कोरोनाच्या घातक लाटांतून आताच कुठे सावरलेल्या जगाला चीनमध्ये सध्या झपाट्याने पसरलेल्या एचएमपीव्ही किंवा ह्यूमन मेटान्यूमोवायरसमुळे धास्ती वाटणे अगदी साहजिक आहे. भारताला ह्याबाबत चिंतेचे कारण नाही असा निर्वाळा भारत सरकारच्या आरोग्य महासंचालकांनी देऊन काही तास उलटताच न उलटताच तोच कर्नाटकात दोन व गुजरातमध्ये एक मिळून तीन बालकांना ह्या विषाणूची बाधा झाल्याचे काल समोर आल्याने ही चिंता वाढणेही स्वाभाविक म्हणावे लागेल. मात्र, कोरोनाइतका हा विषाणू जीवघेणा ठरणार नाही असे सध्या तरी वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत, त्यामुळे अकारण भीतीने गारठून जाण्याचे काही कारण नाही. मात्र, लहान बालके आणि वृद्ध व्यक्ती तसेच कमी प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींना ह्या विषाणूची बाधा झाल्यास त्यांच्यात वैद्यकीय गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असल्याने याबाबत बेफिकिरीही उपयोगाची नाही. त्यामुळे ह्या नव्या विषाणूबाबत जागरूकता आणि सावधगिरी ह्या गोष्टी कोरोनाप्रमाणेच यावेळीही आवश्यक असतील. कोरोनाच्या विषाणूप्रमाणेच हा विषाणूही नाकातोंडातून उसळणाऱ्या तुषारांतूनच प्रसार पावत असल्याचे आढळले आहे. त्याची सर्व लक्षणे साध्या सर्दीतापासारखीच असल्याने कोरोनाच्या संदर्भात जसा संभ्रम निर्माण होत असे, तशाच प्रकारचा संभ्रम ह्या आजाराबाबतही निर्माण होऊ शकत असल्याने ती थोडी चिंतेची बाब ठरते. साधी सर्दी समजून त्याकडे दुर्लक्ष केले गेले, तर विशेषतः लहान बालकांसाठी ते घातक ठरू शकते. चीनमध्ये सध्या इस्पितळे बालरुग्णांनी तुडूंब भरून वाहत असल्याची दृश्ये दूरचित्रवाणीवर पाहून हबकून जाण्याचे कारण नाही. आपल्याकडील आरोग्य यंत्रणा आणि चीनची आरोग्ययंत्रणा यामध्ये एक मूलभूत फरक आहे, जो एका अहवालात नुकताच स्पष्ट करण्यात आला आहे. आपल्याकडे आधी आपण जवळच्या डॉक्टरकडे किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राकडे धाव घेतो. तेथे उपचार झाले नाहीत, तरच मोठ्या इस्पितळात जातो. चीनमध्ये मात्र, थेट मोठ्या इस्पितळांत धाव घेण्याची तेथील रुग्णांची सवय आहे, कारण आपल्यासारखी तेथे प्राथमिक आरोग्य केंद्रांची मजबूत साखळी नाही असे ह्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळेच साध्या आजारांसाठीही थेट इस्पितळ गाठण्याच्या चिनी नागरिकांच्या सवयीमुळेच तेथील इस्पितळांवर सध्याचा ताण आला आहे असे त्यात म्हटले आहे. आपल्याकडे प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि निम्नस्तरावरील डॉक्टरांचे मोठे जाळे असल्याने रुग्णाची स्थिती गंभीर बनली तरच इस्पितळांकडे धाव घेण्याची वेळ येते. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून इस्पितळांमधून अशा गंभीर रुग्णांवर उपचाराची सोय सरकारला सज्ज ठेवावी लागेल. कोरोना उपचारांचा मोठा अनुभव आता सरकारच्या गाठीशी असल्याने ह्या विषाणूच्या रुग्णांवरील उपचारासाठीही सर्वतोपरी काळजी सरकार घेईल अशी आशा आहे. साध्या सर्दीप्रमाणेच खोकला, घशात खवखव, ताप, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे ह्या आजारात दिसतात. त्यामुळे सामान्य सर्दी समजून ह्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यताही वाढते. विशेषतः आपल्याकडील ग्रामीण भागामध्ये हे असे होण्याची अधिक शक्यता आहे. मात्र, कोरोनाने दिलेल्या दणक्यामुळे लोक आता शहाणे झाले असतील अशी आशा आहे. लहान मुलांना किंवा वृद्धांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यास त्यांना तातडीने उपचारासाठी इस्पितळात हलवावे लागणार आहे. त्यासाठीची व्यवस्था सज्ज ठेवावी लागेल. अशा प्रकारचे विषाणू हे अगदी झपाट्याने पसरतात असे आजवर आढळून आले आहे. कोरोनाप्रमाणेच एचएमपीव्ही विषाणूचा प्रसारदेखील फार झपाट्याने होण्याची शक्यता आहे. चीनमधून ह्या विषाणूचा सध्या प्रसार होताना दिसत असला तरी खरे तर हा काही तसा नवा विषाणू नाही. अनेक वर्षांपूर्वीच अशा प्रकारच्या विषाणूचा शोध लागला होता असे सांगितले जात आहे. मात्र, त्याचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रसार प्रथमच पाहायला मिळत आहे. दरवर्षी हिवाळ्यात अशा आजाराचा प्रसार होतो असे सांगत चीन ह्या प्रसाराचे गांभीर्य कमी करू पाहत असला, तरी कोरोनाचा कटू अनुभव गाठीशी असल्याने धोका पत्करण्याची कोणत्याही देशाची तयारी नाही. आजकाल जग जवळ आलेले असल्याने एका देशातून दुसऱ्या देशात विषाणूचा प्रसार व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे योग्य खबरदारी आणि सज्जता ह्या दिशेने सरकारने व्यापक प्रयत्न आतापासूनच हाती घ्यावे लागतील. संभाव्य रूग्ण वेळीच शोधून काढण्यासाठी प्रयोगशाळांतील चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याकडे लक्ष द्यावे लागेल. रुग्णांवर उपचारांसाठी स्वतंत्र विभागांची, विशेष करून बालरुग्णविभागांची व्यवस्था करावी लागेल आणि कोरोनाप्रमाणेच ह्या विषाणूबाबतही जागृती घडवावी लागेल.