ट्रॅकिंग उपकरण बसवल्याशिवाय नव्या परवान्यांना वाहतूक खात्याकडून मनाई
विश्वासात न घेताच सक्ती केली जात असल्याचा रेंट अ कार संघटनेचा आरोप
वाहतूक खात्याने राज्यातील ‘रेंट अ कार’साठी नवे ट्रॅकिंग उपकरण आणलेले असून, अखिल गोवा रेंट अ कार संघटनेने मात्र या नवा ट्रॅकिंग उपकरणाला जोरदार विरोध केला आहे. हे उपकरण बसवल्याशिवाय ‘रेंट अ कार’ वाहनांना परवाना मंजूर केला जाणार नसल्याचे वाहतूक खात्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या उपकरणाला विरोध अधिकच वाढला आहे. काल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वाहतूक खात्याच्या संचालकांची भेट घेऊन ट्रॅकिंग उपकरणाला विरोध दर्शवला. दरम्यान, पेडण्यातील टॅक्सी व्यावसायिकांच्या बहुतांश मागण्या मान्य करूनही त्यांचे आंदोलन अजूनही संपलेले नाही, त्यातच आता रेंट अ कार संघटनेने ट्रॅकिंग उपकरणाच्या मुदद्यावरून विरोध चालवला असल्याने सरकारसमोर नवी समस्या उभी राहिली आहे.
रेंट अ कारसाठी आता राज्याच्या वाहतूक खात्याने नवे ट्रॅकिंग उपकरण सक्तीचे केले असून, ते बसवल्याशिवाय परवाना दिला जात नाही. या नव्या उपकरणाला आमचा विरोध असून, आम्हाला विश्वासात न घेता त्याची सक्ती केली जात असल्याचे आम्ही वाहतूक खात्याच्या संचालकांच्या निदर्शनास आणून दिले असल्याचे अखिल गोवा रेंट अ कार संघटनेचे उपाध्यक्ष नितेश चोडणकर यांनी सांगितले.
आम्ही यापूर्वीच कारमध्ये ‘ट्रॅकिंग’ उपकरण बसवले आहे. त्यामुळे आता हे नवे उपकरण बसवण्याचा प्रश्नच येत नसल्याचे चोडणकर यांनी सांगितले. आम्ही 3 हजार रुपये खर्च करून ट्रॅकिंग उपकरण बसवले असून, त्यात वर्षभरासाठी 1300 रुपयांचे रिचार्जही केले जात आहे. आता वाहतूक खाते जे ट्रॅकिंग उपकरण बसवण्याची सक्ती करीत आहे, त्याची किंमत सुमारे 12 हजार रुपये एवढी आहे. तसेच त्याचे वार्षिक रिचार्जही अत्यंत महाग असून, ते 4500 रुपये एवढे असल्याचे चोडणकर यांनी सांगितले.
हे उपकरण एका खासगी कंपनीने तयार केले असून, सरकारने त्या कंपनीशी करार केला असल्याचा दावा चोडणकर यांनी केला.
या ट्रॅकिंग उपकरणासंबंधी आमचे जे काही म्हणणे आहे, ते लेखी स्वरुपात देण्याची सूचना वाहतूक संचालकांनी आम्हाला केली असल्याचे चोडणकर म्हणाले. आम्ही वकिलांशी बोलून आमचे म्हणणे लेखी स्वरुपात देणार आहोत. त्यानंतर वाहतूक खाते गोवा सरकारशी बोलून त्यावर योग्य ती भूमिका घेणार असल्याचे चोडणकर यांनी सांगितले.