नव्या झुआरी पुलासाठी पुन्हा तारीख पे तारीख

0
14

>> सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये खुला होण्याची शक्यता

झुआरी नदीवरील आठ पदरी नव्या केबल स्टे पुलाचे चार पदरी मार्ग येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये वाहतुकीसाठी खुले करण्यात येणार आहेत, तर संपूर्ण आठ पदरी पूल एप्रिल २०२३ मध्ये पूर्ण होणार असल्याचे साबांखा मंत्री नीलेश काब्राल यांनी काल सांगितले.

खात्याच्या अधिकार्‍यांसह काल या पुलाच्या कामाची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यापूर्वी काब्राल यांनी या पुलाविषयी माहिती देताना चार पदरी मार्गिकेचे जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगितले होते. खरे तर सार्वजनिक बांधकाम खात्याने या पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी डिसेंबर २०१९ अशी तारीख निश्‍चित केली होती.

मात्र २०२१ संपून २०२२ साल अर्धे संपले तरी हा पूल निम्मा सुद्धा पूर्ण झालेला नाही. पुलाच्या संरेखनाचे काम १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण होणार असल्याची माहिती आपणाला कंत्राटदार दिलीप बिल्डकॉनकडून मिळाली आहे. त्यानंतर या पुलाची चाचणी घेतली जाणार आहे. आणि हे काम पूर्ण झाले की या पुलाची चार पदरी मार्गिका वाहतुकीसाठी खुली केली जाणार असल्याचे काब्राल यांनी सांगितले.