गोव्याची शान असलेले गोवा कला अकादमीचे संकुल प्रदीर्घ काळ चाललेल्या आणि सतत संशयाच्या घेऱ्यात राहिलेल्या नूतनीकरणानंतर आज पुन्हा एकवार रसिकांसाठी खुले होत आहे. कधी ना कधी ह्या संकुलात येऊन गेलेल्या, त्या वास्तूची तेथील निसर्गाशी असलेली एकतानता अनुभवलेल्या प्रत्येक गोमंतकीयासाठी हा निश्चितच आनंदाचा क्षण आहे. कला अकादमी बंद असणे म्हणजे जणू पणजी शहराच्याच नव्हे, तर संपूर्ण गोमंतकाच्या सांस्कृतिक घडामोडींचे ह्रदयच बंद पडल्यासारखे झालेले होते. तेथील ऊन पावसाचा तो मनमोहक खेळ पाहण्यासाठी कलारसिकांचे डोळे आसुसले आहेत. कला अकादमीची ही वैशिष्ट्यपूर्ण वास्तू समूळ पाडून तेथे नवी इमारत उभी करण्याचा सुरवातीला मांडला गेलेला प्रस्ताव, त्याला चहुबाजूंनी कडाडून विरोध होताच नवे बांधकाम की जुन्याचाच जीर्णोद्धार ह्यावर झालेला खल, चार्ल्स कुरैया फाऊंडेशन आणि कला व संस्कृती मंत्र्यांमध्ये झडलेला संघर्ष, मग केंद्रीय सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मार्गदर्शक तत्त्वांना हरताळ फासून मुंबईच्या एका एजन्सीला दिले गेलेले नूतनीकरणाचे कंत्राट, त्याच्या जबाबदारीवरून पुन्हा कला व संस्कृती मंत्री आणि सार्वजनिक बांधकाममंत्री यांच्यात झालेली टोलवाटोलवी, कंत्राटदाराकडून 365 दिवसांच्या आत हे नूतनीकरण होणे अपेक्षित असताना त्यात वेळोवेळी झालेला विलंब, मग उद्घाटनाचा मुहूर्त जवळ येत असतानाच खुल्या रंगमंचाचे छत कोसळून झालेली दुर्घटना, त्यामुळे लांबणीवर पडलेले उद्घाटन ह्या सगळ्या नाट्यानंतर आज ही वास्तू आणि पूर्ण संकुल एकदाचे पुन्हा रसिकांना खुले होते आहे. हे जे काही नूतनीकरण झाले आहे, त्याची स्थिती काय आहे, ते मूळ इमारतीला बळकटी देणारे आहे, तिच्या सौंदर्यात भर घालणारे आहे की ही वरवरची मलमपट्टी आहे हे प्रत्यक्ष ह्या संकुलाचे झालेले काम पडताळल्यानंतरच सांगता येईल. ही वरवरची मलमपट्टी नाही, तर मूळ इमारतीला बळकटी देणारी आणि मूलभूत स्वरूपाची डागडुजी असेल अशी अपेक्षा आहे. नुकत्याच पडून गेलेल्या अवकाळी पावसात नूतनीकरण झालेल्या भागात काय परिस्थिती राहिली हे कला अकादमीचा कर्मचारीवर्गच सांगू शकेल. अकादमीच्या संकुलातील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह नव्या दिमाखात उभे राहिले आहे. पावसाने सतत गळती लागणाऱ्या कला दालनाचे नष्टचर्य आता तरी संपेल अशी अपेक्षा आहे. विष्णू सूर्या वाघ यांचे नाव दिलेला कृष्णकक्ष पुन्हा मूळ भारतीय बैठक व्यवस्थेत निर्माण होणे गरजेचे आहे. कला अकादमीची ही वास्तू केवळ वास्तू नाही. तिच्याशी प्रत्येक कलासक्त गोमंतकीयाच्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत. चार्ल्स कुरैय्यांनी देशभरामध्ये अनेक उत्तमोत्तम वास्तुशिल्पे साकारली. भोपाळचे प्रसिद्ध भारत भवन असो, अहमदाबादचे साबरमती काठावरचे गांधी संग्रहालय असो, जयपूरचे जवाहन कला केंद्र असो, दिल्लीतील हस्तकला संग्रहालय असो, कलाकाराच्या दृष्टीतून त्यांनी ह्या वास्तू वेगळ्या रूपात साकारल्या. त्यामुळेच त्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सरकारी पठडीतील न ठरता वेगळ्या ठरल्या आणि जागतिक वास्तुकला अभ्यासकांच्या कौतुकाचा विषय ठरल्या. गोव्यातील कला अकादमीची वास्तू हा तर त्यातील मुकुटमणी आहे. मांडवी नदीचा सुंदर किनारा, तेथील सुरूची बाग, हिरवळ, झाडे ह्या सगळ्याचा विचार करून, ऊन पाऊस वारा वादळाची दिशा अभ्यासून कला अकादमीची वास्तू उभी आहे. म्हणूनच काही वर्षांपूर्वी दर्यासंगमावर विस्तारित इमारत उभारण्याचा घाट घातला होता तेव्हा किंवा नंतर मूळ इमारत पाडण्याचा प्रस्ताव पुढे आला, तेव्हा त्याला कडाडून विरोध झाला होता. कला अकादमी सोडल्यास राज्य सरकारने उभारलेल्या वास्तूंना प्रादेशिक रंगरूप क्वचितच लाभले आहे. खुद्द कला आणि संस्कृती खात्याची पाटो पणजीतील इमारत देखील अत्यंत बेढब आणि एखादा औद्योगिक कारखाना वाटावा अशा थाटाची आहे. तिचे गोव्याच्या कला आणि संस्कृतीशी काहीही देणेघेणे दिसत नाही. त्यामुळे कला अकादमीच्या मूळ वास्तूशी छेडछाड होता कामा नये. इफ्फीवेळी तिच्याशी छेडछाड केली गेली, त्याचे परिणाम त्या इमारतीला भोगावे लागले. ह्यावेळी झालेल्या नूतनीकरणातून तसे काही झालेले नसेल अशी आशा आहे. कला अकादमी हे नुसते नाटके आणि तियात्रे सादर करण्यासाठीचे थिएटर नव्हे. सर्व कलांचा संगम तेथे झाला पाहिजे. गोमंतकीय प्रतिभेसाठी ते ऊर्जाकेंद्र बनले पाहिजे. त्यासाठी केवळ नूतनीकृत इमारत उभी राहणे पुरेसे नाही. ह्या संकुलाचा अधिकाधिक प्रयोगशील वापर कसा होईल ह्याचा विचार करण्याची कुवत असलेल्या द्रष्ट्या कलासक्त व्यक्तींकडे ह्या संस्थेचा कारभार सोपवला गेला पाहिजे.