नव्या पीडीएवरील माझा समावेश परवानगीविना : फर्नांडिस

0
91

>> पीडीएत समावेश विरोधास पाठिंबा

सांताक्रुझचा समावेश ग्रेटर पणजी पीडीएत करण्यास आपलाही विरोध आहे, असे या मतदारसंघाचे आमदार आंतोनियो तथा टोनी फर्नांडिस यांनी सांगितले. या पीडीएवर आपला समावेश करण्याआधी आपली परवानगी घेतली नव्हती असेही त्यांनी स्पष्ट केले.

सांताक्रुझ मतदारसंघातील जनतेचा सांताक्रुझचा ग्रेटर पणजी पीडीएत समावेश करण्यास आपला विरोध असून आपण ह्या लोकांबरोबर असल्याचे फर्नांडिस म्हणाले. मतदारसंघातील लोकांच्या हितासाठी आपण त्यांच्याबरोबर राहणार आहे. मतदारसंघातील हिरव्यागार वनराईने नटलेल्या भागांत गगनचुंबी इमारती उभ्या राहिलेल्या लोकांना नको आहेत. ह्या इमारती उभ्या राहिल्या की गावातील पर्यावरणावर त्याचा गंभीर परिणाम होणार आहे. त्याशिवाय परराज्यातील लोक मोठ्या संख्येने ह्या इमारतीत राहण्यासाठी येतील, अशी भीतीही लोकांनी व्यक्त केलेली आहे. ह्या घडीला गावात पाण्याची मोठी समस्या आहे. पाण्याचे मतदारसंघातील सर्वच भागांत दुर्भिक्ष्य आहे.

त्यामुळे इमारती वाढून आणखी लोक ह्या भागांत रहावयास आल्यास स्थानिकांना पाण्याचा थेंबही मिळणार नाही. त्याशिवाय विजेची समस्याही आहे असे ते म्हणाले. ह्या पार्श्‍वभूमीवर सांताक्रुझचा समावेश ग्रेटर पणजी पीडीएत केला तर मतदारसंघात हाहा:कार माजेल अशी भीती स्थानिक जनतेला वाटत आहे व ती भीती रास्तच असल्याचे आपण जनतेबरोबर राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. ग्रेटर पणजी पीडीएवरील मंडळात आपला समावेश स्थानिक आमदार ह्या नात्याने झाला आहे. पण तो करण्यापूर्वी आपली मान्यता घेतली नव्हती असे ते म्हणाले.