नव्या दिशा… कुटुंबाची सक्षम आशा!

0
23
  • पौर्णिमा केरकर

स्वयंसहाय्य गटांना सशक्त करणे गरजेचे आहे. असे करताना ग्रामीण भागातील महिलांना सरकारी योजनांचा लाभ सुलभतेने घेता यावा म्हणून त्यांच्यापर्यंत या योजना पोहोचविण्यासाठी कार्य करणे आवश्यक आहे. व्यवसाय कोणते करता येतील, त्यांच्या प्रक्रिया कोणत्या, अर्ज कसे करायचे, कोणत्या खात्याची कोणती योजना आहे, कागदपत्रे कोणती लागतील यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारे उपक्रम, कार्यशाळा, चर्चा व्हायला हव्यात; अन्यथा योजना भरपूर आहेत पण त्या योग्य प्रकारे महिलांपर्यंत पोहोचत नसतील तर त्यांचा उपयोग काय?

‘महिला आणि स्वयंपाकघर’ हे समीकरण समाजमनाच्या नसानसांत भिनलेले आहे. ‘चूल आणि मूल’ या संकल्पनेभोवतीच स्त्रियांना बांधून ठेवीत, स्त्रियांचे जीवन वेठीस धरले गेले. खरेतर मुलांना जन्म देण्यापासून ते त्यांना वाढवणे, कुटुंबाचे भरण-पोषण करणे ही फार मोठी जबाबदारी स्त्रीने वर्षानुवर्षे विनातक्रार अंगीकारली. त्यामागे तिची समर्पित भावना, जिद्द, कणखरपणा, निष्ठेने काम करण्याची वृत्ती, प्रतिकूल परिस्थितीत धारदार होत चिवटपणे संघर्षाला सामोरे जाण्याची धडपड होती. तिची ही ओळख पूर्वीपासूनच होती. कालौघात मात्र तिला समाज, कुटुंबाने गृहीतच धरले. तिच्या श्रमांची किंमत शून्य ठरविण्यात आली. काळ बदलला, जीवन वेगवान झाले, जीवनाची क्षेत्रे बदलली त्यानुसार तिच्या कार्यक्षेत्रात बदल झाला, तसाच हा बदल तिच्या कर्तृत्वातही जाणवू लागला आहे. तिची आदिम चिवट जिज्ञासा आज अधिकाधिक घासूनपुसून लख्ख होऊन जगासमोर आलेली आहे.
तिच्या या सगळ्याच वाटचालीच्या पार्श्वभूमीवर नजर टाकून सकारात्मक दृष्टीने विचार केला तर त्यातील वस्तुस्थितीची सत्यता पडताळून पाहता येते. तिच्या या सक्षम आणि कृतिशील वाटचालीत तिच्यासाठी आधारस्तंभ ठरली ती स्वयंसहाय्य गटाची संकल्पना. बांगलादेशमधील अर्थतज्ज्ञ महम्मद युनूस यांनी ग्रामीण बँक संकल्पना राबविली. त्यात आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या घटकांना जोडण्यात आले आणि मग पुढे सुरू झाला आर्थिकदृष्टीने स्वावलंबी होण्याचा प्रवास! समाजाच्या तळागाळातील घटकही काम करू शकतात, आर्थिकदृष्ट्या बळकट होऊ शकतात, याची जाणीव करून देत बांगला देशात स्वयंसहाय्य गटातून अभूतपूर्व क्रांती घडवून आणली गेली. गोव्यात आज समाजकारण, राजकारण, संस्कृती, इतिहास अशा सर्वच क्षेत्रांत स्त्रियांनी स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. मुख्य म्हणजे ती आता बोलू लागली आहे, स्वतःला हवं नको ते ठरवू लागली आहे. सांस्कृतिक वारसा तर पूर्वापार तिनेच जतन, संवर्धन करून ठेवलेला होता. आता ती आर्थिक सक्षम होण्यासाठी जुन्याच उपक्रमांना नव्याने भिडलेली आहे. तिच्या कर्तृत्वाची नवी पहाट झळाळी घेत आहे. महिला मंडळे, स्वयंसहाय्य गटांचे आत्मभान वाढत आहे. स्वयंसहाय्य गटांच्या माध्यमातून महिलांना सरकारी पातळीवर विविध योजनांचा लाभ मिळत आहे.
आज छोटे-मोठे उद्योग घरबसल्या महिलावर्ग सहज करू शकतो. त्यात बॅगा तयार करणे, अगरबत्ती, मेणबत्ती, मेहंदी, रांगोळी, केक करणे, क्राफ्ट, चटई, गोधडी शिवणे, लहान मुलांचे कपडे, जेवण करणे, पायपुसणी, पुष्पगुच्छ तयार करणे, खाण्याचे पदार्थ वगैरे अनेक व्यवसायांचे मार्गदर्शन सरकारी पातळीवरून महिलांसाठी करण्यात येते. त्यामुळे महिलावर्ग मोठ्या प्रमाणात स्वयंसहाय्य गटाच्या माध्यमातून स्वावलंबी होत आहे. एरव्ही बऱ्याच वेळा महिला मंडळे, स्वयंसहाय्य गटही राजकीय प्रचारमाध्यमांची साधने होत होती. आताशा जरी त्यात पूर्णार्थाने बदल दिसत नसले तरी नजरेत भरावे असे वेगळेपण निर्माण झालेले आहे.

