नव्या मुख्य निवडणूक आयुक्तांची सोमवारी निवड होण्याची शक्यता

0
6

नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) यांच्या निवडीसाठी सोमवार दि. 17 फेब्रुवारी रोजी बैठक होण्याची शक्यता आहे. सीईसी निवड समितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, कायदामंत्री अर्जुन मेघवाल आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा समावेश आहे. अध्यादेश आणत मोदी सरकारने सरन्यायाधीशांना या समितीतून वगळल्याने नव्या मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड ही औपचारिकता असणार आहे. दरम्यान, विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचा कार्यकाळ 18 फेब्रुवारी रोजी संपत आहे.

आतापर्यंत सर्वात वरिष्ठ निवडणूक आयुक्त (ईसी) यांना मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून बढती देण्यात आली आहे. राजीव कुमार यांच्यानंतर ज्ञानेश कुमार हे सर्वात वरिष्ठ निवडणूक आयुक्त आहेत. त्यांचा कार्यकाळ 26 जानेवारी 2029 पर्यंत आहे. याशिवाय नवीन निवडणूक आयुक्त म्हणून एखाद्या नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती देखील केली जाऊ शकते. सुखबीर सिंग संधू हे दुसरे निवडणूक आयुक्त आहेत.
कायद्यानुसार, भारत सरकारच्या सचिव पदाच्या समतुल्य कोणत्याही पदावर असलेल्या किंवा धारण केलेल्या व्यक्तींमधून सीईसी आणि ईसीची नियुक्ती केली जाईल. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, सेवारत आणि निवृत्त सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांना मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त केले जाऊ शकते.

याचिकेवर 19 फेब्रुवारी रोजी सुनावणी
सर्वोच्च न्यायालय 19 फेब्रुवारी रोजी मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करेल.