आरोग्यमंत्री डिसोझा यांची माहिती
विविध प्रकारच्या शस्त्रक्रियांसह एकूण ५० प्रकारचे उपचार नव्या आरोग्य विमा योजनेखाली आणण्यात येणार असून या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणार्यांना किमान ५ वर्षांचा निवासी दाखला बंधनकारक करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी काल सांगितले.
ही विमा योजना लवकरात लवकर मार्गी लागावी यासाठी आपण प्रयत्नरत आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याबरोबर त्या संदर्भात एक बैठक झाली. आता पुढील बैठक येत्या ६ डिसेंबर रोजी होणार असल्याचे ते म्हणाले.ज्या खासगी इस्पितळांना या योजनेखाली आणण्यात येणार आहे त्यांच्याकडून या योजनेचा गैरवापर केला जाऊ नये व सरकारची आर्थिकदृष्ट्या फसवणूक केली जाऊ नये यासाठी कुठल्या उपचारासाठी किती पैसे आकारता येतील याचे सगळे तपशील या योजनेत असतील. त्यामुळे मनमानीपणे या इस्पितळांना रुग्णांना बिले करून देता येणार नाही, असे डिसोझा म्हणाले. अजूनही या योजनेत काही दुरुस्त्या करण्याची गरज असून त्याबाबत अभ्यास चालू असल्याचे डिसोझा यांनी सांगितले.