गोव्यातील डिचोली, सत्तरी, मडगाव, काणकोण, वास्को, फोंडा, पणजी वगैरे सर्वच ठिकाणी महिलांची सर्वांगीण प्रगती दिसते. शहरातील स्त्रियांची कार्यक्षेत्रे वेगळी असली तरी ग्रामीण महिला प्रामुख्याने घरातच कुटुंबासाठी राबायच्या. या महिला विणकाम, भरतकाम, शिवणकाम स्वतःच्या आनंदासाठी करायच्या. एक छंद म्हणूनही त्यांनी फावल्या वेळेत हे काम करण्याची सवय लावली होती. स्वतःचे आणि कुटुंबाचे कपडे शिवून देणे ही तिची जबाबदारी होती. त्यामुळे शिवणकला, पाककला, विणकाम, भरतकाम हे तर मुलीला यायलाच हवे असा एक समाजमनाचा अलिखित नियमच होता. घरात शिवण मशीन ही गरज होती. कित्येक ग्रामीण महिलांनी आपल्या कुटुंबाला सावरले ते याच शिवण टिपणाने. मध्यंतरी फुगडी-धालो असेच त्यांचे कार्यक्षेत्र होते. गावागावांत धार्मिक-सांस्कृतिक सण-उत्सवांशी स्वयंसहाय्य गट जोडून घेत आहेत. मेणकुरे येथील प्रगती स्वयंसहाय गटाचे येथे उदाहरण घेता येते. सामूहिकतेने स्वतःच्या जमिनीत विविध धान्यांची, मिरचीची लागवड करून त्याद्वारे गरम मसाला तयार करण्यात येतो. गोव्याचे पारंपरिक अन्नपदार्थ करणे ही या मंडळाची खासियत आहे. भूकलाडू, तहानलाडू, इतर खाद्यपदार्थ, सण-उत्सवाच्या निमित्ताने केले जाणारे पदार्थ अशा प्रकारे हे मंडळ कार्यरत आहे. शिवाय नृत्य, नाट्य, भजन, दिंडी या कलाप्रकारांत त्या सक्रिय सहभाग दर्शवितात. या गावाच्या आसपास असलेली महिला मंडळेही कोणते ना कोणते उपक्रम सतत राबवीत असतात. पूर्वी हे सर्व कोणाच्या तरी मदतीने- खास करून नवऱ्याला सोबत घेऊन, त्याच्यावर भर ठेवून- या गोष्टी केल्या जायच्या. बदलत्या जीवनशैलीतील बदल तिने स्वतःत अनुभवला. तिला आत्मभान आले. तिची आत्मशक्ती वाढली. आता ती स्वतंत्र बाण्याने पुढे सरसावली. सामूहिक पातळीवरील तिचे योगदान जसे आहे, तशीच तिने वैयक्तिक पातळीवर उत्तुंग भरारी घेतली आहे.

