात आल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्यदिन सोहळ्यानिमित्त ध्वजारोहण केल्यानंतर देशवासियांना संबोधताना केली. देशाच्या तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख अशा स्वरुपाचे हे पद असून कारगिल युद्धादरम्यान १९९९ पासून या विषयाचा प्रस्ताव प्रलंबित होता.
या नव्या पदाच्या निर्मितीमुळे भारतीय संरक्षण दले अधिक प्रभावीपणे कार्यरत राहणार असल्याचा दावा मोदी यानी यावेळी केला. महत्वाच्या संरक्षणविषयक आणि धोरणात्मक विषयांवर पंतप्रधान व संरक्षण मंत्र्यांचे संरक्षणविषयक सल्लागार म्हणून या पदावरील अधिकार्याची भूमिका असेल असे मोदी यांनी स्पष्ट केले. मोदी यांच्या निर्णयाचे देशाचे माजी लष्कर प्रमुख व्ही. जी. मलिक यांनी स्वागत केले आहे. देशाच्या अन्य अनेक माजी संरक्षण दलांच्या अधिकार्यांनीही या घोषणेचे जोरदार स्वागत केले आहे.
वाढत्या लोकसंख्येबाबत चिंता
देशातील वाढत्या लोकसंख्येबाबतही मोदी यांनी आपल्या भाषणात चिंता व्यक्त केली. पुढील पिढ्यांसमोर वाढत्या लोकसंख्येमुळे मोठी आव्हाने उभी ठाकरणार आहेत. त्यामुळे केंद्राबरोबरच राज्य सरकारांनीही वाढत्या लोकसंख्या नियंत्रणासाठी उपाययोजना हाती घ्याव्या लागतील असे ते म्हणाले. आपले कुटुंब छोटे ठेवणे ही एक राष्ट्रप्रेमासारखीच कृती आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
एक देश, एक घटना
प्रत्यक्ष साकारली
घटनेतील ३७० व ३५ अ ही कलमे हटविणे, तीन तलाक यासारख्या विषयांवरही मोदी यांनी भाष्य केले. ३७० कलम रद्द प्रकरणी त्यांनी विरोधी कॉंग्रेसवर हल्लाबोल केला.