>> सिरम इन्स्टिट्यूटमध्ये पन्नास लाख डोस वितरणासाठी सज्ज
पुण्याच्या ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’मध्ये सध्या ‘कोवीशिल्ड’ ह्या कोरोनावरील ऑक्सफर्ड – ऍस्ट्रेझेनेकाच्या लशीचे उत्पादन जोरात सुरू आहे. ह्या लशीच्या लक्षावधी कुपींची निर्मिती आणि पॅकेजिंग करून त्यांची शिस्तशीर साठवणूक केली गेली असून भारत सरकारच्या औषध नियंत्रकांच्या आदेशाची वाट पाहिली जात आहे.
सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची ही उत्पादन सुविधा संपूर्णपणे स्वयंचलित आहे. काचेच्या रिकाम्या कुप्या आधी उच्च तापमानात निर्जंतुकीकरण करून घेतल्या जातात. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा जंतुसंसर्ग होऊ नये याची संगणकांच्या आधारे खात्री करून घेतली जाते. या सर्व उत्पादन प्रक्रियेमध्ये कोणत्याही मनुष्याचा संपर्क येऊ नये यासाठी खास व्यवस्था केली गेली आहे. उत्पादन सुविधेवर देखरेख करणार्यांसाठीदेखील काचेच्या बंदिस्त दालनांमध्ये विशेष हातमोज्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे कोणत्याही कर्मचार्याचा स्पर्शदेखील या निर्मिती प्रक्रियेत होत नाही.
कुप्या धुवून निर्जंतुकीकरण झाल्यानंतर त्यामध्ये यंत्रांद्वारे कोरोनावरील लस भरली जाते. दुसरे यंत्र मग त्यावर रबरी झाकण लावते व आणखी एक यंत्र ऍल्युमिनियमची आवरणे लावून त्या सीलबंद करते. भरलेल्या ह्या कुप्या नंतर तपासणी प्रक्रियेसाठी पुढे पाठविल्या जातात. खास लावण्यात आलेली स्क्रिनिंग यंत्रे विशिष्ट प्रमाणित पद्धतीनुसार त्या कुप्या स्वीकारतात किंवा काही दोष असेल तर बाजूला काढतात.
कोरोना होऊ नये यासाठी या कुपीतील लशीचे दोन डोस प्रत्येक व्यक्तीला दिले जाणे आवश्यक आहे. त्या दोन डोसांमध्ये तीन महिन्यांचे अंतर राखणेही गरजेचे आहे. हे अंतर दोन ते तीन महिन्यांचे असेल तर सर्वांत चांगला परिणाम दिसून येतो असेही चाचण्यांत आढळून आले आहे.
सिरम इन्स्टिट्यूटमध्ये दर मिनिटाला पाच हजार कुप्या कोरोनावरील लशीने भरल्या जात असून येत्या फेब्रुवारीत हे प्रमाण दुप्पट केले जाईल.
लशीच्या एका कुपीमध्ये दहा डोस असतात. मात्र, एकदा कुपी खोलल्यावर त्यातील डोस चार ते पाच तासांमध्येच घेणे गरजेचे आहे.
सिरम इन्स्टिट्यूटमध्ये आतापावेतो लशीचे पन्नास लाख पॅकबंद डोस सज्ज असून प्रत्येकाचे दोन डोस गृहित धरता, या लशीला सरकारची औपचारिक मंजुरी मिळताच पंचवीस लाख लोकांना ताबडतोब ही लस मिळू शकते.
ह्या लशीचे वैशिष्ट्य म्हणजे ती २ ते ८ अंश सेल्सियसमध्ये साठवता येते. त्यामुळे कोणत्याही रेफ्रिजरेटरमध्ये ती ठेवता येण्यासारखी आहे. सिरम इन्स्टिट्यूटमध्ये सध्या ही लस साठवण्यासाठी जवळजवळ दोन हजार कोटी रुपये खर्चून खास साठवणूक व्यवस्था तयार करण्यात आली असून त्यावर सशस्त्र पहाराही ठेवण्यात आला आहे.
आपत्कालीन वापराचा परवाना केंद्र सरकारकडून मिळताच ही लस सुरवातीला सरकारमार्फत कोरोना योद्ध्यांना आधी दिली जाईल. त्यानंतर कोरोनाचा सर्वाधिक धोका असलेल्या व्यक्तींपर्यंत ती पोहोचवली जाईल. पहिल्या टप्प्यात या सर्वांचे लशीकरण झाल्यानंतर नियमित वितरण परवाना दिला जाईल. त्यानंतर ही लस खासगी क्षेत्रामध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.
मार्च किंवा एप्रिल अखेरपर्यंत ही लस खासगी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकेल म्हणजेच औषधालयांतून मिळू शकेल अशी अपेक्षा आहे.
जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही लस पोहोचावी यासाठी सिरम इन्स्टिट्यूट प्रयत्नशील आहे. उद्योगसमूहांमार्फत त्यांच्या कर्मचार्यांना व कुटुंबियांनाही ही लस उपलब्ध करून दिली जाऊ शकते. त्यासाठी सदर कंपनीने सरकारसाठी सवलतीचा दर लावला असून खासगी क्षेत्रासाठी मात्र वेगळा दर असेल. भारत सरकारसाठी तीन डॉलर हा दर निश्चित करण्यात आलेला असून त्यामुळे प्रत्येकाचे दोन डोस गृहित धरता प्रत्येक व्यक्तीमागे ४४० रुपये पडतील. मात्र, खासगी बाजारपेठेत ती सातशे ते आठशे रुपयांना उपलब्ध होऊ शकते.
कोणत्याही लशीचे दुष्परिणाम संभवतात तसेच या लशीचेही होऊ शकतात असे उत्पादकांना वाटते. ताप, डोकेदुखी असे सामान्य दुष्परिणाम जाणवले तरी कोरोनाच्या घातक परिणामांपासून ही लस सुरक्षा देऊ शकेल असा विश्वास संस्थेला आहे. आजवर ह्या लशीच्या चाचण्यांत सहभागी झालेल्यांवर कोणतेही विशेष दुष्परिणाम आढळले नसल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. ही लस दिली जाणार्यांना कोरोना होणारच नाही अशी खात्री मात्र देता येत नाही, पण जरी कोरोना झाला तरी त्याला इस्पितळात हलवण्याएवढे घातक परिणाम दिसून येणार नाहीत असे लस उत्पादकांचे म्हणणे आहे. ही लस घेतलेल्यांपैकी तीस ते चाळीस टक्के लोकांना कोरोना होऊ शकतो, पण या लशीमुळे त्याचे घातक परिणाम मात्र दिसून येणार नाहीत असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. इतर लशींच्या बाबतीमध्ये देखील असाच परिणाम दिसून आलेला आहे.
कोरोनाच्या नव्या रूपांमध्ये ही लस परिणामकारक ठरणार का याबाबत उत्पादक अद्याप खात्रीशीरपणे सांगू शकत नसले तरी सध्या उपलब्ध माहितीच्या आधारे ही लस कोरोनाच्या सध्या ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या रूपावरही मात करू शकेल असा विश्वास वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.