स्त्रियांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमतेचा विचार राष्ट्रीय स्तरावरून होत आहे. महिलांच्या सशक्तीकरणासाठी राबविण्यात येत असलेले उपक्रम देशाला सुदृढ आणि विचारी नागरिक म्हणून विकसित करण्यासाठी मोलाचे योगदान देतील. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने साक्षर असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने तयारी ठेवली तर त्याचा एकूणच जडणघडणीवर सकारात्मक परिणाम होणार आहे. आरोग्य आणि आहार, कायदेशीर सल्ला, मानसिक आणि आर्थिक साहाय्य, सरकारच्या विविध योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आखलेले उपक्रम, सर्वधर्मसमभाव आचरणात आणून त्याद्वारे तरुणाईच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न, माध्यान्ह आहार योजना, कॅन्टीनद्वारे श्रमिक अन्नपूर्णा योजनेचा लाभ अशा कितीतरी उपक्रमांना चालना देत सरकारने योजना आखलेल्या असून त्याद्वारे महिलांना स्वावलंबी करावे हाच एकमेव उद्देश आहे. कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देत व्यवसाय करणाऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे. गावागावांत छोटेमोठे घरगुती व्यवसाय तेजीत चालत आहेत.

पूर्वी वाड्यावर लग्नसमारंभ किंवा तत्सम सामूहिक कार्यक्रम असला की घराघरातील प्रत्येक व्यक्ती स्वतःची नैतिक जबाबदारी म्हणून मदतीसाठी जायची. आज हीच जागा व्यावसायाने घेतली असून बचत गटातील महिला एकत्र येऊन लग्न, बारसे, मुंज, पार्ट्यांसाठी सामूहिक ऑर्डर्स स्वीकारत आहेत. हा मोठा बदल आहे. दिवाळीसाठी फराळ, चतुर्थीमधील करंज्या, नवीन नवरीला सासरी पाठविण्यासाठीच्या ‘ओझ्या’च्या करंज्या, त्याचबरोबर इतर प्रसंगी करावयाचे खाद्यपदार्थ घरी करण्यासाठी वेळ मिळत नसल्याने बचत गटाद्वारे ते समूहाने केले जाते. स्त्री-शक्तीच्या माध्यमातून आता बचत गट एकमेकांशी जोडले गेले आहेत. त्यामुळेच त्यांची सांघिक शक्ती वाढली आहे. अगदीच अत्यल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिल्याने आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेली महिला वैयक्तिक पातळीवर आपला धंदा उभारू शकते.

गोव्यात हंगामी फळे, फुले, कंदमुळे मुबलक प्रमाणात आढळतात. फणसाचेच उदाहरण लक्षात घेतले तर त्याच्यापासून अनेक पदार्थ करता येतात. फणसपापड, चिप्स, लोणचे, जॅम, फणसपोळी, सरबत, फणसाची भाकरी, कोन, सांडगे इ. अशा तऱ्हेने इतर फळा-फुलांचा विचार करून, सामूहिक तसेच वैयक्तिक पातळीवर व्यवसाय करून महिला स्वावलंबी वाटचाल करू शकतात. गोव्यात शेकडो महिला मंडळे, स्वयंसहाय्य गट सक्रिय आहेत. ही शक्ती एकत्रित येऊन जर कार्य करू लागली तर राज्याच्या स्वावलंबनाच्या दृष्टीने आपण एक पाऊल पुढे टाकू शकतो.

