नव्या प्रादेशिक आराखड्यासाठी लोटलीत ग्रामस्थांकडून निदर्शने

0
2

गोवा सरकारने नवा प्रादेशिक आराखडा तयार करावा व या आराखड्यानुसारच राज्यात विकासकामे करावीत या मागणीसाठी काल लोटली येथील ग्रामस्थांनी लोटलीतील महामार्गावर निदर्शने केली. यावेळी निदर्शने करणाऱ्या ग्रामस्थांना आपला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी वेळ्ळीचे आमदार क्रुझ सिल्वा, बाणावलीचे आमदार व्हेन्झी व्हिएगस, आम आदमी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष अमित पालेकर हे हजर होते.

राज्यात मिळेल तेथे डोंगरकापणी सुरू असून, परराज्यातील बिल्डरांची गोव्यातील डोंगर व वनक्षेत्रावर वक्रदृष्टी आहे. त्यामुळे गोव्याचे निसर्गसौंदर्य व पर्यावरण धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली असल्याचे मत क्रुझ सिल्वा, व्हेन्झी व्हिएगस व अमित पालेकर यांनी व्यक्त केले. लोकांनी गोव्याचा होणारा विद्ध्वंस थांबवण्यासाठी पुढे यावे असे आवाहन यावेळी वरील नेत्यांनी केले. सरकारने आता विनाविलंब प्रादेशिक आराखडा तयार करावा, अशी मागणी यावेळी निदर्शकांनी केली.