नव्या बोरी पुलासाठी घरे पाडणार नाही

0
9

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे विधानसभेत आश्वासन

नव्या बोरी पुलाचे बांधकाम करताना कुणाचीही घरे पाडली जाणार नसून खाजन शेतीचे कमीत कमी नुकसान होईल याकडे लक्ष देण्यात येणार असल्याचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा विधानसभेत बोलताना सांगितले. काल प्रश्नोत्तराच्या तासाला गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई व काँग्रेस आमदार कार्लुस फेरेरा यांनी विचारलेल्या त्यासंबंधीच्या एका तारांकित प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी वरील माहिती दिली.

यासंबंधी पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आम्हांलाही तेथील शेतकऱ्यांची चिंता असून शेतकऱ्यांना सोबत घेऊन आम्ही केंद्रीय महामार्ग खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांच्याशी या प्रश्नावर चर्चा केली आहे. या पुलासाठी लोकांची घरे तर मोडली जाणार नाहीतच. शिवाय खाजन शेतीचे कमीत कमी नुकसान होईल, अशा प्रकारे या पुलाचे व जोड रस्त्याचे आरेखन करण्यात आले असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिली.

बोरी रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी या नव्या पुलाची गरज आहे. जुना पुलही आता जर्जर होण्याच्या मार्गावर असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सभागृहाच्या नजरेस आणून दिले. फोंडा सर्कल ते गणपती मंदिर असा हा पूल व रस्ता होणार असून त्यासाठी एकही घर मोडावे लागणार नसल्याचे सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले. सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. जे शेतकरी या शेतीत मत्स्य पैदास करतात त्यांना पुलाचे काम प्रत्यक्ष सुरू झाल्यानंतर पुढील दोन वर्षे मत्स्य पैदास करता येणार नसल्याने त्यासाठीची नुकसान भरपाईही मिळणार असल्याचे सावंत म्हणाले. काम संपल्यानंतर शेती उपसण्यात येणार असून नंतर त्यांना तेथे पुन्हा मत्स्य पैदास करता येणार असल्याचे ते म्हणाले. बोरी पुलाची लांबी ही तब्बल 7 कि. मी. एवढी असेल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

1 लाख 20 हजार चौ. मी.
खाजन शेतीला धोका : विजय

यावेळी बोलताना विजय सरदेसाई म्हणाले की, या पुलामुळे तब्बल 1 लाख 20 हजार चौ. मी. एवढी खाजन शेती नष्ट होणार आहे. कोळशाची कर्नाटकात वाहतूक करण्यासाठी या पुलाची बांधणी करण्यात येत असल्याचा आरोपही यावेळी सरदेसाई यांनी
केला.
यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, कोळशासाठीची वाहतूक करण्यासाठी हा पूल बांधण्यात येत आहे, हा आरोप खोटा आहे. राज्यातील फार्मा उद्योगासाठीचा कॉरिडॉर म्हणून पुलाचा व रस्त्याचा वापर करता येईल. तसेच हा पूल व रस्ता यामुळे जे रस्त्यांचे जाळे विणले जाणार आहे, त्याचा फायदा मुरगाव पोर्ट येथे उभारण्यात येणार असलेल्या क्रुझ टर्मिनलसाठीही होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हे क्रुझ टर्मिनल झाल्यानंतर पर्यटकांना घेऊन बोटी मुरगाव बंदरावर येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, व्हेन्झी व्हिएगश, कार्लुस फेरेरा यांनीही विविध प्रश्न व सूचना केल्या.