महिला आणि बालविकास खात्याने कोविड काळात महिलांसाठी मास्क करण्याची योजना राबवली. त्याचा फायदा अनेक कुटुंबांना झाला. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून गोवा बाजार योजनेत बचत गटांना प्राधान्य देऊन घरगुती पदार्थ तसेच पारंपरिक वस्तू तयार करणाऱ्या कारागिरांना त्यांनी केलेल्या वस्तूंची, पदार्थांची विक्री करण्यासाठी दालन दिले. गोवा सरकारच्या कृषी खात्याच्या वतीने भाजी लागवडीसाठी व्यक्तिगत पातळीवर आणि बचत गटासाठी योजना कार्यान्वित केली होती. पारंपरिक भाजी उत्पादकांनी या योजनेअंतर्गत किमान अर्धा एकर जमिनीत लागवड करायला हवी अशी अट असून या योजनेसाठी कृषिकार्ड महत्त्वाचे मानले गेले होते. सरकारने गोवा राज्य ग्रामीण उपजीविका अभियान सुरू केले. जवळपास तीन हजार बचत गट याच्याशी जोडले गेले आहेत.

2014 च्या आकडेवारीनुसार गोव्यात 1475 बचत गट होते. 1999 पासून या गटांना चालना मिळावी म्हणून सरकारने विविध प्रकारे प्रयत्न केले. येळा येथील सार्वजनिक प्रशासन आणि ग्रामीण विकास संस्था (गीपार्ड) ही बचत गटांना उभारी देण्यासाठी उपक्रम राबवित आहे. सुवर्णजयंती ग्राम स्व-रोजगार योजनेअंतर्गत सरकारने कृषी, बागायती, दुधाचा व्यवसाय, कुक्कुटपालन इ. व्यवसायांना चालना दिली होती. राष्ट्रीय सहकारी संघटनेद्वारे गोव्यात बचत गटांचे समाधानकारक काम झाले होते. नाबार्ड संस्था ही महिलांच्या प्रगतीसाठी चांगले काम करते. अजूनही सरकार बऱ्याच गोष्टी महिलांच्या बाबतीत राबवू शकते. ज्या तऱ्हेने बांगलादेशात महम्मद युनूसनी ग्रामीण बँकेद्वारे क्रांती घडवून आणली, गोव्यातही अशी क्रांती घडविणे सहज शक्य होऊ शकते. त्यासाठी बचत गटांची आत्मीयता, विश्वास, सहभाग, जबाबदारीचे भान, सचोटी, सातत्यपूर्णता अंगी बाळगून काम करणे आवश्यक आहे.
स्वयंसहाय्य गटांना सशक्त करणे गरजेचे आहे. असे करताना ग्रामीण भागातील महिलांना सरकारी योजनांचा लाभ सुलभतेने घेता यावा म्हणून त्यांच्यापर्यंत या योजना पोहोचविण्यासाठी कार्य करणे आवश्यक आहे. पंचायतपातळीवरून असे प्रयत्न व्हायला हवेत. व्यवसाय कोणते करता येतील, त्यांच्या प्रक्रिया कोणत्या, अर्ज कसे करायचे, कोणत्या खात्याची कोणती योजना आहे, कागदपत्रे कोणती लागतील यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारे उपक्रम, कार्यशाळा, चर्चा व्हायला हव्यात; अन्यथा योजना भरपूर आहेत पण त्या योग्य प्रकारे महिलांपर्यंत पोहोचत नसतील तर त्यांचा काय उपयोग? ठराविक महिलाच एकत्रित येतात. महिन्याच्या शेवटी आपापसात फक्त आर्थिक व्यवहारच करतात, तर मग महिला आर्थिकदृष्टीने सधन होईल, मात्र स्वतःबरोबरच तिने आपल्या मैत्रिणीला वाढवले, समूहाने मिळून काम केले, तसे करत असताना आर्थिक सुबत्तेबरोबरीने सामाजिक अनुबंधही जोडले जातील. बचत गटाद्वारे कुटुंबे जोडायला हवीत. त्यानंतरच समाज, प्रदेश आणि राष्ट्राची सांघिक उन्नती होईल.